Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

चिपी-परुळे येथे ९३४ हेक्टर्स क्षेत्राचा प्रस्ताव
सावंतवाडी, ११ जून/वार्ताहर

 

वेंगुर्ले तालुक्यातील चिपी-परुळे येथे नियोजित विमानतळासाठी २७१ हेक्टर्स जमीन संपादित केल्यानंतर त्याच्या शेजारी एम.आय.डी.सी.ने ९३४ हेक्टर्स जमीन संपादनासाठी प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव संयुक्त मोजणीसाठी भूमी अभिलेख स्तरावर आहे. चिपी-परुळे येथे नियोजित विमानतळासाठी सन २००६ मध्ये २७१ हेक्टर्स क्षेत्राची जमीन संपादित करण्यात आली. त्यासाठी एक कोटी ६५ लाख ९० हजार ९३५ रुपये शासनाने जमीन मालकांसाठी भरपाई दिली.
नियोजित विमानतळाशेजारी एम.आय.डी.सी.ने ९३४ हेक्टर्स क्षेत्राची जमीन संपादित करून मिळण्यासाठी प्रस्ताव दिला. भूसंपादन अधिकारी म्हणून सावंतवाडी महसूल उपविभागीय अधिकारी नंदकुमार जाधव यांची नेमणूक झाली आहे.
भूमी अभिलेख विभागाकडे संयुक्त मोजणीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आल्यावर ११ लाख ८३ हजार ५०० रुपये चलनाद्वारे भरण्याबाबत भूमी अभिलेखाने एम.आय.डी.सी.च्या अधिकाऱ्यांना कळविले आहे. या मोजणीनंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल, असे जाधव यांनी सांगितले.
याबाबत अधिकाऱ्यांच्या दोन बैठका घेण्यात आल्या असून, भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने व्हावी, म्हणून प्रयत्न सुरू आहेत, असे जाधव यांनी सांगितले. पाट-परुळे या भागातील परुळे येथे विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) प्रस्तावित आहे. त्यासाठी ९९३ हेक्टर्स ३६ आर. एवढी जमीन भूसंपादन करावी लागणार आहे.
मात्र सेझसाठी जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव आपल्यापाशी आलेला नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले. चिपी-परुळे या भागात विमानतळ, सेझ आणि एम.आय.डी.सी.साठी सुमारे २१९८ हेक्टर्स जमीन अपेक्षित आहे. मात्र सेझसाठी जमीन संपादन करण्याचा कोणत्याही पातळीवर प्रयत्न सुरू नसल्याचे सांगण्यात आले.