Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भारताचा आर्यलडवर दणदणीत विजय
ट्रेन्ट ब्रिज, ११ जून / वृत्तसंस्था

 

झहीर खानने १९ धावांत घेतलेले ४ बळी आणि रोहित शर्माच्या ४५ चेंडूत केलेल्या ५२ धावांमुळे भारताने आयर्लंडविरुद्ध ८ विकेट्सने सहज विजय मिळवित ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील साखळी लढतींचा गोड शेवट केला. साखळीतील दोन्ही सामने जिंकून भारताने स्पर्धेतील आपला वरचष्मा कायम राखला. भारताने आज नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली आणि ११२ धावांत त्यांचा खुर्दा केला. हे आव्हान भारताने १५ चेंडू व आठ फलंदाज शिल्लक ठेवून सहज पार केले. हे लक्ष्य गाठताना भारतीय फलंदाजांनी कंटाळवाणा खेळ केला. रोहित शर्माने आपला फॉर्म कायम राखताना अर्धशतक साजरे केले तर सलामीवीर गंभीरने ३७धावांची खेळी केली. मात्र त्यात कोणतीही गंमत नव्हती.
त्याआधी, झहीरच्या भेदक गोलंदाजीने आयर्लंडच्या फलंदाजीच्या चिरफळ्या उडाल्या. त्याने घेतलेल्या चार बळींमुळे आयर्लंडचा संघ शतकाची मजलही गाठू शकेल की नाही, असा अंदाज होता. पण डावाच्या अखेरच्या षटकात हरभजनने दिलेल्या १५ धावांमुळे त्यांना शतकाची मजल गाठता आली. प्रज्ञान ओझानेही आपली गोलंदाजीतील लय कायम ठेवत २ बळी घेतले.
डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानने आपल्या दर्जाला साजेशी गोलंदाजी करताना आयर्लंडचे चार फलंदाज झटपट तंबूत धाडत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील साखळीतील अखेरच्या सामन्यात आयर्लंडला चांगलेच अडचणीत आणले. आयर्लंडने तरीही शतकाचा टप्पा ओलांडत ८ बाद ११२ अशी मजल मारली. झहीरने पोर्टरफिल्ड (५), ब्रे (०), बोथा (१९) या आघाडीच्या फलंदाजांना माघारी धाडत आयर्लंडच्या आव्हानातली हवाच काढून टाकली. या स्पर्धेत सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रज्ञान ओझानेही ओब्रायन व मूनी यांच्या रूपात दोन बळी घेऊन आयर्लंडला धक्के दिले. त्याआधी, पावसाने या सामन्याच्या सुरुवातीलाच अडथळा निर्माण केल्यामुळे हा सामना १८ षटकांचाच करण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि धोनीचा हा निर्णय गोलंदाजांनी अचूक ठरविला.