Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राजकीय धुसफूस!
नवी दिल्ली, ११ जून/खास प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागून १६ जूनला महिना होईल. पण दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील अस्वस्थता, खदखद आणि अंतर्गत धुसफूस कमी होण्याऐवजी आणखीच वाढली आहे. केंद्रातील सत्ताधारी आघाडीत तसेच भाजप-रालोआ आणि डाव्या आघाडीसारख्या विरोधकांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून तणाव निर्माण झाला आहे. सारेच राजकीय पक्ष व आघाडय़ा आपली ‘स्वच्छ’ प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून धडपडत आहेत.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गमावून बसलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांनी भाजपच्या पराभवासाठी कोणालाच का जबाबदार धरले गेले नाही, असा सवाल पक्षाच्या कोअर ग्रुपमध्ये एका पत्राद्वारे विचारला. जसवंत सिंहांचे हे बंड थंड करण्यासाठी त्यांना पक्षाचे संसदीय मंडळ तसेच केंद्रीय निवडणूक समितीतून काढून टाकण्याचा प्रस्ताव भाजपश्रेष्ठींमध्ये आज दिवसभर शिजत होता. पण पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह आणि ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या विरोधामुळे त्यावर निर्णय होऊ शकला नाही.
पंधराव्या लोकसभेच्या उद्घाटनीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माजी रेल्वेमंत्री व राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी लगावलेला टोला सत्ताधारी काँग्रेसच्या वर्मी लागला आहे. ‘मतलब निकल गया है तो पहचानते नही,’ असे म्हणत लालूंनी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यादेखत काँग्रेसवर जाहीरपणे दगाबाजीचा आरोप केला. सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या पडत्या काळात लालूंनी धर्मनिरपेक्षतेची लढाई खंबीरपणे लढत काँग्रेसला पूर्ण ताकदीने साथ दिली. पण केंद्रात बळ वाढताच काँग्रेसने त्यांना खडय़ाप्रमाणे दूर सारले, अशी टीका होत आहे. त्यातच लालूंनी लोकसभेत जिव्हारी लागणारी टीका केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. मित्रपक्षांचा वापर करून फेकून देणारा धोकेबाज पक्ष अशी तर प्रतिमा होणार नाही, या चिंतेने काँग्रेसश्रेष्ठींना ग्रासले आहे.
दुसरीकडे काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही कमालीची अस्वस्थता आहे. सोनिया गांधी आणि काँग्रेसचा गेली दहा वर्षे सातत्याने विरोध करणारे माजी लोकसभा अध्यक्ष संगमा यांनी विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल सोनिया गांधींची १०, जनपथ येथे जाऊन बिनशर्त माफी मागितली आणि त्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांनाही दिली. राष्ट्रवादीच्या जन्माला कारणीभूत ठरलेल्या पवार, संगमा आणि तारीक अन्वर यांच्या त्रिकुटापैकी संगमांनी माफी मागितली. त्यामुळे पवार आणि अन्वर यांना विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून चूक झाली याची उपरती कधी होणार असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांचे कट्टर समर्थक संगमा यांच्यावर चिडले आहेत. संगमांना ही नसती उठाठेव करण्याची काय गरज होती, असा प्रश्न पवारसमर्थक उपस्थित करीत आहेत आणि संगमा कसे बेभरवशाचे व कणाहीन आहेत, असे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.
उस्मानाबादमधून लोकसभेवर निवडून येताच सीबीआयच्या जाळ्यात अडकून बदनाम झालेल्या पद्मसिंह पाटील यांच्यामुळेही गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे खासदार असलेला पक्ष अशी आजवर निदान दिल्लीत ‘स्वच्छ’ प्रतिमा असलेल्या राष्ट्रवादीवर बदनामीचे शिंतोडे उडाले आहेत. पद्मसिंह पाटील यांना निलंबित करूनही समाजवादी पार्टी, बसपा, जनता दल युनायटेड, लोकजनशक्ती पार्टी अशा गंभीर गुन्हे असलेले खासदार बाळगणाऱ्या पक्षांच्या पंक्तीत राष्ट्रवादीचाही समावेश झाला आहे.
पराभवानंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी निस्तेज झाले असून कोणाचीही पकड राहिली नसल्यामुळे पक्ष सुंदोपसुंदीच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. त्यातच महिला आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी आघाडीत जेवढा संघर्ष होताना दिसत नाही, तेवढा संघर्ष भाजप-रालोआमध्ये पेटला आहे. रालोआचे संयोजक आणि जदयुचे अध्यक्ष शरद यादव यांनी महिला आरक्षणाच्या विरोधात विषप्राशन करण्याची धमकी दिल्यानंतर कल्याण सिंह यांनी त्यांना भाजपलाच वेठीस धरण्याचा सल्ला दिला. यादव यांनी हा सल्ला शिरोधार्ह मानत राष्ट्रीय सरचिटणीस विनय कटियार यांच्या माध्यमातून भाजपमध्येच आग लावण्याचा प्रयत्न केला आहे. कटियार यांनी कोटय़ांतर्गत कोटय़ाची वकीली सुरु केल्यामुळे महिला आरक्षणाच्या मुद्यावरून आता भाजपमध्येच दोन गट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयच्या कचाटय़ात सापडलेले केरळ माकपचे सचिव पिनरायी विजयन यांच्यामुळे स्वच्छ राजकारणाची भाषा करणाऱ्या माकपची बोलती बंद झाली आहे. विजयन यांच्या विरोधातील सीबीआयची कारवाई राजकीय द्वेषातून उद्भवली असल्याचे सांगून माकप नेतृत्व वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत असले तरी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनी पक्षाच्या भूमिकेशी विसंगत विधाने करून आगीत तेल टाकण्याचे काम सुरु ठेवले आहे. विजयन-अच्युतानंदन यांच्यातील सत्तासंघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात होणाऱ्या माकपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत दोघांच्याही भवितव्याविषयी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.