Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

शेकडो महाविद्यालयांतील प्रवेश थांबविले
औरंगाबाद, ११ जून /प्रतिनिधी

पूर्णवेळ प्रश्नचार्य, प्रश्नध्यापक नाहीत, असले तर अन्य सुविधा नाहीत. न्यायालयाच्या आदेशानंतरही याची पूर्तता करण्यात न आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या १४६ महाविद्यालयांना सोमवारी नोटिसा बजावण्यात येणार आहे. विद्यापीठाशी असलेली संलग्नता का रद्द करण्यात येऊ नये, असा खुलासा यात मागविण्यात येणार आहे. याबरोबरच या महाविद्यालयामध्ये होणारे प्रथम वर्षाचे प्रवेशही थांबविण्यात आले आहेत. आज झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

बनावट नोटा तयार करणाऱ्या दोघांना अटक
नांदेड, ११ जून/वार्ताहर

बनावट नोटा तयार करणाऱ्या दोन जणांना देगलूर पोलिसांनी अटक करून, त्यांच्याजवळील सुमारे ४१ हजार १५० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीसप्रमुख सत्यनारायण चौधरी यांनी दिली.७ जूनला देगलूरच्या अलंकार बीअर बारमधून एका इसमाने ५०० ची नोट देऊन दारू खरेदी केली. बारचे मालक शंकर रोयलावार यांना त्या नोटेसंदर्भात शंका आल्याने त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. देगलूर पोलिसांनी तात्काळ ५०० ची नोट देणाऱ्या प्रभाकर नारायण पटले याला (रा. लोंडपल्ली, जि. निजामाबाद) अटक केली.

पावसा रे!
पाऊस. जीवसृष्टीच्या धारणेचा मुलाधार, जीवनाचा एकमेव स्रोत असलेला हा पाऊस जीवनाच्या अखंडत्वाचं प्रतीक. तसा तो दरवर्षीच येतो. त्याच्या धाराही त्याच पाण्याच्या युगे न युगे. तरीही दरवर्षी त्याचं येणं हे एक अप्रूपच. ही धरित्री आणि या धरित्रीतून आलेला आणि तिच्यातच विलीन होणारा प्रत्येक जीव या पावसाची आसुशीनं वाट पाहत असतो. अनेक रूपात, अनेक ढंगात येतो हा पाऊस.

मानव विकास मिशनचे सिमेंट बंधारे कोरडे
दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करणार - बाळासाहेब थोरात
लोकसत्ता इफेक्ट

औरंगाबाद, ११ जून /खास प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्य़ात मानव विकास मिशन अंतर्गत कृषी विभागाने बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा न झाल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणात संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल, या कामात दोष राहिले असून त्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जाईल, अशी घोषणा जलसंधारणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात केली.
‘लोकसत्ता - मराठवाडा वृत्तांत’मध्ये १८ डिसेंबर २००८ ला या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

तरुण कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
नांदेड, ११ जून/वार्ताहर

सततची नापिकी व सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत असलेल्या पांडुरंग हरी शिंदे (वय २२) या तरुणाने विषारी औषध प्रश्नशन करून आपली जीवनयात्रा संपविली. पोलीस सूत्रांनुसार, नायगाव तालुक्यातल्या मांजरम येथील पांडुरंग शिंदे हा तरुण शेतकरी कर्जबाजारी झाला होता. सततची नापिकी व गेल्या दोन वर्षापासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत तो होता. याच नैराश्यातून काल त्याने आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्यायले. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नायगाव पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

बोरगाव ग्रामस्थांकडून टँकरचालक व क्लिनरचा सत्कार!
लोहा, ११ जून / वार्ताहर

पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या क्लिनरला टँकरचा मार लागल्यानंतर बोरगाव (आ.) येथील गावकऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आठ हजार रुपयांचा निधी गोळा करून क्लिनरवर औषधोपचार केले. एम.टी.ओ. ३८२ क्रमांकाचे पाणी टँकरचा क्लिनर रसूल पठाण याला मार लागला. त्यानंतर विश्वनाथ भंडारे, पुंडा पाटील, कल्याण पाटील, अप्पाराव लोखंडे, नाथराव भालेराव, गोविंदराव पाटील अशा प्रमुखांनी औषध उपचारासाठी गावात मदतीची हाक देताच आठ हजार जमा झाले. त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्याच्यावर उपचार केले व त्यांना कपडे घेतले. बोरगावकरांची सामाजिक बांधिलकी निश्चित प्रेरणादायी आहे.

