Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

दहिसरमध्ये उभी राहतेय दुसरी धारावी
आयुक्त फाटक यांच्या निलंबनाची मागणी

संदीप आचार्य

दहिसरच्या गणपत पाटील नगरात दुसरी धारावी आकारास येत आहे. रोजच्या रोज अनधिकृत बांधकामे होत आहेत. तेथे वेश्या व्यवसायही सुरू झाला आहे. आता हजार फुटांची दुकाने बांधण्याचे काम सुरू आहे. मत्र पालिकेकडून या विरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे आता मी या ठिकाणी एक फलक लावणार आहे. येथे शॉपिंग मॉलसाठी जागा विकायची आहे. ज्यांना जागा हवी असेल त्यांनी या जागेचे ‘सोल सेलिंग एजंट’ म्हणून पालिका आयुक्त जयराज फाटक यांना भेटावे, असे संतप्त उद्गार विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेच्यावेळी भाजप मुंबईचे अध्यक्ष आमदार गोपाळ शेट्टी यांनी काढले.

मुंबईतील नव्हे, आफ्रिकेच्या जंगलातील रस्ते!
‘बीपीटी’च्या रस्त्यांबाबत नागरिकांचा सवाल

कैलास कोरडे

दगडी कोळशाच्या बेबंद वाहतुकीमुळे रे रोड- शिवडी-वडाळा परिसरातील रस्त्यांची अभुतपूर्व दुर्दशा झाली आहे. या भागांतील रस्ते एकतर कोळशाच्या धुरळ्याने भरले आहेत अथवा चिखलाने व्यापले आहेत. रस्त्यांच्या या बिकट अवस्थेमुळे, हे मुंबईतील नव्हे, आफ्रिकेच्या जंगलातील रस्ते असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विदेशातून आयात होणारा दगडी कोळसा हाजी बंदर येथे उतरविल्यानंतर डम्पर्समधून तो मोदी स्टोन कंपनी, जे-साईट व एस-साईट येथील साठवणूक साठवणूक डेपोंमध्ये हलविण्यात येतो.

सवरेदय वसाहतीतील रहिवाशांचा जीव टांगणीला
गेली आठ वर्षे इमारत धोकादायक

प्रतिनिधी

इमारतीचा पूर्ण ढाचा मोडकळीस आलेला, इमारतीच्या बाहेरील भागाचे प्लास्टर बहुतेक ठिकाणी पडलेले, गॅलेऱ्यांवरील स्लॅब कोसळलेली, इमारतीच्या आतील जिन्याला तडे गेलेले अशा अवस्थेत घाटकोपर (प.) येथील सवरेदय वसाहत आज उभी आहे. गेल्या १० वर्षापूर्वीच धोकादायक इमारत म्हणून जाहीर केलेल्या ‘सवरेदय’ची दुरुस्ती मालकातर्फे केली जात नाही आणि भाडोत्र्यांना इमारतीची दुरुस्ती करण्याची परवानगीही देण्यात येत नाही.

पहिलीवहिली अक्षरशाळा नवी मुंबईत सुरू होणार
प्रतिनिधी

सुलेखनाचे प्रशिक्षण देणारी देशातील पहिलीवहिली अक्षरशाळा नवी मुंबईत २२ जूनपासून सुरू होत आहे. सुलेखनकार अच्युत पालव यांच्या पुढाकाराने ही शाळा आकारास आली आहे. ‘अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी’ या अक्षरशाळेचे रविवार, १४ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्याचे प्रभारी कला संचालक हेमंत नागदिवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पाऊस लांबल्यास मुंबईकरांच्या पाणीपुरवठय़ात आणखी कपात?
प्रतिनिधी

मान्सून अद्यापही मुंबईत दाखल झालेला नसल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने बुधवारपासून मुंबई आणि उपनगरात १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. आणखी काही दिवस पाऊस मुंबईत दाखल झाला नाही तर मुंबईकरांना आणखी पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. महापालिकेत पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात जून महिन्याच्या अखेपर्यंत पुरेल, इतका पाणीसाठा शिल्लक असून खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने सध्या १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मुंबईत मान्सून दाखल कधी होतोय त्याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत. पुढील आठवडय़ातही पाऊस दाखल झाला नाही तर आणखी १० ते १५ टक्के पाणीकपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पाणीकपात १५ ते २५ टक्के होईल. मात्र याबाबत पुढील आठवडय़ातच निर्णय घेण्यात येणार आहे.

