Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विजेंदर, सुरंजयसिंग यांचे पदक निश्चित
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा
नवी दिल्ली ११ जून/पीटीआय

 

ऑलिम्पिक ब्राँझपदक विजेता विजेंदरसिंग याच्याबरोबरच सुरंजयसिंग यानेही आशियाई मुष्टियुध्द स्पर्धेत उपान्त्य फेरीत स्थान मिळवित पदक निश्चित केले. ही स्पर्धा झुआई (चीन) येथे सुरु आहे.
विजेंदरने मिडलवेट गटात किर्गिझस्तानच्या कारिपोव रुझलान याच्यावर १९-४ असा दणदणीत विजय नोंदविला. गतवर्षी याच स्पर्धेत त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती. विजेंदरसिंगची आता चीनच्या झांग जियान तिंग याच्याशी गाठ पडणार आहे. हा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. फ्लायवेट (५१ किलो) गटात राष्ट्रीय विजेत्या सुरंजयने दक्षिण कोरियाच्या पाकजोंग चोल याचा ५-१ असा चुरशीच्या लढतीनंतर पराभव केला. मणिपूरच्या २२ वर्षीय सुरंजयची आता उपांत्य फेरीत थायलंडचा ऑलिंपिकपटू रुऐनरोतंग अ‍ॅम्नज याच्याशी लढत होणार आहे.
विजेंदरचा भाऊ बलविंदर याला मात्र आज ६४ किलो गटात पराभव पत्करावा लागला. १८ वर्षांच्या बलविंदरला इराणच्या करामी हाऊमन याच्याकडून हार स्वीकारावी लागली. गुणांच्या फेरमोजणीत करामीला विजयी घोषित करण्यात आले.५७ किलो गटात थायलंडच्या मासुक वुटीचाई याने भारताच्या छोटेलाल यादव याचा ४-३ असा केवळ एका गुणाने पराभव केला. चेक प्रजासत्ताकमध्ये नुकत्याच झालेल्या युरोपियन स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या विजेंदरला आजच्या लढतीत फारशी अडचण आली नाही. त्याने पहिल्या तीन मिनिटांत ६-१ अशी आघाडी घेतली होती. नंतरच्या दोन फेऱ्यांमध्ये त्याच्या प्रतिस्पध्र्यास फारसा प्रभाव दाखविता आला नाही. या लढतीत सुरुवातीपासून मीच आघाडीवर असल्यामुळे प्रतिस्पध्र्यावर सतत दडपण राहिले.त्यामुळे मला मोठा विजय मिळविता आला.
भारताच्या थोकचोम नानाओसिंग (४८ किलो), जितेंदरकुमार (५४ किलो), जय भगवान (६० किलो), दिनेशकुमार (८१ किलो) व परमजित सामोटा (९१ किलोवरील) यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीत स्थान मिळवित पदकाची खात्री दिली आहे. गतवर्षी भारताने या स्पर्धेत एक रौप्य व पाच ब्राँझपदके मिळविली होती.