द्वारकेश मार्केटची सुनावणी तीन आठवडय़ांनंतर
औरंगाबाद, ११ जून/खास प्रतिनिधी

चिकलठाणा येथील द्वारकेश मार्केटमधील परिस्थिती १० जूनपर्यंत जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. हा आदेश आणखी तीन आठवडे अंमलात असणार आहे. द्वारकेश मार्केटमधील गाळेधारकांनी अतिक्रमणाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शासनाच्या गायरान जमिनीवर द्वारकेश मार्केट उभारण्यात आलेले आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. या मार्केटला रितसर परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे हे अतिक्रमण नसल्याचा दावाही गाळेधारकांनी केला आहे. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांची सुनावणी बुधवारी न्या. पी. व्ही. हरदास व न्या. आर. के. देशपांडे यांच्यासमोर झाली. या याचिकेची पुढील सुनावणी तीन आठवडय़ानंतर होणार आहे. तोपर्यंत जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मनोहर लोंढे, भागीनाथ नवपुते यांनी या याचिका केल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रदीप देशमुख यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या शपथपत्राला उत्तर देण्यासाठी अवधी देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केली.
या प्रकरणात गाळेधारकांतर्फे प्रदीप देशमुख, देवदत्त पालोदकर, राज्य शासनातर्फे नंदकुमार खंदारे व एस. के. कदम आणि महानगरपालिकेतर्फे एस. एन. पगारे हे काम पाहत आहेत.

‘कामांना आचारसंहितेपूर्वी प्रशासकीय मंजुरी घ्या’
औरंगाबाद, ११ जून /प्रतिनिधी

२००९-१० या वर्षाच्या जिल्हा योजनेत मंजूर कामांना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी प्रशासकीय मंजुरी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते.
विद्यामान वर्षीच्या मंजूर कामांच्या अंदाजपत्रकास आपल्या विभागाची तांत्रिक मान्यता घेऊन आचारसंहिता लागण्यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी घेतल्यास विकास कामांना गती देता येईल. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव पाठवावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीत मागील वर्षाच्या कामांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. मागील वर्षी झालेल्या कामांची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

वीज कामगार महासंघाचे धरणे आंदोलन
औरंगाबाद, ११ जून/खास प्रतिनिधी

वेतनवाढीसाठी त्वरित चर्चा करून करार करा, निवृत्तीचा गुंता सोडविण्यासाठी विश्वासात घ्या या अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघातर्फे विभागीय कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. मृत कामगारांच्या वारसांना विनाविलंब त्यांच्या निवासी झोनमध्ये बदली द्यावी अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. कामगारांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. आज कर्मचारी दहशतीच्या वातावरणात वावरत आहे. काम करताना होणारे अपघात वाढले आहेत. कर्मचाऱ्यावर पडणारा कामाचा ताण या सर्वाना विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती विभागीय अध्यक्ष मैनाजी ठोंबरे यांनी दिली. तांत्रिक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामाचा मोबदला देणे पुन्हा सुरू करावे, आयटी सेंटरमधील कर्मचाऱ्यांची अरेरावी कमी करण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करण्यात यावी अशा मागण्याही महासंघाने केल्या आहेत. या आंदोलनात सचिव चंद्रकांत वसेकर, कार्याध्यक्ष डी. एस. दडके, संघटनमंत्री डी. व्ही. भालेराव, उपाध्यक्ष पी. एस. साळवे, अरुण पिवळ, शरद जोशी, अरुण जोशी, पद्माकर कुलकर्णी आदी सहभागी झाले.

