Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

संघाच्या ‘राजधानी’त हेडगेवार चौकातील सौंदर्यीकरणाची हेळसांड
नागपूर, ११ जून / प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची ‘राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर येथेच वर्धा मार्गावर असलेल्या संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार चौकाच्या सौंदर्यीकरणाची कमालीची हेळसांड झाली आहे. विशेष म्हणजे, स्मारकाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या महापालिकेवर भाजपचीच सत्ता आहे, हे येथे उल्लेखनीय. वर्धा मार्गावर विमानतळाकडे वळताना लागणाऱ्या चौकाचे हेडगेवार चौक असे नामकरण करण्यात आले होते.

पावसाची हुलकावणी
नागपूर, ११ जून/ प्रतिनिधी

पावसाची प्रतीक्षा असताना मृगाचा प्रश्नरंभ कोरडा गेल्याने शेतकऱ्यांची तगमग वाढली असून रोजच मिळणारी पावसाची हुलकावणी नागरिकांनाही असह्य़ झाली आहे. मान्सून वेळेत येणार असा अंदाज असताना मान्सूनने मात्र ऐन वेळेवर विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. मान्सून आणखी तीन-चार दिवस विदर्भात येण्याची शक्यता नसल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला असून शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला आहे.

अकरावीसाठी अतिरिक्त तुकडय़ा वाढवणार
नागपूर, ११ जून / प्रतिनिधी

दहावीचा निकाल जाहीर होण्याला काही दिवस शिल्लक असले तरी अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा मोठय़ा प्रमाणावर वाढण्याची शक्यता असल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने शहरातील महाविद्यालयात वाढीव तुकडय़ांना मान्यता देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नागपूर विभागातून यंदा नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी शंभरावर प्रस्ताव आले असले तरी त्याला राज्य शासनाकडून लवकर मान्यता मिळेल, याची शाश्वती नाही.

अखेर ‘त्या’ बछडय़ाच्या आईचा शोध लागला
कोलारीच्या जंगलातील पुनर्मिलनाने वन कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले

नागपूर, ११ जून / प्रतिनिधी

भिवापूर तहसीलमधील कोलारी गावात विहिरीत पडलेल्या बिबटय़ाच्या दोन महिन्यांच्या बछडय़ाच्या आईचा शोध घेण्यात वन विभाग आणि वन्यजीवतज्ज्ञांच्या पथकाला अखेर यश आले. बुधवारी रात्री बछडय़ाची आई त्याला जंगलात सोबत घेऊन गेली. मायलेकाच्या मिलनाने वन्यजीवप्रेमींनी समाधानाचा सुस्कारा सोडला. बिबटय़ाचा हा बछडा सोमवारी दुपारी नागपूरपासून ५५ किमी अंतरावरील कोलारी गावातील विहिरीत पडला होता. सुमारे २५ फूट उंचीवरून पडल्याने त्याला किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्याला उपचारासाठी महाराजबाग प्रश्नणिसंग्रहलयात दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.

पहिलीतील ‘बाराखडी’ कालबाह्य़!
नागपूर, ११ जून/ प्रतिनिधी

इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना या वर्षापासून नवीन पुनर्रचित अभ्यासक्रम देण्यात आला आहे. यानुसार विद्यार्थ्यांना अक्षरओळखीशिवाय शब्दवाचन शिकविले जाणार आहे. या नवीन बदलामुळे ‘बाराखडीची उजळणी’ न करताच मुलांना मुळाक्षरे समजून घ्यावी लागणार असून, वर्गातील ‘क, ख, ग, घ’च्या घोकंपट्टीचा एका सुरातील आवाज मात्र ऐकायला मिळणार नाही. पहिलीच्या वर्गात प्रवेश म्हटले की, नवी पाटी, पेन्सिल आणि जोडीला अंक व अक्षर लिपीचे छोटे पुस्तक ठरलेले असे.

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे निदर्शने
नागपूर, ११ जून / प्रतिनिधी

विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्यावतीने महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीच्या केंद्रांसमोर निदर्शने करण्यात आली. नागपुरात महावितरणच्या दोन्ही झोनल कार्यालयांपुढे आंदोलन करण्यात आले. नागपूर ग्रामीणसमोरील आंदोलनात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियातील सदस्य सहभागी होते. या आंदोलनाची दखल घेऊन कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र लढा उभारण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकार आणि व्यवस्थापनावर राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. काटोल रोडवरील विद्युत भवनसमोर अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे अध्यक्ष क. कृ. हरदास आणि गड्डीगोदाम कार्यालयासमोरील शंकर पहाडे यांचे भाषण झाले. तसेच, मेघना वाहोकर, रामदास माहुलकर, दत्ता धामणकर, श्याम देशमुख, अशोक शिंदे, चंद्रकांत तमगरे, निंबोळकर, पाटणे, मीठे आणि नरदोडकर आदींची भाषणे झाली.

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना तडजोड निधीचे वाटप
नागपूर, ११ जून / प्रतिनिधी

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप समारंभात तडजोड निधीचे वाटप करण्यात आले. सेवानिवृत्तीच्या दिवसाचे औचित्य साधून रेल्वे व्यवस्थापनाने हा कार्यक्रम घेतला. मंडल रेल्वे व्यवस्थापक शरदचंद्र जेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ३० कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा तडजोड निधी म्हणून २ कोटी २७ लाख २१ हजार ६०० रुपयांचे वाटप केले. यावेळी कर्मचाऱ्यांना परिचय पत्र, सेवा प्रमाणपत्र, चिकित्सा पुस्तिका आणि रेल्वे मंडल द्वारा विशेषत्वाने प्रकाशित मार्गदर्शिका आणि रजत सेवा पदकही प्रदान करण्यात आले.
शरदचंद्र जेठी यांनी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा चिंतताना भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास रेल्वे कार्यालयाचे दार त्यांच्यासाठी सदैव खुले राहील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन सूर्यप्रकाश यांनी केले. त्यांनी रेल्वे रुग्णालयात लागू असलेल्या सेवा निवृत्त शुल्क स्वास्थ्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन निवृत्त कर्मचाऱ्यांना केले. यावेळी अल्का मेहरा, एच.पी. नायक, ए.के. सत्पथी, ए.के. मिश्रा, डॉ. पी.के. सिंग, कांबळे, प्रदीप कुमार, लभाने आदी रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मेयोत दृष्टीदान दिवस
नागपूर, ११ जून / प्रतिनिधी

मेयो सवरेपचार रुग्णालयात आणि जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कक्षात आज दृष्टिदान दिवस साजरा करण्यात आला. थोर नेत्रतज्ज्ञ डॉ. भालचंद्र यांनी दृष्टिदानाच्या क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाचे स्मरण करण्यासाठी देशभर दृष्टिदान दिवस साजरा करण्यात येतो. मेयो सवरेपचार रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देशमुख यांच्या हस्ते डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. प्रश्नस्ताविक जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. दीपक थेटे यांनी केले. डॉ. खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दारलिंगे यांनी केले. आभार सहारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेत्रचिकित्सा सहाय्यक कुलकुलेवार, सय्यद यांनी मदत केली.