Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

नवनीत

जी व न द र्श न
ग्रंथसेतू

 

प्रेषित हज़्‍ारत मुहम्मद (स.) साहेबांवर दिव्य कुरआनचे अवतरण झाल्याने अरबस्तानातील असुशिक्षित, निरक्षर आणि जहाल मानवी समाजामध्ये एक विलक्षण क्रांती घडून आली. पैगंबर साहेबांची अध्यात्मिक आणि मानसिक रचना दिव्य प्रकाशाने करण्यात आली होती. या प्रकाशासमोर सूर्य आणि चांद्रप्रकाश या अत्यंत कमी दर्जाच्या वस्तू होत. त्यांचा प्रकाश ज्ञानाने सुसंगत आणि सुसज्जित होता. त्यांच्या अस्तित्वात ज्ञान, त्यांना प्रदान करण्यात आलेल्या चमत्कारात ज्ञान, त्यांच्या वाणीत ज्ञान, त्यांच्या आचरणात ज्ञान आणि त्यांच्या अनुयायांना देखील ज्ञानाचा अफाट खजिना प्रदान करण्यात आला आहे. इमाम औज़ाई लिहितात, की कुरआनच्या लाभदायक प्रसादामुळे त्यांच्या (प्रेषितांच्या) अनुयायांनी जगात सर्वात अधिक ग्रंथ लिहिले. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची वैविध्यता जगातील कुठल्याही समाजात आढळणार नाही. त्यांच्या लिखाणाच्या विपुलतेने ग्रंथालये फुलून गेली. हजार-दोन हजार, लाख-दोन लाख नव्हे तर कोटय़वधी ग्रंथ आजही पाहता येतील. ही ग्रंथालये त्या अनमोल खजिन्यांचा उर्वरित भाग आहेत, जी वैमनस्यातून अथवा शत्रूंच्या हल्ल्यातून उद्ध्वस्त करण्यापासून वाचविण्यात आली आहेत. मंगोल ताताऱ्यांनी जेव्हा बगदादवर हल्ला चढविला तर मुसलमानांनी आपल्या बचावाकरिता शहराच्या मध्यभागी वाहणाऱ्या दजला नदीवरचे पूल तोडून टाकले. मंगोलांनी जवळचे एक ग्रंथालय फोडले आणि त्यातील पुस्तके दजला नदीत टाकून एक रुंद सेतू तयार केला, ज्यावरून एका वेळेला पाच गाडय़ा जाऊ शकत होत्या. ही पुस्तके केवळ एका ग्रंथालयातील होती. इतिहासकार पुढे लिहितात, की पाण्यात या पुस्तकांची शाई विरघळल्याने दजला नदीचे पाणी महिनाभर काळेभोर राहिले आणि तेथील उलेमा महिनाभर त्या पाण्याचा शाई म्हणून वापर करीत होते. त्या वेळी बगदाद शहरात अशी कितीतरी ग्रंथालये, वाचनालये आणि ग्रंथआगारे होती.
अनीस चिश्ती