विवाहितेला विष पाजून मारण्याचा प्रयत्न
औरंगाबाद, ११ जून /प्रतिनिधी

झेरॉक्स मशीन आणि संगणक खरेदीसाठी माहेराहून ४० हजार रुपये आणण्यास नकार देणाऱ्या विवाहितेला विष पाजून जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. काल दुपारी छावणीतील दाणाबाजार येथे ही घटना घडली. स्वाती मुकेश राठोड (वय ३१) असे या दूर्दैवी विवाहितेचे नाव आहे. तिच्या तक्रारीवरून पती मुकेश राठोड आणि सासू प्रमिला राठोड यांच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. ४० हजार रुपयांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. मात्र तिने माहेराहून पैसे आणण्यास नकार दिला. शेवटी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रमिला हिने स्वाती यांच्या तोंडात जबरदस्तीने विष टाकून मारण्याचा प्रयत्न केला.

‘इलेकॉन इंजिनिअरिंग’ला २०० कोटीची कंत्राटे
पुणे, ११ जून/ प्रतिनिधी

मटेरियल्स हँडलिंग्ज, इंडस्ट्रीयल गिअर्स आणि ट्रान्समिशन प्रश्नॅडक्ट्स क्षेत्रातील इलेकॉन इंजिनिअरिंगने या वर्षात विविध क्षेत्रातील २०० कोटी रुपयांची कंत्राटे मिळविली आहेत.
मुंद्रा पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (१२० कोटी रुपये), अडानी पॉवर लिमिटेड (२१.९९ कोटी रुपये), टेकप्रश्ने सिस्टिम्स लिमिटेड (१८.५० कोटी रुपये), बीजीआर एनर्जी सिस्टिम्स लिमिटेड (१०.२९ कोटी रुपये) आणि हमबोल्ट वेडॅग इंडिया प्रश्न. लिमिटेड (६.४३ कोटी रुपये) या भारतीय कंपन्यांनी आपल्या विविध प्रकारच्या प्रकल्पांसाठी इलेकॉन इंजिनिअरिंगला कंत्राटे दिली आहेत. त्यांच्या जोडीला इजिप्त येथील इजिप्शियन स्पाँज आयर्न अँड स्टील कंपनीतर्फे २१.५४ कोटी रुपयांचे तर पीटी इंजिनिअरिंग या इंडोनेशियन कंपनीतर्फे २.७३ कोटी रुपयांचे कंत्राट देखील इलेकॉन इंजिनिअरिंगने मिळविले आहे. आर्थिक वर्ष २००९-२०१० साठी कंपनीने धोरणात्मक विकास योजना आखल्या आहेत. या वर्षी कंपनीची एकूण २० टक्के वृद्धी होईल अशी अपेक्षा असून ११५० कोटी रुपयांच्या विक्रीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे, अशी माहिती इलेकॉन इंजिनिअरिंगचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रयासवीन पटेल यांनी दिली.

कामांच्या नित्कृष्टदर्जामुळे निधी परत जाण्याची शक्यता
बिलोली, ११ जून/वार्ताहर

तालुक्यातील पुनर्वसित गावातील रस्ते व नाली बांधकामासाठी मोठय़ा प्रमाणावर निधी आला आहे. मात्र संबंधित ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याने तत्कालिन आमदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या प्रयत्नाने आलेला निधी पाण्यात जाण्याची शक्यता आहे. या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. तालुक्यातील मांजरा व गोदावरी नदीकाठच्या गावांना सतत महापुराचा तडाखा बसत असल्याने १९८३ मध्ये मोठय़ा प्रमाणावर अशा गावांचे पुनर्वसन केले. या वेळी सरकारने त्या-त्या गावात वीज, पाणी, शाळा आदी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. पण निधीअभावी रस्ता व नाली बांधकाम झाले नाही.पुनर्वसित गावात रस्ते व नाल्या व्हाव्यात अशी नागरिकांची मागणी होती. तत्कालिन आमदार खतगावकर यांनी शासनदरबारी ही मागणी रेटून धरल्याने मोठय़ा प्रमाणावर निधी मंजूर झाला. मात्र संबंधित ठेकेदार निकृष्ट साहित्य वापरीत असल्याने ही कामे वर्षभर तरी टिकतील की नाही याबद्दल नागरिकांना साशंकता आहे. या निकृष्ट कामांची चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

