Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘बंदर उपभोक्त्यांना यापुढे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा’
उरण/वार्ताहर :
जेएनपीटी बंदराच्या उपभोक्त्यांमुळेच बंदराने आर्थिक प्रगती व विकास साधला आहे. या उपभोक्त्यांना यापुढे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरविण्यात येणार असल्याची ग्वाही

 

जेएनपीटीचे अध्यक्ष एस.एस. हुसैन यांनी बंदराच्या २०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दिली.
जेएनपीटीचा २०वा वर्धापनदिन शनिवारी साजरा करण्यात आला. हॉटेलमध्ये आयोजित छोटेखानी समारंभात जेएनपीटीच्या १५ आंतरराष्ट्रीय बंदर उपभोक्त्यांचा स्मृतिचिन्हे देऊन अध्यक्ष एस.एस. हुसैन यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. यावेळी हुसैन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जेएनपीटी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर असून, बंदरातील उपभोक्त्यांमुळेच बंदराची प्रगती व विकास झाला असून, त्यांचे हुसैन यांनी यावेळी आभार मानले. जेएनपीटी उपभोक्त्यांना यापुढे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जेएनपीटीने अनेक योजना आखल्या आहेत. उपभोक्त्यांच्या सेवेसाठी चौथे कंटेनर टर्मिनल पोर्ट उभारण्यात येत असून, या बंदरामुळे बंदराची क्षमता दुपटीने वाढणार आहे. तसेच ३३० मीटर लांबीची वाढीव जेट्टी, समुद्री चॅनेलची खोली व रुंदी वाढविण्यासाठीही प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामुळे बंदरातील उपभोक्त्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वासही हुसैन यांनी व्यक्त केला. यावेळी जेएनपीटीच्या कामकाजावरील आधारित विशेषांकाचे प्रकाशनही अध्यक्ष एस.एस. हुसैन यांच्या हस्ते करण्यात आले.