Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

नवी मुंबई विमानतळाला मेट्रोचे कोंदण
पहिला टप्पा- बेलापूर-खारघर-कळंबोली-तळोजा- (२४ किमी)
दुसरा टप्पा- वाशी ते विमानतळ (१९ किमी)
तिसरा टप्पा- खारकोपर-उलवे-विमानतळ (१४ किमी)
नवी मुंबई, (प्रतिनिधी)

नवी मुंबईत उलवे भागात उभ्या रहाणाऱ्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळास पूरक ठरू शकेल, अशा तीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांची घोषणा गुरुवारी सिडकोने केली. वरळी-न्हावा शेवा सागरी पुलावरून नवी मुंबईत विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सागरी पुलास अगदी लागूनच खारकोपर-उलवे-विमानतळ असा १९ किलोमीटर अंतराचा मेट्रो प्रकल्प साकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विशेष म्हणजे, शीव-पनवेल महामार्गावर वाशी-विमानतळ अशी मेट्रो धावणार आहे.

अतिक्रमण घोटाळ्याची चौकशी चार महिन्यांत पूर्ण होणार
नवी मुंबई / प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेत खळबळ उडवून देणाऱ्या अतिक्रमण घोटाळ्याची येत्या चार महिन्यांमध्ये चौकशी पूर्ण होईल, अशी घोषणा आयुक्त विजय नाहटा यांनी केली आहे. अतिक्रमण विभागातील गेल्या सहा वर्षाच्या कारभाराचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या काळात अतिक्रमण हटविणाऱ्या कंत्राटदाराने सादर केलेल्या सर्व चलनांची कसून तपासणी केली जात आहेत. हे लेखापरीक्षण पूर्ण होण्यास चार महिन्यांचा कालावधी लागेल, तसेच यासंदर्भात एक अहवाल स्थायी समितीपुढे मांडण्यात येईल, अशी घोषणा आयुक्तांनी केली आहे.

अखेर हिरानंदानी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मिळणार सर्वसामान्यांना उपचार
बेलापूर/वार्ताहर :
नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या जागेत असलेल्या मे. हिरानंदानी हेल्थ केअर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये पालिकेच्या रुग्णालयातील ५० टक्के रुग्णांना केवळ मोफत खाटा देण्याच्या प्रस्तावास मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. यावेळी आयुक्त विजय नाहटा यांनी या प्रस्तावास उशीर झाल्याप्रकरणी तत्कालीन अधिकाऱ्यांस जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले.

‘बंदर उपभोक्त्यांना यापुढे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा’
उरण/वार्ताहर :
जेएनपीटी बंदराच्या उपभोक्त्यांमुळेच बंदराने आर्थिक प्रगती व विकास साधला आहे. या उपभोक्त्यांना यापुढे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरविण्यात येणार असल्याची ग्वाही जेएनपीटीचे अध्यक्ष एस.एस. हुसैन यांनी बंदराच्या २०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दिली.
जेएनपीटीचा २०वा वर्धापनदिन शनिवारी साजरा करण्यात आला. हॉटेलमध्ये आयोजित छोटेखानी समारंभात जेएनपीटीच्या १५ आंतरराष्ट्रीय बंदर उपभोक्त्यांचा स्मृतिचिन्हे देऊन अध्यक्ष एस.एस. हुसैन यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. यावेळी हुसैन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हुंडय़ासाठी पत्नीचा छळ करणाऱ्यास अटक
बेलापूर/वार्ताहर

माहेरहून हुंडय़ाचे दहा लाख रुपये आणावेत यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीस रबाळे पोलिसांनी अटक केली. अरविंदकुमार ओझा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ओझा हा पत्नी प्रभाचा गेल्या तीन महिन्यांपासून १० लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी तिचा छळ करीत होता. त्याचप्रमाणे ओझा याने प्रभाला लग्नात मिळालेले २५ तोळे सोने विश्वासघाताने हडप केले. रबाले पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.

जी. आर. पाटील शेकापमधून बाहेर
पनवेल/प्रतिनिधी :
शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस आणि ज्येष्ठ नेते जी. आर. पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शेकापमध्ये गेली पाच वर्षे सक्रीय असणारे पाटील हे आमदार विवेक पाटील यांचे समर्थक मानले जात. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी राजीनामा धाडल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पाटील यांनी हा निर्णय घेतल्याने शेकापच्या गोटामध्ये अस्वस्थता आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेकापच्या सहभागामुळे शिवसेनेचे उमेदवार विजयी होऊनही पाटील यांनी पक्षत्याग केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शेकापमध्ये दाखल होण्यापूर्वी काँग्रेसमध्ये असणारे पाटील आता कोणत्या पक्षात जातात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे.

नवीन पनवेलमधील ३५० झोपडय़ा जमीनदोस्त
पनवेल/प्रतिनिधी :
नवीन पनवेलच्या सेक्टर चारमधील ३५० झोपडय़ा सिडकोच्या अतिक्रमणाविरोधी पथकाने बुधवारी जमीनदोस्त केल्या. औद्योगिक कारखान्यांसाठी राखून ठेवलेल्या या भूखंडावर अतिक्रमण करून अनेक परप्रश्नंतीयांनी संसार थाटले होते. गेल्या काही महिन्यांत या अतिक्रमणात वाढ झाल्याने सिडकोने ही कारवाई केली. सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईसाठी तीन जेसीबी, सहा ट्रक आणि शंभर कामगारांचा वापर करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सिडकोच्या सुरक्षारक्षकांसह पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. सिडकोचे सहाय्यक नियंत्रक दिलीप भोईर, प्रकाश देशमुख, नितीन कांबळे, दिलीप गांगुर्डे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. झोपडीधारकांकडून विशेष प्रतिकार न झाल्याने ही कारवाई झटपट आटोपली. दरम्यान, सिडकोच्या गस्तीपथकाला गेल्या दोन- तीन दिवसांत या ठिकाणी ४००-५०० झोपडय़ा उभारल्याचे आढळल्याने ही धडक कारवाई करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.