कु तू ह ल
नाक्षत्रकाळ व सांवासिककाळ
ग्रहाचा नाक्षत्रकाळ आणि सांवासिककाळ म्हणजे काय?
ग्रहाचा नाक्षत्रकाळ हा त्या ग्रहाचा सूर्याभोवतीचा प्रत्यक्ष प्रदक्षिणाकाळ असतो. सूर्यावरून निरीक्षण केल्यास, एखादा ग्रह आकाशातल्या नक्षत्रांच्या पाश्र्वभूमीवर ज्या काळात पुन्हा त्याच ठिकाणी आलेला दिसेल, त्या काळाला त्या ग्रहाचा नाक्षत्रकाळ म्हणतात. बुध, शुक्र, मंगळ यांचे नाक्षत्रकाळ हे अनुक्रमे हे ८८, २२५ आणि ६८७ दिवस तर गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून यांचे नक्षत्रकाळ हे ११.९, २९.४, ८३.७ आणि १६३.७ वर्षे इतके भरतात.
विविध ग्रहांच्या युती, प्रतियुतीसारख्या घटना अनुभवण्यासाठी पृथ्वी, सूर्य आणि ग्रह यांच्या एकमेकांसापेक्ष विशिष्ट रचना घडून यायला हव्यात. पृथ्वी स्थिर असती आणि फक्त ग्रह फिरत असते तर या रचना घडून येण्यास प्रत्येक ग्रहाच्या प्रदक्षिणाकाळाइतकाच काळ लागला असता. पण पृथ्वी स्थिर नसल्यामुळे अशा एकमेकांसापेक्ष विशिष्ट रचना जमून येण्यास लागणाऱ्या कालावधीत फरक पडतो. उदाहरणार्थ, मंगळाच्या दोन युतींमधील कालावधी हा त्याच्या प्रदक्षिणाकाळाइतका ६८७ दिवस नव्हे, तर ७८० दिवस इतका असतो. ग्रहाच्या या युती किंवा प्रतियुतीसारख्या दोन समान घटनांदरम्यानच्या या कालावधीला ग्रहाचा सांवासिककाळ म्हणतात.
बुध, शुक्र, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून या इतर ग्रहांचे सांवासिक काळ हे अनुक्रमे ११६, ५८४, ३९९, ३७८, ३७०, ३६७ दिवस इतके आहेत. गुरू आणि त्यापुढच्या ग्रहांचे सांवासिककाळ हे त्यांच्या प्रदक्षिणाकाळापेक्षा लहान आहेत. या दूरच्या ग्रहांची सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेची गती ही धिमी असल्यामुळे हे ग्रह दोन युतींदरम्यानच्या काळात फारसे पुढे सरकलेले नसतात. त्यामुळे पृथ्वीला आपली प्रदक्षिणा पूर्ण करून या नव्या जागी येण्यास फारसा अतिरिक वेळ लागत नाही व या दूरच्या ग्रहांच्या युती वर्षभरानंतर अल्पकाळातच घडून येतात.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
भालचंद्र खेर