नांदेड जिल्ह्य़ातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
नांदेड, ११ जून/वार्ताहर

जिल्ह्य़ातल्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या असून, शहर वाहतूक शाखेचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळणाऱ्या पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे यांना मुखेड पोलीस ठाणे बहाल करण्यात आले आहे. पोलीसप्रमुख सत्यनारायण चौधरी यांनी आज जिल्ह्य़ातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एम. पारधी यांची नक्षलविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून बदली करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे नागनाथ कोडे यांची मुखेड येथे, कंधारचे एस. एस. राठोड यांची वाहतूक शाखेत, हिमायतनगरचे एम. एम. पटेल यांची गुरु-ता-गद्दी सेलमध्ये तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक व्ही. एन. डोंगरे यांची हिमायतनगर पोलीस ठाण्यात बदली केली आहे. कोडे यांच्यासह काही अधिकारी गेले अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत होते. यापूर्वी झालेल्या बदल्या राजकीय दबावाखाली झाल्या होत्या; परंतु यंदा प्रथमच पोलीसप्रमुखांनी राजकीय पाठबळ नसलेल्या काही अधिकाऱ्यांना न्याय दिला आहे.

अवैध दारूसह साडेतीन लाखाचा माल कारवाईत जप्त
गेवराई, ११ जून /वार्ताहर

दमणहून गेवराईकडे अवैध दारू घेऊन येणाऱ्या इंडिका कारला पकडून गेवराई पोलिसांनी ५४ हजारांच्या अवैध दारूसह ३ लाख ५४ हजारांचा माल जप्त केला असून, या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. बुधवारी (१० जून) पोलिसांनी ही कारवाई केली. दमणहून गेवराईत अवैध दारू आणून ती विक्री करणारी एक टोळी सक्रिय आहे. मागील आठवडय़ातही अशाच प्रकारे बाहेरून अवैध दारू घेऊन येणारी जीप पोलिसांनी बेळगाव फाटय़ावर पकडली होती. १० जूनला बुधवारी इंडिका कारमध्ये अवैध दारू येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी उमापूरनजीक पाळत ठेवून सापळा रचला होता. पांढऱ्या रंगाची इंडिका गाडी (क्र. एमएच १२ सी.टी. ८२९४) समोर येताच पोलिसांनी ती अडवून उभी केली. गाडीची झडती घेतली असताना गाडीमध्ये ५४ हजार ७२० रुपये किमतीची विदेशी दारू आढळून आली. या गाडीत दोघे जण होते. परंतु एक जण फरार झाला तर एकास अटक करण्यात आली आहे.

अण्णा हजारे यांच्याआज कंधार तालुक्यात सभा
नांदेड, ११ जून/वार्ताहर

ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री अण्णा हजारे यांच्या कंधार तालुक्यात विविध ठिकाणी उद्या (१२ जून) सभा आयोजित केल्या आहेत. शासकीय विश्रामगृह बहाद्दरपुरा येथे दुपारी १ ते ३ या वेळेत श्री. हजारे कंधार तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता बाबासाहेब लुंगारे सांस्कृतिक सभागृहात सभा होणार आहे. सकाळी ९ वाजता कुरुळा येथे श्रीसंत सावतामाळी मंदिरात सभा होईल. त्यानंतर सायंकाळी सात वाजता पेठवडज येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका सचिव तथा पत्रकार सचिन मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. हजारे यांच्या कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष पांडुरंग कंधारे, पत्रकार सचिन मोरे, संभाजी पाटील डांगे, बाबुराव गबाळे आदींनी केले.