Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सायमंड्स लवकरच परतेल- वॉर्न
लंडन, ११ जून/ वृत्तसंस्था

 

अष्टपैलू अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स लवकरच ऑस्ट्रेलिया संघात परतेल, अशी आशा ऑस्ट्रेलियाचा निवृत्त फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने व्यक्त केली आहे. नवा वाद ओढवून घेतल्याबद्दल सायमंड्स हाही तितकाच दोषी ठरतो, असेही वॉर्नने नमूद केले आहे.
आपल्या स्तंभात वॉर्न याने म्हटले आहे, की हा संपूर्ण प्रकार ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. सायमंड्सबद्दल सहानुभूती बाळगताना या प्रकरणात सायमंड्स हाही दोषी आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. मुळात अनेक प्रकरणांत वादग्रस्त ठरलेल्या सायमंड्सने आपल्या हातून चुका होणार नाहीत, याची दक्षता घ्यायला हवी होती. ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणे सायमंड्सच्या दृष्टीने तितकेसे महत्त्वाचे नसावे, असे त्याच्या वर्तनावरून दिसते. त्याची संघातून हकालपट्टी होणे दुर्दैवाचे आहे. मात्र त्याने ही हकालपट्टी ओढवून घेतली आहे. त्याच्या या वर्तनाने त्याच्या मागे उभे राहणाऱ्या मंडळींचीही मान शरमेने खाली गेली आहे, असेही वॉर्न याने नमूद केले आहे. संघातून हकालपट्टी झाली म्हणजे सायमंड्स याची कारकीर्द संपुष्टात आली, असे मला वाटत नाही. या प्रकरणातूनही सायमंड्स बाहेर येईल आणि ऑस्ट्रेलिया संघात पुन्हा स्थान मिळवेल, अशी आशाही वॉर्न याने व्यक्त केली आहे. ट्वेंटी २० क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांचा प्रभाव वाढत असल्याबद्दल वॉर्न याने या स्तंभात आनंद व्यक्त केला आहे. वॉर्न याने म्हटले आहे, की ट्वेंटी २० क्रिकेट हे नेहमीच फलंदाजांचे म्हणून ओळखले जाते. फिरकी गोलंदाजांना खेळण्याचे तंत्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आत्मसात केलेले नाही, त्यामुळेच ऑस्ट्रेलिया संघावर ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली.