Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नवी मुंबई विमानतळाला मेट्रोचे कोंदण
पहिला टप्पा- बेलापूर-खारघर-कळंबोली-तळोजा- (२४ किमी)
दुसरा टप्पा- वाशी ते विमानतळ (१९ किमी)
तिसरा टप्पा- खारकोपर-उलवे-विमानतळ (१४ किमी)
नवी मुंबई, (प्रतिनिधी)

नवी मुंबईत उलवे भागात उभ्या रहाणाऱ्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळास पूरक ठरू शकेल, अशा

 

तीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांची घोषणा गुरुवारी सिडकोने केली. वरळी-न्हावा शेवा सागरी पुलावरून नवी मुंबईत विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सागरी पुलास अगदी लागूनच खारकोपर-उलवे-विमानतळ असा १९ किलोमीटर अंतराचा मेट्रो प्रकल्प साकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विशेष म्हणजे, शीव-पनवेल महामार्गावर वाशी-विमानतळ अशी मेट्रो धावणार आहे. ही मेट्रो मानखुर्द-पनवेल रेल्वेस समांतर धावणार असल्याने एका बाजूस लोकलचा खडखडाट तर दुसरीकडे मेट्रोचा राजेशाही थाट प्रवाशांना अनुभवता येणार आहे. या दोन मार्गाच्या सोबतीने बेलापूर-खारघर-कळंबोली-तळोजा या मार्गावरही असाच प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील यांनी गुरुवारी या संदर्भात घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत सिडकोचे मुख्य अभियंता आणि व्यवस्थापक सतीश देशपांडे तसेच रेल्वे प्रकल्पांचे अधीक्षक अभियंता के.वाय.जोशी हे दोन वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. ठाणे-नेरुळ-उरण या बहुचर्चित उपनगरीय रेल्वे प्रकल्पाऐवजी या भागात मेट्रो रेल्वे सुरू करावी, असा प्रस्ताव मध्यंतरी सिडकोने पुढे आणला होता. यासाठी नवी मुंबईत कोणकोणत्या भागात मेट्रो प्रकल्प राबवता येईल, यासाठी सिडकोने दिल्ली मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूकही केली होती. या अधिकाऱ्यांनी सिडकोला नुकताच एक सर्वेक्षण अहवाल सादर केला असून या अहवालाच्या माध्यमातून शहरात तीन ठिकाणी रेल्वे प्रकल्प उभारण्याची घोषणा सिडकोने केली. नेरुळ-उरण मार्गावर मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार नाही, असेही यावेळी सिडकोने स्पष्ट केले. या संदर्भातील एक वृत्त नुकतेच वृत्तान्तने दिले होते. दरम्यान, उलवे भागात उभ्या रहाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास हे तीनही मेट्रो प्रकल्प जोडले जाणार आहेत, असे नकुल पाटील यांनी स्पष्ट केले. बेलापूर-खारघर-कळंबोली-तळोजा या २४ किलोमीटर अंतराच्या मेट्रो प्रकल्पावर पहिल्या टप्प्यात काम सुरू होईल, अशी माहिती सिडकोचे मुख्य अभियंता सतीश देशपांडे यांनी यावेळी पत्रकारांना दिली. यानंतरच्या टप्प्यात वाशी ते विमानतळ (१९ किमी) आणि पुढच्या टप्प्यात खारकोपर-उलवे-विमानतळ (१४ किमी) अशी मेट्रोची आखणी करण्यात येणार आहे. मुंबईहून विमानतळाकडे येण्यास सोयीचे ठरावे, यासाठी उभारल्या जाणाऱ्या शिवडी-न्हावा शेवा पुलास अगदी लागूनच १४ किलोमीटर अंतराच्या मेट्रो प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण भागातील भविष्यातील लोकसंख्या सुमारे ४० लाखाच्या घरात जाण्याची शक्यता सिडकोने गृहीत धरली आहे. हे लक्षात घेता हे तीनही मेट्रो प्रकल्प या भागाच्या विकासासाठी गरजेचे आहेत, असा दावा नकुल पाटील यांनी यावेळी केला. या प्रकल्पासाठी सध्याच्या घडीस प्रत्येक किलोमीटर अंतरावर १४० कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. येत्या वर्षभरात बेलापूर, खारघर, कळंबोली, तळोजा या मार्गाचे काम सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हे तीनही मेट्रो प्रकल्प खारफुटीत मोडत नसल्याची माहिती सिडकोचे मुख्य अभियंता सतीश देशपांडे यांनी दिली. यापैकी एकही प्रकल्प हा भुयारी मार्गाचा नसेल, असे स्पष्ट करतानाच एलिव्हेटेड पद्धतीने या मार्गाचीउभारणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.