Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पालघर नगर परिषद हद्दीतील २७ गावांना पाणीपुरवठा
पालघर, ११ जून/वार्ताहर

 

पालघर व २६ गावे पाणीपुरवठा योजनेतील पालघर नगर परिषद हद्दीतील गावांना पाणीपुरवठय़ाचा शुभारंभ आज शिवसेना आमदार मनीषा निमकर यांच्या हस्ते झाला. निमकर यांनी बटण दाबून योजनेचे उद्घाटन झाल्याचे औपचारीकरीत्या जाहीर केले. यावेळी सभापती दीपक करवट, उपसभापती भुवनेश्वर मेहेर यांच्यासह सेनेचे नगरसेवक उत्तम घरत, अतुल पाठकसह जि.प./पं. समिती सदस्य, सेनेचे तालुका व पालघर शहर पदाधिकारी उपस्थित होते.
योजनेचे आज औपचारिक उद्घाटन झाले असले, तरी जलवाहिन्यांची सफाई व अन्य प्रक्रिया पूर्ण व्हावयाच्या असल्याने, नगर परिषदवासीयांना प्रत्यक्षात मात्र येत्या चार-पाच दिवसांत पाणी मिळणार आहे. सेना-भाजप युती सरकारच्या काळात १९९९ मध्ये सुरू झालेली ही योजना काही काळानंतर रखडली व पुन्हा सुरू झाली. २०.८५ कोटी खर्चाच्या या योजनेतून पालघर व परिसरातील २६ गावांना पाणी मिळणार असून, त्यापैकी १९ गावांमध्ये नव्याने टाक्या उभारण्यात आल्या आहेत.
या नवीन योजनेमुळे पालघर नगर परिषद हद्दीतील गावांसह धनसा, शिरगाव, सातपाटी आदी गावांना एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बंद होणार आहे. इतकेच नव्हे तर एमआयडीसीच्या महागडय़ा दराऐवजी बऱ्याच कमी दराने २७ गावांमधील लोकांना पाणीपुरवठा होणार आहे.
या योजनेसाठी आवश्यक पाणी मासवण येथून सूर्या नदीतून उचलले जाणार असून, तेथून साडेतीन कि.मी. इतक्या लांबीच्या उध्र्ववाहिनीद्वारा ते वाघोबा खिंडीत तीन लाख लिटर्स क्षमतेच्या उभारण्यात आलेल्या ब्रेक प्रेशर टँकमध्ये साठविले जाणार आहे. त्या विहिरीतून हे पाणी पुढे १८.३० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात आणून तेथे शुद्ध होईल. पुढे गुरुत्व वाहिन्यांद्वारा गावोगावच्या टाक्यांमध्ये व तेथून गावातील अंतर्गत जलवाहिन्यांच्या जाळ्यांद्वारा घरोघरी जाईल. योजनेंतर्गत २७ गावांतील गावकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होणार असून, गावाच्या गरजेनुसार स्टँडपोस्टद्वारा सार्वजनिक पाणीपुरवठय़ाची व्यवस्था केली जाईल.
पहिल्या टप्प्यात पालघर, टेंभोडे, अल्याळी, नवली, वेऊर, लोकमान्यनगर व घोलविरा या परिषद हद्दीतील गावांना अंतर्गत जुन्याच जलवाहिन्यांद्वारा पाणीपुरवठा होणार आहे. तद्नंतर टप्प्याटप्प्याने देवखोप, शेल्याटी, धनसार, शिरगाव, सातपाटी, उमरोळी, पंचाळी, बिरवाडी, पडघे, खारेकुरण, मोरेकुरण, दापोली, कोळगाव, वागुळसार, वरखुंटी, कमादे, वाकोरे, अंबाडी, नंडोरे, गोठणपूर या गावांना पाणीपुरवठा सुरू होणार आहे. मात्र यासाठी जुलै महिना उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आमदार निमकर या योजनेचे उद्घाटन करणार असल्याचे आज समजल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांसह आपल्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर असताना, सेना आमदारामार्फत योजनेचे उद्घाटन होत असल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मात्र हा कार्यक्रम थांबविण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. अर्थात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे महत्त्वाचे अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित नव्हते.