Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

सावेडीतील नाटय़गृहाच्या निधीलाच ग्रहण!
नगररचना विभागाने ३ महिने माहिती दडवली
राजू इनामदार
नगर, ११ जून

राज्य सरकारच्या ज्या निधीच्या आधारावर महापालिका सावेडीत नाटय़गृह बांधू इच्छित होती, त्या निधीलाच ग्रहण लागले आहे. मनपाच्या नगररचना विभागाने ही माहिती तब्बल ३ महिने महापौर व अन्य सत्ताधाऱ्यांपासून दडवून ठेवली. नगररचना विभागाने वेळीच याबाबत सत्ताधाऱ्यांना, तसेच गेली अनेक वर्षे शहरात किमान एक नाटय़गृह व्हावे म्हणून आंदोलने करणाऱ्या रंगकर्मीना दिली असती, तर यात सुधारणा करणे शक्य तरी झाले असते.

कीटकनाशकांचा मोठा साठा सील
जिल्ह्य़ातील ९ विक्रेत्यांवर छापे
नगर, ११ जून/प्रतिनिधी
परराज्यातील कंपनीने बनावट कीटकनाशकांचा पुरवठा केल्याच्या संशयातून जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ातील ९ विक्रेत्यांवर छापे टाकून कीटकनाशकांचा मोठा साठा सील केला. वेगवेगळ्या पथकांमार्फत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली तपासणी अजून चालूच आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची परस्पर भरती संशयास्पद - विखे
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान
नगर, ११ जून/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य यांना विश्वासात न घेता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर भरती प्रक्रिया सुरू केल्याबद्दल अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी आज कडक शब्दांत नाराजी व्यक्त करीत या भरतीबद्दल संशय व्यक्त केला.

५३ रिक्षा जप्त!
आरटीओ, वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
नगर, ११ जून/प्रतिनिधी

कोंबून भरलेले प्रवासी, दुर्दशा झालेली आसने, धुराचे प्रदूषण, कागदपत्रांचा पत्ताच नाही असे असतानाही रोज रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांना आज चाप लागला. आरटीओ व वाहतूक पोलिसांनी अशा ५३ रिक्षांवर कारवाई करून त्या जप्त केल्या. अनेक महिन्यांनंतर झालेल्या या कारवाईमुळे रिक्षाचालकांत खळबळ उडाली. अनेकांनी रिक्षा सोडविण्यासाठी पुढाऱ्यांमार्फत अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

ग्रामस्थांनी पकडलेल्या चोरास पोलिसांनी सोडून दिले
दि. १५ला रास्ता रोको
कर्जत, ११ जून/वार्ताहर

कर्जत पोलिसांना मागील अनेक चोऱ्यांमध्ये तपास तर लावताच आला नाही. मात्र, ग्रामस्थांनी चोरीच्या तयारीत असणाऱ्या चोरास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असता कोणतीच कारवाई न करता त्या चोरास सोडून देण्याचा पराक्रम कर्जत पोलिसांनी केला. मात्र, यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी (दि. १५) रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

शिर्डी-पुणतांबे रेल्वेमार्गाचे लवकरच दुहेरीकरण - मुनीअप्पा
‘नगर-परळी’साठीचे वर्षांत भूसंपादन
राहाता, ११ जून/वार्ताहर
शिर्डी-पुणतांबे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, तसेच साईनाथनगर स्थानकाचे विस्तारीकरण करून भक्तांसाठी तेथे धर्मशाळाही बांधण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री मुनीअप्पा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. या वेळी रेल्वेचे के. के. शर्मा, विनय मित्तल आदी उपस्थित होते.

‘निळवंडय़ा’च्या पाण्याबाबत अधिकाऱ्यांची कसरत!
कागदोपत्री होणार ३ टीएमसी कमी वापर
प्रकाश टाकळकर
अकोले, ११ जून

५० टक्क्य़ांऐवजी ७५ टक्के विश्वासार्हतेप्रमाणे निळवंडे धरणाचे नियोजन केल्यामुळे धरणाची साठवणक्षमता, धरणात जमा होणारे पाणी, लाभक्षेत्र यात कोणताही बदल होणार नसला, तरी कागदोपत्री निळवंडे धरणाचा पाणीवापर तीन टीएमसीने कमी होणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना, पाणीवापर व लाभक्षेत्र याचा कागदोपत्री मेळ घालताना अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

प्रशिक्षण
ए प्रिल महिन्याचे रखरखत्या उन्हाचे दिवस. शाळांमधून वार्षिक निकालपत्रके तयार क रण्याची कामे सुरू असतात. ३१ तारखेला रिझल्ट लावला की, १ मे ते १५ जून दीड महिन्याची सुटी असते. सगळेजण सुटीच्या प्लॅनिंगमध्ये मश्गूल. शिक्षक खोलीत या विषयावर गप्पा आणि चर्चेला ऊत आलेला असतो. आम्ही या वर्षी सिमला-कुलू-मनालीचं बुकिंग केलंय? साठेबाई. आमचा संपूर्ण ग्रुप युरोपला जातोय.. इति बुरसेसर! माझी सगळी सुट्टी मुंजीच्या तयारीत जाणार, २९ मे ला लेकाची मुंज काढलीय.. वैद्य बाई. आम्ही दोघेही महिनाभर चक्क मुलीकडे पुण्याला जाऊन राहणार आहोत..

