Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

पालिकेने डांबरी रस्त्यालाच सिमेंट फासले
थर फासला डांबराचा; दर मात्र कॉक्रिटचा

पुणे, ११ जून / प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या नेहरू योजनेतील निधीतून पुण्यात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांमध्ये अधिकारी व कंत्राटदार मिळून फार मोठा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. काम केले रस्त्याला डांबर फासण्याचे आणि पैसे दिले सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे, असा प्रकार नव्याने उघडकीस आला आहे. नगरसेवक शंकर ऊर्फ बंडू केमसे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

‘एचए’च्या महाप्रबंधकावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल
केवळ तीन व्यवहारांमध्ये ७५ लाखांची हेराफेरी

पिंपरी, ११ जून / प्रतिनिधी

पिंपरी येथील केंद्र सरकारच्या हिंदूस्तान अँन्टीबायोटीक्स (एचए) लिमिटेड या कंपनीच्या महाप्रबंधकावर आज सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाने कच्च्या मालाच्या पुरवठय़ामध्ये ७५ लाख रुपयांची अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल केला. केंद्रीय अन्वेषण विभागा(सीबीआय)च्या लाचलुचपत विभागाचे अधीक्षक एस. सी. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, के. पी. राजन असे गुन्हा दाखल झालेल्या एचएच्या महाप्रबंधकाचे नाव आहे. त्यांच्यावर गुन्हा (आरसी / पुणे /२००९/ए/०००३) दाखल करण्यात आला आहे.

दोन महिन्यांत ५२ कोटी रुपयांची तूट;वर्षअखेरीस १५० कोटींचा फटका?
‘श्रीमंत’ पालिकेची आर्थिक घसरण सुरूच

बाळासाहेब जवळकर, पिंपरी, ११ जून

कोटीच्या कोटी उड्डाणे आणि मोठय़ा प्रमाणात उधळपट्टी झाल्याने डबघाईला आलेल्या ‘श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक घसरण अद्यापही सुरुच आहे. मंदीचा फटका बसल्याने मागील दोन महिन्यात केवळ जकातीच्या उत्पन्नात तब्बल ५२ कोटी रुपयांची घट आली आहे. हीच परिस्थिती यापुढेही कायम राहिल्यास जकातीचे ७८० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठणे अवघड जाणार असल्याने पालिकेला वर्षअखेपर्यंत १५० कोटी रुपयांचा ‘खड्डा’ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘पॉझिटिव्ह’ युवकांच्या माध्यमातून एचआयव्हीग्रस्तांचे ‘नेटवर्क’!
पुणे, ११ जून / प्रतिनिधी

एचआयव्हीची बाधा दुसऱ्याला होऊ नये यासाठी बाधित युवकच आता अन्य छुप्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे राज्यभर ‘नेटवर्क’ उभारण्याची मोहीम हाती घेणार आहेत. एचआयव्हीबाधित युवकच दुसऱ्या रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना उपचाराचे मार्ग सुचविणार आहेत. आपण एचआयव्हीग्रस्त आहोत, अशी मनात भीती बाळगून समाजापुढे येण्यास न धजावणाऱ्या बाधित युवकांना एकत्र करून त्यांच्यापासून दुसऱ्यांना लागण होऊ नये यासाठी वेळीच खबरदारी घेण्यासाठी या नेटवर्कची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

पुणे महापालिकेने ठेकेदारांचे २५९ कोटी रुपये थकवले!
पुणे, ११ जून/प्रतिनिधी

महापालिकेने छोटय़ा-मोठय़ा ठेकेदारांचे मिळून २५९ कोटी रुपये थकवले असून या पैशांच्या वसुलीसाठी ठेकेदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पक्षनेत्यांना साकडे घातले. महापालिकेच्या सन २००८-०९ या अंदाजपत्रकातील अनेक कामे पूर्ण झाली असून अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. परंतु, सन ०८-०९ ची अंदाजपत्रकीय तरतूद ३१ मार्च रोजीच संपल्याने कामांची बिले मिळणे बंद झाले आहे, अशी लेखी तक्रार ‘पुणे महापालिका ठेकेदार असोसिएशन’ने केली आहे.

विविध मागण्यांसाठी विद्यार्थी कृती समितीचे आंदोलन
पुणे, ११ जून / प्रतिनिधी

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणांच्या पुनमूल्र्याकनाची सोय असावी व उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती उपलब्ध करून द्याव्यात, या प्रमुख मागणीसाठी पुणेकर विद्यार्थी कृती समितीतर्फे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर भजन, कीर्तन आंदोलन करण्यात आले.
पुणेकर विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष मंदार जोशी व शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष निलेश वरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या प्रसंगी बोर्डाचे राज्य सचिव तुपे यांनी १५ दिवसांत बोर्डाची तातडीची बैठक बोलावून संघटनेच्या मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्वासन दिले. त्यामुळे पंधरा दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. बोर्डाने दिलेल्या मुदतीत निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

नदीपात्रात सापडलेला मृतदेह पाहण्यासाठी गर्दी झाल्याने वाहतूक तीन तास खोळंबली
चाकण, ११ जून/वार्ताहर

पुणे-नाशिक महामार्गावर मोशीजवळ ‘इंद्रायणी नदीच्या पात्रात मोशीतील एका पंचेचाळीस वर्षाच्या गृहस्थाचा मृतदेह आढळला; नग्नावस्थेतील या मृतदेहाबाबत परिसरात एकच खळबळ उडाल्याने नागरिकांनी मोशीच्या पुलावर धाव घेतल्यामुळे वाहतूक सुमारे तीन तास कोलमडली. याबाबतची माहिती अशी की, अनिल हरिभाऊ बानेकर (वय ४५ वर्षे, रा. मोशी, नागेश्वरनगर ता. हवेली) यांचा मृतदेह इंद्रायणी नदीच्या पात्रात नग्नावस्थेत आढळला. इंद्रायणी नदीच्या पात्रातील या मृतदेहाबाबतची माहिती तेथील परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात अफवांना ऊत आला होता. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीत ट्रकची मोटारीला पाठीमागून जोरात धडक बसली. या धडकेने ती पंधरा फूट अंतर पुढे रेटली गेली. मोटारीतील सातजण सुखरुप बचावले. पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेले बाणेकर हे भोसरीच्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला होते. बाणेकर हे बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांच्या नातेवाईकांनी भोसरी पोलीस ठाण्यात दिली होती.