Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सलामीवीर रेडमन्डने केले संधीचे सोने
न्यूझीलंडचा आर्यलडला दणका
ट्रेन्टब्रिज, ११ जून / वृत्तसंस्था

 

जायबंदी जेसी रायडरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या सलामीवीर अ‍ॅरोन रेडमन्डने संधीचे सोने केले आणि न्यूझीलंडने नवख्या आर्यलड संघाला ८३ धावांनी पराभवाचा जोरदार दणका देत ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘फ’ गटाच्या ‘सुपर एट’ फेरीत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले १९९ धावांचे आव्हान आर्यलडला झेपलेच नाही आणि त्यांचा डाव १६.४ षटकांमध्ये ११५ धावांवर संपुष्टात आला.
भल्या मोठय़ा आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या आर्यलडची न्यूझीलंडच्या अचूक माऱ्यापुढे तसेच त्यांच्या चपळ क्षेत्ररक्षणापुढे पुरती दाणादाण उडाली. गॅरी विल्सनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाचा न्यूझीलंडच्या माऱ्यापुढे टिकाव लागला नाही. नील आणि केव्हिन या ओब्रेयन बंधूंनाही चमत्कार घडवता आला नाही. आता न्यूझीलंडची पुढची लढत येत्या शनिवारी पाकिस्तानशी तर आर्यलडची लढत रविवारी श्रीलंकेविरुद्ध होईल.
त्याआधी, अ‍ॅरोन रेडमन्डच्या (६३ धावा, ३० चेंडू, १३ चौकार) तडफदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ५ बाद १९८ धावांची मजल मारली. दुखापतग्रस्त जेस रायडरच्या स्थानावर संघात समावेश करण्यात आलेल्या रेडमन्डने संधीचे सोने करताना आज झंझावाती खेळी करत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारून दिली. मार्टिन गुप्तिल (नाबाद ४५) व स्कॉट स्टायरिस (४२) यांचे योगदानही उल्लेखनीय ठरले. सुपर एट फेरीतील ‘फ’ गटाच्या या लढतीत दुखापतग्रस्त कर्णधार डॅनियल व्हेटोरी, रॉस टेलर व जेसी रायडर या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळताना ब्रॅन्डन मॅक् कलम (१०) व रेडमन्ड यांनी न्यूझीलंड संघाला चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या २ षटकात ३२ धावा वसूल केल्या. मॅक् कलम व रेडमन्ड यांनी न्यूझीलंडला झटपट धावसंख्येचे अर्धशतक गाठून दिले. मॅक् क्युलमला
मॅक् कलनने माघारी परतवत आर्यलडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मार्टिन गुप्तिल व रेडमन्ड यांनी आक्रमक फलंदाजी करत धावगतीला वेग दिला. रेडमन्डचा झंझावात रोखण्यात कुसॅक यशस्वी ठरला. त्यानंतर गुप्तिलने स्टायरिसच्या साथीने न्यूझीलंडला दीडशेचा पल्ला ओलांडून दिला. जेकब ओरामने १५ धावांची भर घालत न्यूझीलंडला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
न्यूझीलंड :- ब्रॅन्डन मॅक् क्युलम झे. वेस्ट गो. मॅक् कलन १०, अ‍ॅरोन रेडमन्ड पायचित गो. कुसॅक ६३, मार्टिन गुप्तिल नाबाद ४५, स्कॉट स्टायरिस झे. केव्हिन ओब्रायन गो.
मॅक् कलन ४२, जेकब ओराम झे. बोथा गो. कुसॅक १५, पीटर मॅक् ग्लाशन त्रि. जॉन्स्टन ०५, जेम्स फ्रॅन्कलिन नाबाद ०७. अवांतर (बाईज ३, लेगबाईज ४, वाईड ४) ११. एकूण २० षटकात ५ बाद १९८. बाद क्रम : १-५१, २-९१, ३-१५२, ४-१६८, ५-१७६. गोलंदाजी : कोनेल १-०-१४-०, जॉन्स्टन ४-०-४३-१, केव्हिन ओब्रायन ४-०-३१-०, मॅक् कलन ४-०-३३-२, कुसॅक ४-०-४३-२, वेस्ट ३-०-२७-०.
आर्यलड - विल्यम पोर्टरफिल्ड धावबाद ०१, गॅरी विल्सन झे. फ्रॅन्कलिन गो. स्टायरिस २३, नील ओब्रायन झे. ओराम गो. मिल्स ०३, आंद्रे बोथा धावबाद २८, केव्हिन ओब्रायन झे. फ्रॅन्कलीन गो. नील मॅक् क्युलम ०२, जॉन मुनी धावबाद मॅक् क्युलम १२, कुसॅक झे. मॅक् क्युलम गो. नील मॅक् क्युलम २०, जॉन्स्टन धावबाद मॅक् क्युलम१४,
कायले मॅक् कलन पायचित गो. मॅक् क्युलम ००, वेस्ट त्रि. गो. मिल्स ०८, पी. कोनेल नाबाद ०१. अवांतर (लेगबाईज २, वाईड ३) ३. एकूण १६.४ षटकात सर्वबाद ११५. बाद क्रम : १-१, २-१५, ३-५७, ४-५८, ५-६७, ६-८६, ७-१०४, ८-१०४, ९-११२, १०-११५. गोलंदाजी : मिल्स २.४-०-१२-२, फ्रँकलीन ३-०-१७-०, बटलर २-०-१५-०, ओराम ३-०-२५-०, स्टायरिस ३-०-२९-१, नील मॅक् कलम ३-०-१५-३,