Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

वेड ‘लष्करच्या भाकऱ्यां’चं !
घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचं वेड महाराष्ट्राला नवं नाही.. महाराष्ट्र स्थापन झाला नव्हता तेव्हाही आणि स्थापन झाल्यानंतरही असं वेड असणारे कितीतरी समाजवेडे महाराष्ट्राला लाभले, म्हणून तर महाराष्ट्राच्या भूमीवर आणि महाराष्ट्राबाहेरच्याही भूमीवर समाजपरिवर्तनाचे निरनिराळे प्रयोग मराठमोळ्या कार्यकर्त्यांकडून आजही सुरू असलेले आपण पाहतो आहोत.. सुभाष मेंढापूरकर हे अशापैकीच एक नाव.. हिमालयाच्या कुशीतलं सिमला-कुलू-मनालीचं खोरं ही त्यांची गेल्या ३५ वर्षांची कार्यभूमी..

वंचितांच्या लेकरांची शाळा
रामभाऊ इंगोलेंच्या नागपुरातील मानेवाडा रोडवरील विमलाश्रमातील तरुणांनी पाचगावातील स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या जीवनात शिक्षणाच्या रूपाने नवप्रकाश पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. ३० लाख रुपये खर्चून शाळेच्या रूपाने उभारण्यात आलेल्या या वटवृक्षाच्या सावलीत उपेक्षितांच्या उगवत्या पिढीचे अंतरंग कालांतराने उजळून निघणार आहे. रामभाऊ इंगोलेंच्या विमलाश्रमात आज ३८ मुले-मुली आहेत. २७ मुली, ११ मुले. केजी वनपासून तर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत ती नागपुरात शिकत आहेत, हे विशेष. ही सारी मुले वेश्या व्यवसायाच्या दलदलित रुतलेल्या महिलांची आहेत, हे सांगितले तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही आणि मगच रामभाऊंनी कोणते आव्हान पेलले आणि कोणते कष्ट उपसले असतील, याची कल्पना येते.

सौरजहाजाने जगाची सफर
ऊर्जेची वाढत जाणारी गरज भागविण्यासाठी पर्यायी ऊर्जास्रोतांमध्ये सौरऊर्जेचा दबदबा वाढतच जाणार आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोबाईलफोनचे याच आठवडय़ात भारतीय बाजारपेठेत झालेले पदार्पण तेच सूचित करीत आहे. सौरऊर्जेचा प्रभावी प्रचार करण्यासाठी स्वित्र्झलडमधील संशोधकांनी गेले काही वर्षे एका आगळ्यावेगळ्या प्रकल्पाला वाहून घेतले आहे. हा प्रकल्प म्हणजे सौरऊर्जेवर चालणारे ‘प्लेनसोलार’ हे जगातले पहिलेवहिले जहाज! सौरऊर्जेचा जगभर प्रचार करण्यासाठी हे जहाज १२० दिवसांत जगाची सफर पार पाडणार आहे. ही सौरबोट म्हणजे विज्ञान आणि काव्य यांचाच संगम आहे, पाण्यावर विहार करणाऱ्या एखाद्या राजहंसाप्रमाणे ती दिसेल, असे या प्रकल्पाच्या संशोधकांनी जाहीर केले आहे. या बोटीची बांधणी जर्मनीत होत असून तिची लांबी ९८ फूट, रुंदी ५० फूट आणि वजन १० टन असेल. १२ कर्मचारी वाहून नेण्याची तिची क्षमता असेल आणि तिचा किमान वेग ताशी १० सागरी मैल असेल. सौरऊर्जेचा पुरेसा साठा करण्याची क्षमता या बोटीच्या यंत्रणेत असेल आणि त्याद्वारे रात्री अथवा सूर्यप्रकाश कमी असला तरी ४८ तास ही बोट विनासायास मार्गक्रमण करू शकेल, असा संशोधकांचा प्रयत्न आहे. सौरऊर्जेचा प्रचार व प्रसार हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. त्यासाठी ही बोट बंदरावर थडकण्यापूर्वी ‘प्लेनसोलार व्हिलेज’ हे पथक तिथे पोहोचणार असून ते विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, व्याख्याने, स्लाईड शो या माध्यमांतून सौरऊर्जेच्या वापराविषयी मार्गदर्शन करणार आहे.
सौरऊर्जेच्या प्रचारासाठी जगातले हे पहिले जहाज असले तरी मासेमारीसाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या वा सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करणाऱ्या बोटींची संख्याही वाढत आहे. कॅनडातील माँटगोमेरी गिसबोर्न यांनी २००५ पासून अशा सौरबोटींची निर्मिती मोठय़ा प्रमाणात सुरू केली आहे. बांगलादेशातील अबुल हसनत महम्मद रिझवान यांच्या ‘शिधुलाई स्वनिर्वार संस्थे’ने सौरऊर्जेद्वारे मच्छिमार व शेतकऱ्यांचे जीवन उजळवून टाकले आहे. सौरऊर्जेचा मोठय़ा प्रमाणात वापर असलेल्या बोटी, सौरकंदिल, घरगुती उपकरणे याद्वारे त्यांनी घराघरांत आधुनिकतेचे वारे पोहोचवले आहेत. रिझवान यांच्या या संस्थेचा संयुक्त राष्ट्र पर्यावरण उपक्रमाने दोन वर्षांपूर्वी गौरवही केला आहे. प्रगत देशांतील बाजारपेठांत आता सौरऊर्जेवर चालणारी खेळणीही आली आहेत. सौरऊर्जेचा प्रचार करण्याचे ते या घडीचे महत्त्वाचे साधन ठरत आहे.
उमेश करंदीकर
umeshkaran9@gmail.com