साहित्यिक, पत्रकार, संपादक म्हणून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या भालचंद्र खेर यांचा जन्म अहमदनगर जिल्हय़ातील कर्जत या गावी १२ जून १९१७ रोजी झाला. साहित्याची आवड श्री. म. माटे यांच्यासारखे गुरुजन लाभल्यामुळे निर्माण झाली. बी.ए. झाल्यानंतर वकिलीची पदवी त्यांनी मिळविली. पण कायद्याच्या कलमात न अडकता त्यांनी लेखणीच्या कलमात रस घेतला. पुढे पत्रकारिता हा व्यवसाय पत्करला. ‘केसरी’त अनेक वर्षे ते सहसंपादकाच्या पदावर काम करत होते. या काळात केसरी शताब्दीनिमित्ताने सात हजार पानांचा समग्र टिळक ग्रंथ त्यांनी संपादित केला.
मराठी साहित्यात चरित्रात्मक कादंबरी हा वाङ्मयप्रकार प्रथम आणण्याचे श्रेय खेर यांनाच दिले होते. त्यांनी सावरकरांच्या जीवनावर ‘यज्ञ’, लालबहादूर शास्त्रींवर ‘अमृतपुत्र’, आंबेडकरांच्या जीवनावर ‘प्रबुद्ध’, चार्ली चॅप्लिनच्या जीवनावर ‘हसरे दु:ख’, चापेकर बंधूंवर ‘क्रांतिफळे’,याशिवाय श्रीकृष्ण, चाणक्य तसेच त्यांची आत्मचरित्रात्मक ‘आठवणींची ‘स्मृतियात्रा’ व ‘स्मृतिसुगंध’ ही पुस्तके गाजली. नेहरू कुटुंबीयांवर लिहिलेल्या ‘आनंदभवन’ला सोव्हिएत लँड नेहरू अ‍ॅवॉर्ड मिळाला. ‘हिरोशिमा’ या कादंबरीलाही सोव्हिएत लँड नेहरू अ‍ॅवॉर्ड तसेच ‘हसरे दु:ख’ला महाराष्ट्र शासनाच्या न. चिं. केळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अगदी अलीकडे त्यांच्या ‘क्रांतिफुले’ या ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्त पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या पुस्तकाचे सर्व भाषांमध्ये अनुवाद झाले पाहिजेत. तसेच ‘क्रांतिफुले’ या पुस्तकाचा अनुवाद मी स्वत: करेन, असे म्हटले. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या या मनोरंजनात्मक नसतात. वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी सुभाषचंद्र बोस, चार्ली चॅप्लिन यांच्या जीवनावरील कादंबऱ्या लिहिताना रशिया, अमेरिका तसेच लंडन आदी युरोपियन राष्ट्रांत जाऊन आले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
वृक्षाचे दु:ख
छोटय़ाशा मुलाची आणि विशाल अशा वृक्षाची मैत्री होती. मुलगा त्या झाडावर चढायचा. त्याच्याशी खेळायचा. गप्पा मारायचा. त्याची फळे खाऊन भूक भागवायचा. त्याच्या फांद्यांवर बसून घोडा घोडा करायचा. कधी झोका बांधून झोके घ्यायचा. झाडालाही मुलगा फार आवडायचा. ते मुलाच्या येण्याची रोज अधीरपणे वाट पाहात राहायचे. त्या झाडाच्या मनात यायचे, या मुलासाठी मी सावली देईन. माझी फळे देईन. माझ्या फांद्यांचा खूप मोठा विस्तार चहूदिशांना करीन. गर्द पानांनी माझे सारे अंग सजवून अशीच रोज त्याच्या येण्याची वाट पाहीन.शाळेत होता तोपर्यंत मुलगा झाडाशी खेळायला रोज यायचा. जसा मोठा होत चालला तसे त्याला मित्र मिळाले. मैत्रीण मिळाली. करमणुकीचे वेगवेगळे प्रकार सापडले. नाटक, सिनेमा, हॉटेल, पिकनिक, मित्रांच्या टोळक्यात रस्त्याच्या कोपऱ्यात उभे राहून गप्पा छाटणे, यात त्याचा दिवस कधी संपे त्यालाच कळत नसे. झाड मात्र रोज दिवसभर आतुरतेने त्याची वाट पाही. जरा वेळाने येईल, त्याची इच्छा असेल मला भेटायची, पण त्याला बापडय़ाला सवडच झाली नसेल तर काय बरं करेल, अशी स्वत:ची समजूत काढत राही. जसजसे अंधारून यायला लागे, तसा झाडाचा धीर संपून जाई. ते फार उदास होई. आपल्या मित्राची त्याला फार फार आठवण येई. त्याची फळे गळून पडून जात. पाने कोमेजून देठ खाली झुकवत, फांद्या आपला विस्तार आवरून घेत. झाड अगदी केविलवाणे दिसायला लागे. अशी महिनोन्महिने झाडाने वाट पाहिली. मग वर्षे गेली. मुलाचे शिक्षण संपले. नोकरी मिळाली. चांगली बायको मिळाली. काही काळाने त्याच्या सुखी संसारात एक बाळ जन्माला आले. झाड वाट पाहून पार थकून गेले. येणारेजाणारे म्हणू लागले, काय देखणा प्रचंड वृक्ष होता. पण पाहता पाहता पार रया गेली त्याची. पानांचा रंग, तजेलदारपणा नाहीसा झालाय. फांद्या झुकल्या आहेत. म्हातारा वाटायला लागला. आतून वाळवीनं पोखरलाय काय कुणास ठाऊक? एके दिवशी एक कुटुंब झाडासमोरून स्कूटरवरून चालले होते. स्कूटर थांबली. स्कूटरवरचा तरुण आपल्या मुलाला घेऊन झाडाजवळ आला. दोन्ही काखेत हात घालून मुलाला उचलून त्याने एका फांदीवर बसवले. तरुण आपल्या मुलाला म्हणाला, ‘‘तुझ्याएवढा होतो तेव्हापासून हे झाड माझा जिवलग मित्र आहे. पुढे मोठा होत गेलो तसा अनेक व्यापात गुंतलो. पण याच्या आठवणी माझ्या मनात कायम हिरव्या राहिल्या. आजही एकटे वाटते तेव्हा याची आठवण करतो आणि माझी उदासीनता दूर होते. मी मनातल्या मनात छोटा होऊन या झाडाच्या कुशीत शिरतो.’’ वृक्षाला ते ऐकून फार आनंद झाला. त्याची खिन्नता दूर पळाली. त्याच्या पानांमध्ये जीवनरस वाहू लागला. वृक्ष पुन्हा टवटवीत झाला. खूप मैत्री असणं म्हणजे एकत्र कॉफी प्यायला जाणं, तासन्तास फोनवर बोलणं, सारखं भेटणं, पिक्चरला जाणं, भटकणं नव्हे. दूर असलं, भेटलं नाही तरी मैत्री मनात कायम जागती असणं महत्त्वाचं. मित्राच्या आठवणीनंही दु:ख कमी होणं, आनंद होणं महत्त्वाचं.
संकल्प- मैत्रीचा अर्थ मी समजून घेईन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com