Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

सेहवागच्या दुखापतीची बोर्डाला माहिती होती!
नवी दिल्ली, ११ जून / पीटीआय

वीरेंद्र सेहवागच्या दुखापतीबाबत वादविवाद ऐन रंगात आला असताना आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मात्र बचावात्मक पवित्रा स्वीकारला आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी भारतीय संघाची निवड करण्यापूर्वी आपल्याला सेहवागच्या खांद्याच्या दुखापतीची माहिती होती, असे बोर्डाने म्हटले आहे.

अग्निपरीक्षा
भारत वेस्ट इंडिजशी आज भिडणार
लंडन, ११ जून/ पीटीआय
उपकर्णधार वीरेंद्र सेहवागच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने विजयी घौडदौड कायम राखली असून उद्या होणाऱ्या ‘सुप एट’ फेरीतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजशी भिडण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. सुरेश रैना तिसऱ्या क्रमांकासाठी आदर्श फलंदाज असताना महेंद्रसिंग धोनी त्या स्थानावर का येतो हे कोडे अजूनही उलगडलेले नाही.

भारताचा आर्यलडवर दणदणीत विजय
ट्रेन्ट ब्रिज, ११ जून / वृत्तसंस्था

झहीर खानने १९ धावांत घेतलेले ४ बळी आणि रोहित शर्माच्या ४५ चेंडूत केलेल्या ५२ धावांमुळे भारताने आयर्लंडविरुद्ध ८ विकेट्सने सहज विजय मिळवित ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील साखळी लढतींचा गोड शेवट केला. साखळीतील दोन्ही सामने जिंकून भारताने स्पर्धेतील आपला वरचष्मा कायम राखला. भारताने आज नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली आणि ११२ धावांत त्यांचा खुर्दा केला.

गेलला झटपट बाद केल्यास भारताला वर्चस्वाची संधी- झहिर
ट्रेन्ट ब्रिज, ११ जून/ पीटीआय

भारताचा ‘सुपर एट’ फेरीतील पहिला सामना वेस्ट इंडिजविरूद्ध उद्या होणार आहे. या सामन्यात कर्णधार ख्रिस गेलला झटपट बाद केल्यास भारताला वर्चस्वाची संधी असेल, असे मत भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज झहिर खान याने व्यक्त केले आहे.गेल हा एक ‘मॅचविनर’ असून ते त्याने सिद्ध केले आहे. जर आम्ही त्याला झटपट बाद केले तर आम्हाला वर्चस्व मिळविण्याची नामी संधी असेल. तो पुढे म्हणाला की, आर्यलडला आम्ही सुरूवातीलाच धक्के दिले आणि तेच आमच्या पथ्यावर पडले. अशाच कामगिरीची अपेक्षा विंडिजविरूद्धच्या सामन्यातही सर्वाना असेल. प्रत्येक खेळाडूला त्याची संघातील भूमिका माहीत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू पूर्ण जबाबदारीने खेळतील अशी अपेक्षा आहे.

सायमंड्स लवकरच परतेल- वॉर्न
लंडन, ११ जून/ वृत्तसंस्था

अष्टपैलू अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स लवकरच ऑस्ट्रेलिया संघात परतेल, अशी आशा ऑस्ट्रेलियाचा निवृत्त फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने व्यक्त केली आहे. नवा वाद ओढवून घेतल्याबद्दल सायमंड्स हाही तितकाच दोषी ठरतो, असेही वॉर्नने नमूद केले आहे.

यापुढेही तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा विचार नाही -धोनी
ट्रेण्टब्रिज, ११ जून / पीटीआय

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणे हा फलंदाजीच्या क्रमवारीतील प्रयोगाचा भाग होता आणि ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेत पुढेही तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा आपला अजिबात विचार नसल्याचे कर्णधार धोनीने स्पष्ट केले आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी फॉर्मात असणारा सुरेश रैना हाच योग्य पर्याय असूनही साखळीतील पहिल्या दोन्ही लढतीत धोनी त्या क्रमांकावर आला; पण त्याला फारसे यश मिळाले नाही.

एशियन वॉर
पाकिस्तान-श्रीलंकेमध्ये आज ‘सुपर एट’ चा सामना
लंडन, ११ जून/ वृत्तसंस्था

‘क’ गटात अव्वल स्थानावर असलेला श्रीलंकेचा संघ आणि ‘ब’ गटामधून एका सामन्यात विजय मिळवलेला पाकिस्तानचा संघ यांच्यामध्ये उद्या ‘सुपर एट’ चा सामना होणार असून एक चांगले ‘एशियन वॉर’ क्रिकेटच्या पंढरीत अनुभवायला मिळेल. साखळी सामन्याचा विचार केल्यास श्रीलंकेचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड दिसत आहे.

रोनाल्डोसाठी रिअल माद्रिदची विक्रमी बोली
मँचेस्टर, ११ जून / ए. एफ. पी.

ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी रिअल माद्रिदने लावलेली १३० दशलक्ष डॉलर्सची विक्रमी बोली मँचेस्टर युनायटेडने मान्य केली आहे. आपल्या क्लबसाठी रोनाल्डो हवा यासाठी रिअल माद्रिदने मँचेस्टर युनायटेड समोर ८० दशलक्ष पौंडांची विश्वविक्रमी प्रस्ताव आणि तोदेखील कुठलीही अट न घालता ठेवला होता.

