Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रोनाल्डोसाठी रिअल माद्रिदची विक्रमी बोली
मँचेस्टर, ११ जून / ए. एफ. पी.

 

ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी रिअल माद्रिदने लावलेली १३० दशलक्ष डॉलर्सची विक्रमी बोली मँचेस्टर युनायटेडने मान्य केली आहे. आपल्या क्लबसाठी रोनाल्डो हवा यासाठी रिअल माद्रिदने मँचेस्टर युनायटेड समोर ८० दशलक्ष पौंडांची विश्वविक्रमी प्रस्ताव आणि तोदेखील कुठलीही अट न घालता ठेवला होता.
रोनाल्डो यानेही रिअल संघासाठी खेळण्याची इच्छा प्रगट केल्याने खेळाडूंच्या प्रतिनिधींशी चर्चा करून अखेर मँचेस्टर युनायटेडने या प्रस्तावास मंजुरी दिली. या संदर्भातील व्यवहार ३० जूनपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, पुढील सूचना मिळेपर्यंत क्लब यावर भाष्य करणार नाही.
रोनाल्डोसारखा खेळाडू आपल्याकडे हवा यासाठी स्पॅनिश जाएंट माद्रिद बराच काळ प्रतीक्षेत होता. फ्लोरेन्टिनो पेरेझ हे अध्यक्षपदी आले आणि आठवडय़ापूर्वीच रोनाल्डोला आपल्या क्लबमध्ये घेण्यासाठी आपण वाटेल ते करू, असे म्हटले होते.
दोन दिवसांपूर्वीच ब्राझीलचा ‘प्लेमेकर’ काका याला ए. सी. मिलानकडून ५६ दशलक्ष पौण्डाला मिळविणाऱ्या माद्रिदने आज विश्वविक्रमी किमतीने रोनाल्डोही मिळविला आहे.