Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

कर्जतचे डॉ. नाझीरकर यांना दोन लाख रुपये मेडिक्लेम मंजूर
कर्जत, ११ जून/वार्ताहर

 

कर्जतमधील अस्थिशल्यविशारद डॉ. घन:शाम नाझीरकर यांना त्यांच्या ‘मेडिक्लेम’ पॉलिसीअंतर्गत देय असलेली दोन लाख रुपये विम्याची रक्कम देण्यास नकार देणाऱ्या नॅशनल इन्श्युरन्स कंपनीला अलिबाग येथील रायगड जिल्हा ग्राहक मंचाने चांगलाच दणका दिला आहे.
डॉ. नाझीरकर यांचा दोन लाख रुपयांचा मेडिक्लेम मंजूर करून मानसिक, शारीरिक आणि न्यायिक खर्चापोटी आणखी १२ हजार रुपयेही त्यांना येत्या ४५ दिवसांच्या आत अदा करावेत, असा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा ग्राहक मंचाने दिला आहे.डॉ. नाझीरकर हे ३ एप्रिल २००७ रोजी विदर्भात अकोला येथे गेले होते. तेथील अतिउष्ण हवामानामुळे खोकल्यातून रक्तमिश्रित कफ पडू लागल्यामुळे दौरा आटोपता घेऊन ते पनवेल येथील पॅरामाऊंट हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी ५ एप्रिल २००७ रोजी दाखल झाले. तेथून ७ एप्रिल २००७ रोजी त्यांना मुंबईमधील लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे १४ एप्रिल २००७ पर्यंत उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील उपचार उल्हासनगर येथील एका रुग्णालयात घेतले होते.डॉ. नाझीरकर यांनी यापूर्वीच तीन वर्षे आधी नॅशनल इन्श्युरन्स कंपनीची मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली होती. त्यामुळे त्या पॉलिसीअंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार योग्य त्या मुदतीत त्यांनी १४ मे २००७ रोजी पुणे येथील पॅरामाऊंट हेल्थ सव्‍‌र्हिसेस आणि नॅशनल इन्श्युरन्स कंपनीची लोणावळा शाखा येथे आपला ‘क्लेम’ दाखल केला होता. त्यानुसार औषधोपचारांसाठी झालेल्या दोन लाख रुपये खर्चाच्या रकमेची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात विमा कंपनीने मागितलेली अन्य माहितीही डॉ. नाझीरकर यांनी १ ऑगस्ट रोजी सक्षम दाखल केली. मात्र त्यानंतर या विम्याची रक्कम देण्यास कंपनीकडून तब्बल १० महिन्यांच्या विलंबानंतर नकार देण्यात आला. सन १९८७ मध्ये झालेल्या क्षयरोगाचा क्लेम नाकारण्यात आला असल्याचे त्यांना त्यावेळी कळविण्यात आले.यानंतर डॉ. नाझीरकर यांनी जनजागृती ग्राहक मंचाच्या कर्जत शाखेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत देसाई यांच्याशी संपर्क साधून याप्रकरणी न्याय मिळवून देण्याची विनंती त्यांना केली. त्यानुसार डॉ. देसाई यांनी याचिका दाखल करून यासंबंधी युक्तिवाद केला.