Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पवनऊर्जा कंपन्यांच्या व्यवहारांची सी.बी.आय. चौकशीची मागणी
नाशिक, ११ जून / प्रतिनिधी

 

पवनऊर्जा कंपन्यांच्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची सी.आय.डी. चौकशी करण्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्र्यांनी विधीमंडळाच्या अधिवेशना दरम्यान जाहीर केले असले तरी ही बाब म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. त्याऐवजी या सर्व व्यवहारांची सी.बी.आय. मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी संघटनेची आग्रही मागणी आहे. या विषयाच्या अनुषंगाने विधीमंडळाच्या अधिवेशनात चर्चा उपस्थित झाली असता अपारंपरिक ऊर्जा मंत्र्यांनी उपरोक्त निर्णय घेतला. तथापि, त्यामुळे या चौकशीची व्याप्ती केवळ महसूली जमिनींच्या व्यवहारांपुरती मर्यादित असल्याचे दिसते. ही शुद्ध बनवाबनवी असल्याची टीका करताना या कंपन्यांनी लाटलेली अनुदाने, घेतलेल्या करसवलती व अन्य सर्वच व्यवहारांची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी संघटनेने केली आहे. एवढेच नव्हे तर या विविध व्यवहारांशी संबंधित असलेल्या महसूल, वन, पर्यावरण, पोलीस आदि खात्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची व राजकारण्यांचीही चौकशी झाली पाहिजे, असा संघटनेचा आग्रह आहे. त्यानुसार पावले टाकली न गेल्यास सध्या सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे किशोर ढमाले, सुभाष काकुस्ते, वंजी गायकवाड, हिलाल महाजन, आर. टी. गावित, मन्साराम पवार आदिंनी दिला आहे.