Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयास डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार
सावंतवाडी, ११ जून/वार्ताहर

 

महाराष्ट्र राज्याच्या एका टोकाला कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर असणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा डॉ. आनंदीबाई जोशी हा राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
गोवा व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणारा दोडामार्ग तालुका अतिदुर्गम विभागात येतो, हा भाग कायमच दुर्लक्षित राहिल्याचा राजकीय आरोप होतो. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी या राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याने तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे. अपुरे डॉक्टर्स, कर्मचारी यांना तोंड देत वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर येवले यांनी रुग्णालयीन व्यवस्थापनात बदल करीत उत्तम काम केले.
दोडामार्ग तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्या रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर्संची कमतरता असल्याने गोव्यात महागडय़ा रुग्णालयात जावे लागत असे, पण डॉ. येवले यांनी यावर मात करून या रुग्णालयाचा कायापालट केला व रुग्णालयास नावलौकिक मिळवून दिला. दोडामार्गासारख्या ग्रामीण भागात अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह डॉक्टर्सच्या संख्याबळावर राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळेल, एवढे काम दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळेच हा पुरस्कार मिळाला, असे सांगण्यात आले.