Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

समुद्रमार्गे अतिरेकी हल्ल्याची खबर पोलिसांकडे जुलैपासूनच
अतिवरिष्ठांच्या अनुत्साहामुळे टेहळणीत शिथीलता
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी

 

दक्षिण मुंबईतील विशिष्ट ठिकाणे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर होती तसेच समुद्रमार्गे अतिरेकी हल्ला होणार असल्याबाबतची विशिष्ट माहिती कनिष्ठ अधिकाऱ्यांना जुलै महिन्यापासूनच मिळालेली होती आणि त्यानुसार आवश्यक ती काळजी घेण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला होता. मात्र त्या प्रयत्नांना अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनीच फारशी दाद दिली नाही, अशी धक्कादायक माहिती बाहेर येत आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राम प्रधान समितीपुढेही हे मुद्दे मांडण्यात आले असून त्यांनी आपल्या अहवालात याबाबत आक्षेप घेतल्याचे कळते.
२६/११ च्या हल्ल्यानंतर एकीकडे गुप्तचर यंत्रणांकडून काहीच माहिती मिळाली नसल्याचा दावा पोलीस आयुक्त हसन गफूर यांनी केला होता. वास्तविक गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीद्वारेच अनेक कनिष्ठ अधिकारी आपापल्या परीने अतिरेक्यांच्या कारवाया रोखण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता, असे यापैकी काही अधिकाऱ्यांशी खासगीरीत्या बोलताना स्पष्ट झाले आहे.
जुलै महिन्यापासूनच या दहशतवादी कारवायांची माहिती पोलीस दलाला मिळाली होती. याचे कारण स्पष्ट करताना सूत्रांनी सांगितले की, दक्षिण मुंबईतील अनेक कनिष्ठ अधिकारी या माहितीच्या आधारेच आपापल्या परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात गुंतले होते. मात्र या व्यवस्थेची माहिती अतिवरिष्ठांना सांगितल्यानंतरही त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने ते बैचेन झाले होते. समुद्रातून अतिरेकी येणार असल्याची विशिष्ट माहितीही जुलै महिन्यातच पोलीस दलाला मिळाली होती. त्यानुसार विशेष टेहळणी पथक निर्माण करण्यात आले होते.
बधवार पार्क येथे तर पोलिसांनी दररोज नाकाबंदी सुरू केली होती. मात्र या नाकाबंदीचा काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना त्रास होऊ लागला होता. परिणामी या कारवाईला अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. अखेरीस कनिष्ठ अधिकाऱ्यांना या कारवाईमध्ये शिथीलता आणावी लागली होती.
नियंत्रण कक्षापासून आदेश येण्यातही वेळ गेला..
२६/११ चा हल्ला झाला तेव्हा पोलीस आयुक्त हसन गफूर यांनी स्वत: नियंत्रण कक्षाचा ताबा घ्यायला हवा होता. ते स्वत: ओबेराय हॉटेल येथे होते. तेथून ते आदेश देत होते आणि ते आदेश नियंत्रण कक्षामार्फत अधिकाऱ्यांना दिले जात होते. यामध्ये वेळ जात होता, असा आक्षेपही प्रधान समितीच्या अहवालात घेण्यात आल्याचे कळते. सीएसटी येथे अतिरेक्यांनी गोळीबार केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे यांच्या मोबाईलवर एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने फोन केला होता. ‘गो अँड गेट दॅट बास्टर्ड’ असा आदेश त्यांना देण्यात आला होता. ते तडक घटनास्थळी गेले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर त्यांना पुढचे संदेश मिळालेच नाहीत. करकरे यांच्याबाबतीतही असेच झाले होते. त्यांनाही नियंत्रण कक्षाकडून योग्य ती माहिती मिळू शकली नाही, असेही स्पष्ट होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.