Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अग्निपरीक्षा
भारत वेस्ट इंडिजशी आज भिडणार
लंडन, ११ जून/ पीटीआय

 

उपकर्णधार वीरेंद्र सेहवागच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने विजयी घौडदौड कायम राखली असून उद्या होणाऱ्या ‘सुप एट’ फेरीतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजशी भिडण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
सुरेश रैना तिसऱ्या क्रमांकासाठी आदर्श फलंदाज असताना महेंद्रसिंग धोनी त्या स्थानावर का येतो हे कोडे अजूनही उलगडलेले नाही. रैनाला तिसऱ्या क्रमांकावर पाठवल्यास संघाची धावगती वाढण्यास मदत होईल. युवराज सिंग चांगल्या ‘टच’मध्ये दिसतोय. तर युसूफ पठाणला अद्याप पुरेशी संधी मिळालेली नाही, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये धावांची गती वाढवण्याचे कसब त्याला अवगत आहे. गोलंदाजीमध्ये झहीर खान, इशांत शर्मा, हरभजन सिंग आणि प्रज्ञान ओझा यांचे स्थान पक्के आहे. इरफान हा चांगला अष्टपैलू खेळाडू असला तरी त्याच्या गोलंदाजीत धार दिसत नाही. त्यामुळे त्याच्याजागी आर. पी. सिंग किंवा प्रवीण कुमारची वर्णी लागू शकते.
वेस्ट इंडिजचा विजय हा मुख्यत्वे करून कर्णधार ख्रिस गेलवर अवलंबून आहे. पहिल्याच सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चंपी केली होती. त्याला यावेळी चांगली साथ लाभत आहे ती अष्टपैलू ड्वेन ब्राव्होची. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये ब्राव्हो चांगली कामगिरी करत आहे. फलंदाजीमध्ये रामनरेश सरवान आणि शिवनारायण चंदरपॉल या दोन्हीही अनुभवी फलंदाजांना सूर गवसलेला नाही.
गोलंदाजीमध्ये फिरकीपटू सुलेमान बेन आणि लिन्डेल सिमोन्स चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.