Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

चिपळूणमध्ये पदवीसाठी इच्छुकांची कसरत
चिपळूण, ११ जून/वार्ताहर

 

बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांत प्रवेश घेण्यासाठी तारेवरची कसरत सुरू झाली आहे. शहरात एकमेव असणाऱ्या डीबीजे महाविद्यालयात या वर्गासाठी ७९० जागा असून, तब्बल १,१३९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या वर्षीही शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागणार आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये तालुक्याचा ८०.९९ टक्के तर डीबीजे महाविद्यालयाचा ७७.३७ टक्के निकाल लागला आहे. शहरात कला, वाणिज्य व शास्त्र पदवी अभ्यासक्रमाचे डीबीजे हे एकच महाविद्यालय आहे. त्याचबरोबर इतर कोर्सेसही या महाविद्यालयात घेतले जात असल्याने बारावीचा निकाल लागताच विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी धावपळ सुरू केली. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या महाविद्यालयात प्रवेश अर्जांसाठी पालकांसह विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. हे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची ९ जून ही मुदत होती. मात्र जागा कमी आणि प्रवेश अर्ज जास्त अशी अवस्था डीबीजे महाविद्यालयात पहावयास मिळत आहे. या महाविद्यालयात कला शाखेसाठी २००, वाणिज्य ३००, शास्त्र २००, बीएमएस ६०, आयटी ३० अशा ७९० मर्यादित जागा आहेत. मात्र १,१३९ अर्ज महाविद्यालयात प्राप्त झाले असून, संस्था संचालकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे या वर्षीही शेकडो विद्यार्थ्यांसमोर प्रवेश मिळविणे हा चिंतेचा विषय बनला आहे. मर्यादित जागा असताना वाढीव प्रवेश अर्ज दाखल झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकही धास्तावले असून, १२ जून रोजी लागणाऱ्या मेरीट लिस्टकडे त्यांच्या नजरा लागल्या आहेत.