Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

कांदा वजनमापातील अवैध कपातीचा प्रश्न ऐरणीवर
लासलगाव शेतकरी कृती समितीचा इशारा
लासलगाव, ११ जून / वार्ताहर

 

कांद्याच्या वजन मापात प्रतिक्विंटल दोन किलो याप्रमाणे होणारी बेकायदेशीर कपात त्वरीत बंद करावी, चोवीस तासात शेतकऱ्यांना शेतीमालाचे पैसे अदा करावेत, नियमबाह्य़ बांधा पध्दत बंद करावी या मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत शेतीमालांचे लिलाव पूर्ववत सुरू करू नयेत, असा इशारा दिलेले निवेदन हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी कृती समिती व नाशिक जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब पाटील यांनी लासलगाव बाजार समितीचे सचिव बी. वाय. होळकर व पोलीस उपनिरीक्षकांना दिले.
लासलगाव खरेदी विक्री संघामध्ये आयोजित शेतकरी व कामगारांच्या सभेत बोलताना शेतकरी कृती समितीचे समन्वयक नानासाहेब पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांनी २८ मार्च २००२ रोजी लेखी आदेश देवून शेतकऱ्यांची होणारी प्रतीक्विंटल दोन किलो कांद्याची कपात बंद करण्याचे आदेश दिले, असे सांगितले. त्यानंतरही सात महिने या निर्णयाची अमलबजावणी समितीने आदेश धाब्यावर बसवून कपात सुरू केली. विविध कारणांनी समितीचे कामकाज बंद करायचे व शेतकऱ्यांची लूट करायची हे प्रकार बंद करावेत, असा इशारा पाटील यांनी दिला. डॉ. सुरेश दरेकर, किशोर क्षिरसागर, दत्ता राजोळे, अरूण शर्मा यांच्यासह हजारो शेतकरी व माथाडी कामगार उपस्थित होते.
शेतकऱ्यांबरोबर कामगारवर्ग हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे कामगारांच्या सनदशीर व न्याय मागण्या त्वरित तोडगा काढून सोडवाव्यात, कामगारांच्या न्याय मागण्यासंदर्भात तोडगा न निघाल्यास कामगारांसोबत शेतकरीही आंदोलनात सहभागी होतील, असा लेखी इशाराही पाटील यांनी दिला. बंद असलेले लिलाव त्वरित तोडगा काढून सुरू करावे, तसेच नियमबाह्य़ कामकाज होवून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी बाजार समितीने दक्षता घेऊन सनदशीर मार्गानेच लिलावाचे कामकाज करावे असे निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे.