Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अखेर हिरानंदानी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मिळणार सर्वसामान्यांना उपचार
बेलापूर/वार्ताहर :
नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या जागेत असलेल्या मे. हिरानंदानी हेल्थ केअर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये पालिकेच्या रुग्णालयातील ५० टक्के रुग्णांना केवळ मोफत खाटा देण्याच्या प्रस्तावास मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने

 

मंजुरी दिली. यावेळी आयुक्त विजय नाहटा यांनी या प्रस्तावास उशीर झाल्याप्रकरणी तत्कालीन अधिकाऱ्यांस जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले.
हिरानंदानी कंपनीस रुग्णालय सुरू करण्यासाठीच्या मूळ प्रस्तावास मंजुरी देऊन तीन वर्षे लोटली तरी प्रत्यक्ष रुग्णालय सुरू न झाल्याने नवी मुंबईकरांना त्या सुविधेचा लाभ घेता आला नाही. याबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले असता या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने मागणी केली नसतानाही पालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी मे. हिरानंदानीला जादा अधिकाराचे पत्र दिले, ही अयोग्य बाब आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तिवार यांना विधि विभागाने याबाबत कायदेशीर सल्ला देऊनही त्यांनी मे. हिरानंदानीस अधिकाराची पत्रे दिली. या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन नाहटा यांनी दिले.
तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणारे व नवी मुंबईतील रहिवासी असणाऱ्यांनाच ही सुविधा मिळणार आहे. बाह्य व आंतर रुग्ण विभागात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असली तरी येथे होणाऱ्या शस्त्रक्रिया, औषधे, डॉक्टर यावरील खर्च रुग्णांनाच करावा लागणार आहे.