दांडी मारणाऱ्या ९२ शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा
पाथर्डी प्रशिक्षण वर्गातील प्रकार
पाथर्डी, ११ जून/वार्ताहर
शिक्षण विभागाने प्रशिक्षण वर्गास सह्य़ा करून दांडी मारणाऱ्या ९२ शिक्षकांना आज कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. दरम्यान, या प्रकारामुळे सर्व शिक्षा अभियानाचा शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्य़ातच बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले. जि. प. सदस्य अर्जुन शिरसाठ यांनी काल येथील निऱ्हाळी विद्यालयातील प्रशिक्षण वर्गास भेट दिली.

गावात पोलीस पाटलाचे पद नसूनही कसूर केल्याची नोटीस!
तांबेवाडी इंधन प्रकरण
पाथर्डी, ११ जून/वार्ताहर
तांबेवाडी बनावट डिझेल-पेट्रोल प्रकरणात जिल्ह्य़ाच्या पुरवठा विभागाने टाकळीमानूर येथील कामगार तलाठी, ग्रामविकास अधिकारी व पोलीस पाटलास कर्तव्यात कसूर का केली, अशी नोटीस बजावली.

संगमनेरजवळ अपघातात लातूरचे पाचजण जखमी
संगमनेर, ११ जून/वार्ताहर

पुणे-नाशिक मार्गावरील कऱ्हे घाटानजीक मालमोटार व मिनीबसची समोरासमोर धडक होऊन पाचजण गंभीर जखमी झाले. सर्व जखमी लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे कर्मचारी असून, त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोविंद तावडे, व्ही. आर. दाडगे, वसंत गुंड, धनराज राठोड, पुरी (बसचालक) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. हे सर्व लातूरच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाचे कर्मचारी असून, विभागाशी संबंधित कामासाठी मिनीबसमधून (एमएच २३-३२९८) नाशिकला चालले होते. सकाळी सातच्या सुमारास कऱ्हे घाटानजीक त्यांच्या बसला समोरून येणाऱ्या मालमोटारीने (एमएच १७ सी ७७८५) धडक दिली. जखमींच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नाल्यात मृतदेह आढळला
नगर, ११जून/प्रतिनिधी
शहरातील हॉटेल ओबेरायजवळील नाल्यात मदनलाल धनराज बोरा (वय ५०, प्रोफेसर कॉलनी) यांचा मृतदेह व दुचाकी आढळून आली. तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. बोरा हे काल रात्रीच्या सुमारास आपल्या स्कूटरवरून घराकडे जात होते. अज्ञात वाहनाची धडक बसून जवळील नाल्यात ते पडले असावेत, अशी चर्चा आहे. आज सकाळी त्यांचा मृतदेह व दुचाकी घटनास्थळी आढळून आली.

पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत
शेवगाव, ११ जून/वार्ताहर
मृग नक्षत्र सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन झाले. शेवगावसहीत तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्याने उत्साह पसरला होता. मात्र, पुन्हा दडी मारल्याने चिंतेचे वातावरण आहे. खते, बियाणे खरेदीसाठी दुकानांत शेतकऱ्यांची गर्दी पावसाने दडी मारल्याने कमी होत आहे. मात्र पावसाने शेतीच्या मशागती मात्र जोरात सुरू झाल्या आहेत. यंदाही कपाशीची लागवड तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

शिक्षकांसाठी प्रशिक्षण काळाची गरज - शेळके
नेवासे, ११ जून/वार्ताहर
तालुक्यातील घोडेगाव येथील विद्यालयात सुरू असलेल्या शिक्षक प्रशिक्षण वर्गाला पं. स. सभापती अशोक शेळके यांनी भेट देऊन पाहणी केली. शिक्षकांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर वाळले यांच्या कामाचेही शेळके यांनी कौतुक केले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, शिक्षकांसाठी प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. गटशिक्षणाधिकारी राम हराळ यांनी सभापती शेळके यांचा सत्कार केला. यावेळी पं. स. सदस्य हौसाबाई कांबळे, गटसमन्वयक उदे, विषयतज्ज्ञ असीफ शेख, मिलिंद जामदार, क्रीडा समादेशक लोमटे, केंद्रप्रमुख कोल्हे, दळवी, दरंदले आदी उपस्थित होते. ठ

कृषी विद्यापीठात आज शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक
राहुरी, ११ जून/वार्ताहर

महात्मा फुले कृषी विद्यापीठात नगर जिल्ह्य़ातील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांच्या कल्पनेतून सन २००५ पासून साकारलेल्या या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे आज ४० मंच आणि १ हजार ५०० सदस्य सभासद आहेत. विद्यापीठात संशोधन प्रक्रियेतून निर्माण झालेले कृषी तंत्रज्ञान शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्या समन्वयातून प्रसारित करून कृषी विकासाला चालना देणे हा हेतू यामागे आहे. आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख असतील. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. हरी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होईल.

