Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

‘मनसेप्रणीत वाहतूक सेना सदस्यांच्या समस्या दूर करणार’
खोपोली, ११ जून/वार्ताहर

 

मनसेप्रणीत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना या नोंदणीकृत संघटनेचे सदस्यत्व स्वीकारणाऱ्या तमाम सदस्यांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या दूर करण्यासाठी, तसेच त्यांच्या जीवनात सुख-शांती व स्थैर्य निर्माण करण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही मनवासेचे उपाध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिली. खोपोली- शीळफाटा येथील संघटनेच्या खालापूर तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शेख यांच्या हस्ते झाले. वाहतूक सेनेच्या सदस्यांनी सचोटीने- प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करावा. संघटनेला काळिमा फासणारे कोणतेही कृत्य करू नये. ‘स्वाभिमानाने जगा व जगवा’ हे संघटनेचे तत्त्व डोळ्यांसमोर ठेवून मार्गक्रमणा करावी, असा सल्ला सल्लागार सदाशिव मते यांनी याप्रसंगी दिला. संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वाने व्यवसाय करणाऱ्या सदस्यांना जर शासकीय अथवा अन्य यंत्रणेकडून नाहक त्रास देण्यात येत असेल, तर अशा सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वशक्तीनिशी साथ देऊ, अशी ग्वाही वाहतूक सेनेचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण म्हेत्रे यांनी दिली. संघटनेच्या तमाम सदस्यांनी व्यसनापासून दूर राहावे, असेही त्यांनी सांगितले.
अरिफ शेख यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन व तत्त्वप्रणालीला अनुसरूनच सदस्य सदैव मार्गक्रमणा करतील, अशी ग्वाही दिली.