Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सेहवागच्या दुखापतीची बोर्डाला माहिती होती!
नवी दिल्ली, ११ जून / पीटीआय

 

वीरेंद्र सेहवागच्या दुखापतीबाबत वादविवाद ऐन रंगात आला असताना आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मात्र बचावात्मक पवित्रा स्वीकारला आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी भारतीय संघाची निवड करण्यापूर्वी आपल्याला सेहवागच्या खांद्याच्या दुखापतीची माहिती होती, असे बोर्डाने म्हटले आहे.
विश्वचषक स्पध्रेदरम्यान सेहवागची दुखापत बरी होईल, अशी बीसीसीआयला आशा होती. परंतु लंडनमध्ये दुखापत बळावल्यामुळे त्याला विश्वचषक स्पध्रेतील एकही सामना खेळता येणार नसल्याची नामुष्की ओढवली आहे.
प्रसारमाध्यमे आणि वित्त समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, सेहवागच्या खांद्याच्या दुखापतीची बोर्डाला कल्पना होती.

कार्तिकच्या समावेशास आयसीसीची मान्यता
ट्रेंट ब्रिज : ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात जखमी वीरेंद्र सेहवागऐवजी दिनेश कार्तिक याचा समावेश करण्यास आयसीसीने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड संघात जेसी रायडरऐवजी अ‍ॅरन रेडमंडच्या समावेशासही आयसीसीने मंजुरी दिली आहे. जखमी वीरेंद्र सेहवाग ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेत एकही सामना न खेळताच मायदेशी परतला आहे. त्याच्याऐवजी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकचा समावेश करू द्यावा अशी विनंती भारतीय क्रिकेट बोर्डाने आयसीसीला केली होती.