Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

प्रादेशिक

‘म्हाडा’ घरांच्या लॉटरीवर कोर्टबाजीची टांगती तलवार
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी

उच्च, मध्यम आणि अल्प उत्पन्न गटांसाठी मुंबईत उपलब्ध असलेल्या ३,८६३ तयार घरांचे वाटप ४.२० लाख इच्छुक अर्जदारांपैकी कोणामध्ये करायचे हे ठरविण्यासाठी ‘म्हाडा’ने १९ मे रोजी काढलेली संगणकीय लॉटरी कोर्टबाजीत अडकण्याची चिन्हे आहेत.

मुंबईची वाहतूककोंडी : हायकोर्टास हवेत कठोर उपाय
मुंबई, ११ जून/प्रतिनिधी

महानगरातील सहा लाख खासगी मोटारींखेरीज शेजारच्या ठाणे परिसरातून आणखी काही लाख खासगी वाहने रोज शहरात येण्याने दिवसेंदवस अधिक गंभीर होत चाललेली मुंबईतील वाहतूक समस्या आणि त्यातून निर्माण होणारे हवेचे प्रदूषण यातून मार्ग काढण्यासाठी कठोर उपाय योजण्याची वेळ आली आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

अनधिकृत झोपडय़ा हटविण्यासाठी विशेष दल उभारण्याचे आश्वासन
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी

मुंबई शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अनधिकृत झोपडय़ांबाबत चिंता व्यक्त करून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष दल स्थापन करण्यास सरकार तयार असल्याची घोषणा बुधवारी विधान परिषदेत केली. त्याआधी दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगर या बेकायदा वस्तीवर तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. मुंबई महापालिकेने मागणी केल्यास अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष दल स्थापन केले जाईल.

‘मॅट’ रद्दच करता येईल का पाहावे; उपसभापतींचे निर्देश
मुंबई, ११ जून/प्रतिनिधी

अनेक प्रशासकीय अधिकारी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली झालेले निलंबन ‘मॅट’मध्ये जाऊन रद्द करून घेतात. अनेकदा सरकारी बदल्याही रद्द करून घेण्यासाठी ‘मॅट’चा वापर होतो. त्यामुळे राज्य सरकारने अधिकाऱ्यांच्या या मुजोरीला लगाम घालण्यासाठी ‘मॅट’ रद्दच करता येईल का ते पाहावे, असे निर्देश आज विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी दिले.

‘मेरी पाँच साल की बच्ची ने मेरे हाथ में ही तडपतडपकर दम तोडा’
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी
‘उस रात मेरी पाँच साल की बेटी ने मेरेही हाथ मे तडप तडपकर दम तोडा जज साब, वो मेरी इकलौती बेटी थी, दुसरों के घर में काम करके मैंने उस को बडा किया था, जिसने उसको गोली मारी, उसको मैं कैसे भूल सकती हूँ’, असा आक्रोश करीत नफीसा कुरेशी हिने आरोपीच्या पिंजऱ्यात मान खाली घालून बसलेल्या पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला ओळखले.

लोकसभा मतदार संघ द्विसदस्य करण्याची ‘भारतीय स्त्री-शक्ती’ची मागणी
प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक पुरुष व एक महिला खासदार असावा
मुंबई, ११जून/प्रतिनिधी
गेल्या तेरा वर्षांपासून वादग्रस्त ठरलेले महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर लोकसभेत आणण्याचे शासनाचे प्रयत्न स्वागतार्ह आहेत. मात्र विरोधकांच्या दबावाखाली आरक्षणाचे प्रमाण कमी केल्यास तो महिलांचा विश्वासघात ठरेल. त्यामुळे स्त्री आणि पुरुषांना समान प्रतिनिधित्व देण्यासाठी देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघ द्विसदस्य करण्याची मागणी ‘भारतीय स्त्री-शक्ती’च्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. मेधा नानिवडेकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

ठाणे जिल्ह्यात गुप्तधनासाठी बालिकेचा बळी!
ठाणे, ११ जून/प्रतिनिधी

चिंचेच्या झाडाखाली लपविलेल्या गुप्तधनाची प्राप्ती व्हावी म्हणून अवघे पाच वर्षे वय असलेल्या एका अजाण, निष्पाप आणि कोवळ्या बालिकेचे प्रथम अपहरण व नंतर तिची निर्घृणपणे हत्या करून तिचा नरबळी देण्यात आल्याची हृदयद्रावक घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. झिंगी ऊर्फ रेश्मा दीपक जाधव असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.

थोबाडीत लगावणाऱ्या गुन्हेगाराची हत्या
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी

मुलाच्या मुस्कटात लगावल्यामुळे संतापलेल्या कुटुंबीयांनी एका अट्टल गुन्हेगाराची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. कांदिवलीच्या वडारपाडा येथे आज ही घटना घडली. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. शिवा पवार (३५) असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याने शिंगे कुटुंबातील एका मुलाला काही दिवसांपूर्वी थोबाडीत लगावली होती. त्याचा राग मनात ठेवून सुरेश पवार (३४), रवी शिंगे (२३), विवेक शिंगे (२९) आणि तानाजी शिंगे (३४) या चौघांनी बुधवारी सायंकाळी शिवाला निर्मनुष्यस्थळी नेले आणि तेथे त्याला बांबूंनी बेदम मारहाण केली. सुरेशने त्याच्या डोक्यात दगडही घातला. शिवावर ३४ गुन्हे दाखल असून त्यापैकी १० प्रकरणांमध्ये त्याला तुरूंगवासही झाला होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बाल कामगारविरोधी दिनानिमित्त आवाहन
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी
उद्याच्या (१२ जून) जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त बालमजुरी संपुष्टात आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कामगार आयुक्त आणि जिल्हाधिकारी (मुंबई शहर) यांनी केले आहे. धोकादायक उद्योगात बाल कामगारांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा असून ही एक अनिष्ट प्रथा आहे. त्यासाठी राज्य सरकारने अनेक कायदे केले आहेत. बाल कामगारांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून त्यांचे भविष्य घडविण्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.