Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

यापुढेही तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा विचार नाही -धोनी
ट्रेण्टब्रिज, ११ जून / पीटीआय

 

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणे हा फलंदाजीच्या क्रमवारीतील प्रयोगाचा भाग होता आणि ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेत पुढेही तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा आपला अजिबात विचार नसल्याचे कर्णधार धोनीने स्पष्ट केले आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी फॉर्मात असणारा सुरेश रैना हाच योग्य पर्याय असूनही साखळीतील पहिल्या दोन्ही लढतीत धोनी त्या क्रमांकावर आला; पण त्याला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे आर्यलडवरील विजयानंतर काल त्याला त्याबाबत छेडून यापुढेही तूच तिसऱ्या क्रमांकावर खेळणार का, असे विचारले असता त्याने वरीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खान याला पहिल्याच लढतीत मिळालेल्या यशाने धोनी भलताच खूश आहे. झहीरने आर्यलडविरुद्ध खेळताना चार बळी आणि सामनावीर किताबही पटकावला.
कालपर्यंत खांद्यावरील दुखापतीवर उपचार घेणाऱ्या झहीरला पुन्हा सूर गवसला ही संघाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. चेंडू अप्रतिम स्वींग करणाऱ्या झहीरने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून हे यश मिळविले. आर्यलडविरुद्धच्या लढतीत गोलंदाजीची कामगिरी चांगली झाली असली तर संघाच्या एकूणच क्षेत्ररक्षणाबाबत धोनी नाराज आहे. क्षेत्ररक्षणात अजून चांगली कामगिरी आपल्याला अपेक्षित असल्याचे त्याने म्हटले आहे.
पुन्हा एकदा आपल्याला बळी मिळाल्याबद्दल झहीर खान यानेही समाधान व्यक्त केले आहे. इंग्लंडमधील हे आपले सर्वात आवडते मैदान असून, येथे मिळालेल्या बळींमुळे आपला आत्मविश्वास उंचावला असल्याचे त्याने सांगितले. यापुढील लढतीतही चांगली गोलंदाजी करून शेवटच्या षटकांमधील गोलंदाजीची समस्या सोडविण्याचा आपण प्रयत्न करू, असेही त्याने म्हटले आहे. हरभजन आणि ओझा या फिरकी गोलंदाजांनी दाखविलेल्या सातत्यामुळे भारतीय गोलंदाजी समतोल बनली असल्याचे झहीरने म्हटले आहे.