Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राज्याच्या एटीएस प्रमुखपदी के. पी. रघुवंशी
कोर्टाच्या तंबीनंतर गृह विभागाला आली जाग
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी

 

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून रेल्वेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक के. पी. रघुवंशी यांची आज नियुक्ती करण्यात आली. गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज सायंकाळी उशिरा विधानसभेबाहेर पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. उच्च न्यायालयाने आजच एका आदेशाद्वारे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुखपद येत्या चार आठवडय़ात भरण्याचे आदेश दिले होते.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख व सहआयुक्त हेमंत करकरे हे शहीद झाल्याने हे पद गेले सात महिने रिक्त होते. या पदावर कोणाचीही नियुक्ती न करता रेल्वेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक असलेल्या रघुवंशी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. आज मात्र जयंत पाटील यांनी रघुवंशी यांची महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुखपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले.
राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुखपद हे सहआयुक्त दर्जाचे आहे. मात्र रघुवंशी हे अतिरिक्त महासंचालक आहेत. आता रघुवंशी यांची नियुक्ती झाल्यामुळे या पदाचा स्तर उंचावावा लागणार आहे. अनामी रॉय हे राज्याचे महासंचालक असताना त्यांनी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकासाठी अतिरिक्त महासंचालक नेमण्याचा प्रस्ताव असल्याचे स्पष्ट केले होते. सहआयुक्तपद भरण्यासाठी मध्यंतरी गृहविभागाने सहा अधिकाऱ्यांची यादीही तयार केली होती. परंतु यापैकी कुणीही अधिकारी दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखपदी येण्यास इच्छुक नव्हते. त्यामुळे नव्या प्रमुखाची घोषणा होऊ शकली नव्हती. आता रघुवंशी यांच्यावरच ती जबाबदारी गृहखात्याने सोपविली आहे.
दरम्यान, मुंबईवरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतरही सुरक्षेच्या ठोस उपायांबाबत सरकार संवेदनाहीन असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांच्या मनात आपल्या जीवितवित्ताच्या सुरक्षेबाबत अजूनही साशंकता आहे, अशी तीव्र चिंता व्यक्त करीत मुंबई उच्च न्यायालयाने हेमंत करकरे यांच्या हौतात्म्यामुळे रिक्त झालेल्या एटीएस प्रमुख पदावर राज्य सरकारने येत्या चार आठवडय़ांत नेमणूक करावी, असा आदेश आज दिला होता.
कोर्टाच्या या तंबीनंतर गृहविभागाला जाग आली आणि त्यांनी आज हा निर्णय जाहीर केला.