पत्रकार जोशींच्या कुटुंबियांना महापौरांतर्फे २१ हजारांची मदत
नगर, ११ जून/प्रतिनिधी

वाढदिवसाच्या भपकेबाज कार्यक्रमांना फाटा देत महापौर संग्राम जगताप यांनी दिवंगत पत्रकार मुकुंद जोशी यांच्या कुटुंबियांना साहाय्य म्हणून २१ हजार रुपयांचा धनादेश दिला. ज्येष्ठ पत्रकार व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांच्या हस्ते (कै.) जोशी यांच्या कुटुंबियांना ही मदत देण्यात आली. गुंदेचा यांनी या उपक्रमाबद्दल आयोजक प्रेरणा प्रतिष्ठान व महापौर जगताप यांचे कौतुक केले.या वेळी महापौर जगताप, तसेच प्रेरणा प्रतिष्ठानचे गणेश गोंडाळ, अफजल शेख, संभाजी पवार, विकी जगताप, योगेश सोबले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

वहिलेंकडून चुकीची माहिती;ग्राहक संघाकडून निषेध
नगर, ११जून/प्रतिनिधी
शहर हद्दीत ६ आसनी डिझेल रिक्षांना बंदी असतानाही ग्राहक कल्याण समितीच्या बैठकीत ‘त्यांना परवानगी आहे’, असे सांगून दिशाभूल करणारे शहर वाहतूक निरीक्षक तुकाराम वहिले यांचा ग्राहक संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. संघाचे पदाधिकारी प्रमोद मोहोळे यांनी सांगितले की, ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष कमाल फारूकी यांच्या उपस्थितीत समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत वहिले यांनी शहर हद्दीत ६ आसनी डिझेल रिक्षांना व्यवसायाची परवानगी आहे, अशी चुकीची माहिती दिली.

सामाजिक वनीकरणतर्फे वन महोत्सवास सुरुवात
नगर, ११ जून/प्रतिनिधी
पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, वृक्षलागवडीविषयी आस्था निर्माण व्हावी यासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे वनमहोत्सव सुरू करण्यात आला असून तो १५ ऑगस्टपर्यंत चालणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक एस. बी. फुले यांनी दिली. वनमहोत्सवात शाळा, संस्था व व्यक्तींना सामाजिक वनीकरण विभागामार्फत अत्यल्प दराने चांगल्या प्रतीची विविध प्रजातींची रोपे उपलब्ध करून दिली जातील. सामाजिक वनीकरण विभागाच्या पारनेर तालुक्यातील हंगे, नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी, संगमनेर तलुक्यातील ओझर, राहाता तालुक्यातील लोणी, शेवगाव तालुक्यातील खंडोबा माळ, जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील रोपवाटिकेत विविध रोपे उपलब्ध आहेत, असे फुले यांनी सांगितले.

तारांगण शो, खगोल प्रदर्शनाचे उद्घाटन
नगर, ११ जून/प्रतिनिधी

लार्सन अँड टुब्रो कंपनी आणि भास्कराचार्य अ‍ॅस्ट्रॉनॉमी रिसर्च सेंटरतर्फे सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारकात आयोजित तारांगण शो व खगोलशास्त्रविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन कंपनीचे सह सरव्यवस्थापक के. के. शुक्ला यांच्या हस्ते झाले. तीन दिवस चालणाऱ्या या उपक्रमाचा लाभ ९०० विद्यार्थी व पालक घेणार आहेत. तारांगणातून ग्रह-ताऱ्यांची ओळख त्यांना करून दिली जाईल, असे ‘भास्कराचार्य’चे अध्यक्ष प्रा. दिनेश निसंग यांनी सांगितले. उद्घाटनप्रसंगी श्रीमती शुक्ला, वासुदेव गायकवाड, एस. एस. देशमुख, व्ही. पी. पाटील, संतोष निकम, दीपाली टकले, माधवी अपस्तंभ, मंदार साबळे, संदीप सरोवरे, सागर कुलकर्णी आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन विक्रम एडके यांनी केले. आभार कैलास बेलेकर यांनी मानले.