Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अतिक्रमण घोटाळ्याची चौकशी चार महिन्यांत पूर्ण होणार
नवी मुंबई / प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेत खळबळ उडवून देणाऱ्या अतिक्रमण घोटाळ्याची येत्या चार महिन्यांमध्ये चौकशी पूर्ण होईल, अशी घोषणा आयुक्त विजय नाहटा यांनी केली आहे. अतिक्रमण विभागातील गेल्या सहा वर्षाच्या कारभाराचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या

 

काळात अतिक्रमण हटविणाऱ्या कंत्राटदाराने सादर केलेल्या सर्व चलनांची कसून तपासणी केली जात आहेत. हे लेखापरीक्षण पूर्ण होण्यास चार महिन्यांचा कालावधी लागेल, तसेच यासंदर्भात एक अहवाल स्थायी समितीपुढे मांडण्यात येईल, अशी घोषणा आयुक्तांनी केली आहे.
नवी मुंबई परिसरातील अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराने महापालिकेची सुमारे २६ लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. याप्रकरणी महापालिकेच्या तक्रारीनुसार कंत्राटदार एच.बी.भिसे, तसेच कनिष्ठ लिपिक राजेश पाटील यांच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण न हटविताच केवळ खोटी चलने सादर करून या कंत्राटदाराने हा अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्यात महापालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने, या सर्व प्रकरणामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा घोटाळा काही कोटींच्या घरात जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य शिवराम पाटील यांनी एका हरकतीच्या सूचनेद्वारे स्थायी समितीत हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणाची चौकशी कुठपर्यंत आली, तसेच कुणी नगरसेवकही यामध्ये गुंतला आहे का, असा थेट सवाल पाटील यांनी यावेळी केला. पाटील यांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीवर उत्तर देताना आयुक्त नाहटा यांनी या प्रकरणाची चौकशी प्रगतीपथावर आहे, असा खुलासा केला.
अतिक्रमण विभागाच्या मागील सहा वर्षांतील कारभाराची सखोल चौकशी केली जात आहे. या काळात कंत्राटदारास करण्यात आलेल्या कामाच्या बिलांचे वाटप, कंत्राटदाराने सादर केलेल्या चलनांची तपासणी, असे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती आयुक्त नाहटा यांनी यावेळी दिली. महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक माधवी इंगोले यांच्यामार्फत हे लेखापरीक्षणाचे काम सुरू आहे. यासंदर्भातील एक विशेष चौकशी अहवाल स्थायी समितीत सादर केला जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात महापालिकेने तक्रार दिल्याने त्यासंदर्भातील चौकशी, तसेच फरारी आरोपींचा तपास पोलिसांतर्फे केला जात आहे, असेही आयुक्त म्हणाले.
सूत्रधार कोण?
या घोटाळ्यात एखादा नगरसेवक सापडला आहे का, असा सवाल स्थायी समितीत शिवराम पाटील यांनी उपस्थित केला. आयुक्त नाहटा यांनी याप्रकरणी थेट उत्तर देण्याचे टाळले असले, तरी महापालिका वर्तुळात अतिक्रमण घोटाळ्यातील सूत्रधार कोण, याविषयी वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चा रंगली आहे. या घोटाळ्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऐरोली भागातील एका ज्येष्ठ नगरसेवकाचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. यामुळे सध्या सत्ताधारी पक्षातील अस्वस्थताही वाढू लागली आहे. ठाणे जिल्ह्णााचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी भ्रष्टाचारमुक्त महापालिकेचा नारा चार वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये दिला होता, परंतु या प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाच्या एका नगरसेवकाचे नाव सातत्याने घेतले जात असल्याने, पक्षातील काही नगरसेवकांमध्ये आता नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.
गणेशदादांनी अशा भ्रष्टाचारी नगरसेवकांना आता तरी आपली जागा दाखवावी, असा सूर नगरसेवकांचा हा गट लावत आहे. दरम्यान, या घोटाळ्याशी राष्ट्रवादी तसेच या पक्षातील कोणत्याही नगरसेवकाचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया उपमहापौर शशिकांत बिराजदार यांनी दिली.