Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पदपथावर झोपलेल्या दोघींना डम्परने चिरडले
मृतांमध्ये पाच महिन्यांची मुलगी
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी

 

भरधाव वेगातील डम्पर पदपथावर चढून झालेल्या दुर्घटनेत पाच महिन्यांच्या एका चिमुरडीसह एक महिला ठार झाली. ही दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री गेट वे ऑफ इंडिया येथे घडली. अपघातात अन्य चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजश्री मायकल डिसोझा (२०) आणि निर्मला दत्तू काळे (पाच महिने) या दोघी अपघातात मृत्यूमुखी पडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजश्री, निर्मला, मायकल डिसोझा (२४), लक्ष्मण पवार (५०), सोनू दत्तू काळे (२०), कविता लक्ष्मण पवार (१४) आणि रियान शेख (नऊ महिने) असे सहा जण गेट वे ऑफ इंडिया येथील टॅक्सी स्टॅण्डच्या फुटपाथवर नेहमीप्रमाणे झोपले होते. मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या डम्परने त्यांना चिरडले. यात राजश्री आणि निर्मला या जागीच ठार झाल्या, तर इतर गंभीररीत्या जखमी झाले.
अपघातानंतर इतर पादचाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात नेले. तसेच डम्परचा चालक सुरेंद्र साहनी (२३) याला पकडून कुलाबा पोलिसांच्या ताब्यात दिले. आपला गाडीवरील ताबा सुटल्याने डम्पर फुटपाथवर चढला असा दावा साहानी याने केला आहे. मात्र अपघात झाला त्यावेळी त्याने मद्यपान केले होते का हे तपासून पाहण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.
साहानी मद्यपान करून गाडी चालवत होता आणि म्हणूनच त्याचा गाडीवरील ताबा सुटून त्याने पादचाऱ्यांना चिरडल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.