Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

कचऱ्याच्या समस्येमुळे देवरुखमधील आरोग्यास धोका
देवरुख, ११ जून/वार्ताहर

 

कचऱ्याच्या निचऱ्याबाबत कोणतेही नियोजन नसल्याने शहरातील नाक्यानाक्यांवर साठलेला कचरा आणि पसरणारी दुर्गंधी सध्या डोकेदुखी बनली आहे. ग्रामपंचायतीकडून कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने दिवसेंदिवस वाढत्या लोकवस्तीने वाढणाऱ्या कचऱ्याची समस्या गंभीर बनू लागली असून, त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
कचरा गोळा करण्यासाठी ग्रा.पं.तर्फे शहरातील प्रमुख मार्गावरून ट्रॅक्टर फिरविला जातो. मात्र त्यामुळे प्रमुख मार्गावरील कचरा गोळा होतो, मात्र ज्या भागात ट्रॅक्टर फिरत नाही अशा बहुतांशी भागात कचरा उघडय़ावर साचून राहात असल्याने दुर्गंधी आणि उनाड गुरे-कुत्र्यांचा उपद्रव यांनी कचऱ्याची समस्या अधिक तीव्र केली आहे. कुत्रा दंशाच्या आणि पाठोपाठ गुरांच्या हल्ल्याच्या नागरिकांच्या तक्रारीही वाढत आहेत.
नाक्यांवर बंदिस्त कचरा कुंडय़ांची नितांत गरज असताना त्या बसवल्या जात नाहीत. तुरळक कुंडय़ा असतात, तेथे कुंडीबाहेरच कचऱ्याचे प्रदर्शन असते. प्रत्येक घरी शोषखड्डा मारून आवारातील कचऱ्याची आवारातच विल्हेवाट लावण्याचा आग्रह ग्रा.पं. प्रशासनाकडून घरला जातो, मात्र त्याची अंमलबजावणी किती जण करतात, हे तपासून पाहण्याची तसदी यंत्रणा घेत नाही.
हजारो टन गोळा होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कचऱ्यावर गॅसनिर्मिती प्रकल्प करण्याचा ग्रा.पं.तर्फे दोन वर्षांंपासून केवळ विचार सुरू आहे, कृतीसाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.