Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पर्यावरण संतुलनासाठी नागरिकांनी शासनाला साथ द्यावी -पोळ
खोपोली, ११ जून/वार्ताहर

 

वृक्ष व वन्यप्राणी-पशुपक्षी निसर्गचक्रातील पर्यावरण संतुलन राखणारे महत्त्वाचे दोन घटक आहेत. त्यामुळेच शासनातर्फे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनावर आणि वन्यपशू-पक्ष्यांच्या संरक्षणावर सदैव भर दिला जातो. शासनाच्या या विधायक उपक्रमाला नागरिकांनी-ग्रामस्थांनी आवर्जून साथ द्यावी, असे आवाहन खालापूरचे प्रभारी गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दस्तुरी येथे पर्यावरण संतुलनाचे महत्त्व विशद करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य माहिती फलकांचे (होर्डिंग) उद्घाटन पोळ यांच्या हस्ते व पनवेलचे उपविभागीय वनअधिकारी यू.आर. जमदाडे यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. खालापूरच्या वनविभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच दस्तुरी परिसरातील ग्रामस्थ व द्रुतगती महामार्गावरून मार्गक्रमण करणारे जागरूक व पर्यावरणप्रेमी प्रवासी या प्रसंगी उपस्थित होते.
वनअधिकारी-कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करणार नाहीत, पण किमान मनुष्यबळाच्या जोरावर भल्यामोठय़ा वनक्षेत्रावर नियंत्रण ठेवणे मोठय़ा जिकिरीचे काम होऊन बसले आहे. प्राप्तपरिस्थितीत वनअधिकारी-कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून कोणीही व्यक्ती रात्री-अपरात्री जंगलातील वृक्षतोड करीत असेल, वन्यप्राण्यांची बेकायदेशीररीत्या हत्या करीत असेल, तर परिसरातील नागरिकांनी-ग्रामस्थांनी अशा समाजविघातकांना मज्जाव करावा व ही बाब त्वरित वनअधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जमदाडे यांनी केले. या प्रसंगी दस्तुरी परिसरात उपस्थित मान्यवर-वनअधिकारी व ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. प्रारंभी खालापूरचे परिक्षेत्र वनअधिकारी बाबासाहेब गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविकात उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.