‘निसर्गाकडून निसर्गाकडे’ पालिकेचे अभियान
प्रतिनिधी

नुकत्याच साजऱ्या झालेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महापालिकेतर्फे पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात ‘निसर्गाकडून निसर्गाकडे’ या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध कारणांमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अतिरिक्त महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी ‘वृक्षारोपण आणि पातळ प्लास्टिकपासून सर्व नागरिकांचा बचाव’ या विषयावर जनजागृती मोहिम आयोजित केली होती. ग्लोबल वॉर्मिगचा धोका आणि मुंबईत विविध मार्गाने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीही राजीव यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठय़ा प्रमाणात झाडे लावण्याची मोहीम महापालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे, असे राजीव यांनी सांगितले.

मुलींना फसविणारा चॅटिंग रोमिओ गजाआड
प्रतिनिधी

इंटरनेट चॅटिंग करत दोघे विवाहबद्ध झाले, दोन वर्षांच्या संसारानंतर त्याचे खरे रूप दिसू लागले. पहिल्या पत्नीपासून असलेली दोन मुले, धर्माची माहिती लपवून तो युवराज असल्याचे भासवीत चॅटिंगद्वारे मुलींना जाळ्यात ओढीत असे. अशा या राबोडीतील चॅटिंग रोमिओ आतिक अहमद (३१) याला त्याच्या दुसऱ्या पत्नीने कारागृहाची दिशा दाखविली आहे. ठाण्याच्या राबोडीत राहणाऱ्या आतिक अहमद याची इंटरनेट चॅटिंगच्या माध्यमातून मेघा मेहता हिच्याशी मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि २००७ मध्ये दोघांनी पळून विवाह केला. दोन वर्षांनंतर त्याचे खरे रूप उघड झाले. नऊ वर्षांपूर्वी त्याचा उमेदा नावाच्या महिलेशी विवाह झालेला आहे. तिच्यापासून आठ व चार वर्षांची दोन गोंडस मुले आहेत. या फसवणुकीची खात्री पटल्यानंतर मेघा मेहता हिने आज वर्तकनगर पोलीस ठाणे गाठले आणि झालेल्या फसवणुकीबाबत तक्रार केली.

‘अग्निहोत्र’वर परिसंवाद
प्रतिनिधी

सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या वाढत्या रेटय़ात आपल्या कुळातील मूळ घराचा शोध घेण्यासाठी निघालेलर नील अग्निहोत्री आणि त्याच्या शोधाने सुरू झालेला प्रवास.. स्टार प्रवाहवरील अग्निहोत्र या मालिकेत उत्तमरीत्या रेखाटलेला आहे. या मालिकेच्या १५० व्या भागानिमित्त यातील कलाकारांशी थेट संवाद १३ जून रोजी साधता येणार आहे. पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या पु.ल. देशपांडे सभागृहात सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मालिकेत मुख्य भुमिका बजाविणारे शरद पोंक्षे, शुभांगी गोखले, विनय आपटे, मुक्ता बर्वे, सिद्धार्थ चांदेकर आणि इतर कलावंत उपस्थित राहणार आहेत. तसेच मालिकेचे लेखक अभय परांजपे, दिग्दर्शक सतीश गोडबोले आणि निर्माता श्रीरंग गोडबोले तसेच ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम अधिकारीही या परिसंवादात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

संतूरच्या भावविश्वात सीडीचे प्रकाशन
प्रतिनिधी

संतूर आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत यामध्ये विविध प्रयोग करणारे प्रख्यात संतुरवादक पं. उल्हास बापट यांनी आपल्या वादनशैलीने रसिकांची मने जिंकली आहेत. संतूरच्या स्वरतरंगांतून निर्माण होणारे भाव मनाला स्पर्श करीत असतात. या भावनेतून त्यांना भावगीत संतूरवर वाजविण्याची कल्पना सुचली. त्यांनी १० भावगीतांची ‘संतूरच्या भावविश्वात’ही सीडी तयार केली. रविवार, १४ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता दादर येथील शिवाजी मंदिरात या सीडीचे प्रकाशन प्रख्यात संगीतकार यशवंत देव आणि प्रख्यात व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांच्या हस्ते होणार आहे.