विजेंदर, सुरंजयसिंग यांचे पदक निश्चित
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा
नवी दिल्ली ११ जून/पीटीआय

ऑलिम्पिक ब्राँझपदक विजेता विजेंदरसिंग याच्याबरोबरच सुरंजयसिंग यानेही आशियाई मुष्टियुध्द स्पर्धेत उपान्त्य फेरीत स्थान मिळवित पदक निश्चित केले. ही स्पर्धा झुआई (चीन) येथे सुरु आहे.
विजेंदरने मिडलवेट गटात किर्गिझस्तानच्या कारिपोव रुझलान याच्यावर १९-४ असा दणदणीत विजय नोंदविला.

सलामीवीर रेडमन्डने केले संधीचे सोने
न्यूझीलंडचा आर्यलडला दणका
ट्रेन्टब्रिज, ११ जून / वृत्तसंस्था
जायबंदी जेसी रायडरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या सलामीवीर अ‍ॅरोन रेडमन्डने संधीचे सोने केले आणि न्यूझीलंडने नवख्या आर्यलड संघाला ८३ धावांनी पराभवाचा जोरदार दणका देत ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘फ’ गटाच्या ‘सुपर एट’ फेरीत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले १९९ धावांचे आव्हान आर्यलडला झेपलेच नाही आणि त्यांचा डाव १६.४ षटकांमध्ये ११५ धावांवर संपुष्टात आला.

रझाक पाकिस्तान संघात
लंडन, ११ जून/ वृत्तसंस्था
ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघात जखमी यासीर अराफत याच्याऐवजी अब्दुल रझाक याचा समावेश करण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मान्यता दिली आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेसाठीच्या तांत्रिक समितीने पाकिस्तान संघात अब्दुल रझाक याचा समावेश करण्यास मंजुरी दिली आहे.साखळी फेरीतील सामना खेळताना यासीर अराफत याच्या खांद्याला दुखापत झाली. त्याला १२ दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तान मंडळाने त्याच्याऐवजी अब्दुल रझाक याचा समावेश करण्यास मान्यता देण्याची विनंती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला केली होती.

सायना, अनुप उपान्त्यपूर्व फेरीत
नवी दिल्ली, ११ जून / पीटीआय

भारताच्या सायना नेहवालने तीन गेममध्ये रंगलेल्या रोमहर्षक लढतीत इंडोनेशियाच्या आद्रियांती फिर्दासारीचा पराभव करून सिंगापूर सिटी येथे सुरू असलेल्या सिंगापूर ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेची आज उपान्त्यपूर्व फेरी गाठली आहे. याचप्रमाणे भारतीय ऑलिम्पिकपटू अनुप श्रीधरनेही स्पध्रेतील धक्कादायक विजयाची नोंद करताना विश्वक्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाच्या डेन पीटर गेटला नामोहरम केले. सहाव्या मानांकित सायनाने जागतिक क्रमवारीवरील १९व्या क्रमांकाच्या फिर्दासारीचा २१-१८, १७-२१, २१-१७ असा ५० मिनिटांच्या लढतीत पराभव केला. आता सायनाची शुक्रवारी चीनच्या तिसऱ्या मानांकित लिन वांगशी गाठ पडेल. वांगने कोरियाच्या हाय यॉन ह्वांगचा २१-१०, २१-१० असा पराभव केला.

भारतीय महिलांची अपयशी सलामी
टॉन्टन, ११ जून / पीटीआय

भारतीय महिलांची येथे सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेतील सुरुवात खराब झाली. ब गटातील पहिल्याच लढतीत यजमान इंग्लंडने गुरुवारी भारताचा १० विकेटस् राखून आरामात पराभव केला. इंग्लंडने आधी भारताला ११२ धावांवर रोखले. भारतातर्फे मिथाली राज आणि सुलक्षणा नाईक यांनी प्रत्येकी २४ धावा काढून संघाला शतकापर्यंत मजल मारून दिली. हॉली कॉल्विनने २० धावांत तीन बळी घेत भारताला हादरे दिले. त्यानंतर, सलामीवीर चार्लट एडवर्डस् (६१) आणि सराह टेलर (५०) यांनी ४.२ षटके राखून यजमानांना सहज विजय मिळवून दिला.

पार्नेलच्या गोलंदाजीपुढे आफ्रिकेची भंबेरी
नॉट्टिंगहॅम, १२ जून/ वृत्तसंस्था

पाकिस्तानला सहज नमवून ‘सुपर एट’ फेरीमध्ये पोहोचलेल्या इंग्लंडची दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भंबेरी उडविली आणि प्रथम फलंदाजी करताना त्यांना सर्व विकेट्सच्या मोबदल्यात १११ धावाच करता आल्या. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शेवटचे षटक टाकून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देणाऱ्या वेन पार्नेलने सर्वाधिक तीन बळी टिपले. नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार पॉल कॉलिंगवूडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ते त्याच्या चांगलेच अंगलट आले. पहिल्या चार धावांमध्ये संघाचे सलामीवीर तंबूत परतले होते. त्यानंतर केव्हिन पीटरसन (१९), ओवेश शहा (३८) आणि कर्णधार पॉल कॉलिंगवूड (१९) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण मोठी खेळी साकारण्यात ते अपयशी ठरले. त्यांचा अपवाद वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. वेन पार्नेलला यावेळी व्हॅन डर मव्‍‌र्ह आणि जॅक कॅलिस यांनी प्रत्यकी दोन विकेट्स घेत सुयोग्य साथ दिली.