Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

धुळे जिल्हा परिषद अपहार प्रकरणी पाच जणांना सक्तमजुरी
धुळे, ११ जून / प्रतिनिधी

 

जिल्हा परिषदेच्या कोटय़वधी रूपयांच्या अपहार प्रकरणातील मृत संशयित दिगंबर बोरालेच्या कुटुंबातील पाच सदस्यांना प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रूपये दंड भरण्याची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. जिल्हा परिषदेत नोकरीस असताना दिगंबर बोराले यांनी १९८८ ते १९९१ या कालावधीत अपसंपदा जमविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दाखल खटल्याच्या कामकाजाआधीच म्हणजे २००२ मध्ये बोराले यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी यमुनाबाई, मुलगा सुनील व अनिल, सूना रत्नमाला व चंद्रकला यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या सर्वाचे अधिकृत उत्पन्न विशिष्ट मर्यादेत सिमित असताना त्यांच्याकडे लाखो रूपयांची मालमत्ता आढळून आली. निवासस्थान, जमीन, वाहन, दागिने व विविध बँकांमधील गुंतवणुकीचा त्यात समावेश आहे.
या संपूर्ण प्रकरणात बोराले कुटुंबियांनी जवळपास २६ लाखाची मालमत्ता जमविल्याचा आरोप होता. या प्रकरणाची सुनावणी न्या. पी. सी. बावस्कर यांच्या न्यायालयात झाली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. संभाजी देवकर यांनी युक्तीवादात बोराले यांनी जमविलेल्या अपसंपदेची माहिती दिली. या प्रकरणी न्यायालयाने पाच जणांना प्रत्येकी दोन वर्ष सक्तमजुरी व १० हजार रूपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आरोपींना सहा महिन्याचा सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.