Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

एशियन वॉर
पाकिस्तान-श्रीलंकेमध्ये आज ‘सुपर एट’ चा सामना
लंडन, ११ जून/ वृत्तसंस्था

 

‘क’ गटात अव्वल स्थानावर असलेला श्रीलंकेचा संघ आणि ‘ब’ गटामधून एका सामन्यात विजय मिळवलेला पाकिस्तानचा संघ यांच्यामध्ये उद्या ‘सुपर एट’ चा सामना होणार असून एक चांगले ‘एशियन वॉर’ क्रिकेटच्या पंढरीत अनुभवायला मिळेल. साखळी सामन्याचा विचार केल्यास श्रीलंकेचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड दिसत आहे.
साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभूत केल्याने श्रीलंकेचे मनोधैर्य चांगलेच उंचावलेले असेल. गोलंदाजीमध्ये अजंता मेंडिस आणि लसिथ मलिंगा ही श्रीलंकेची बलस्थाने आहेत. तर मुथय्या मुरलीधरनही अनुभव पणाला लाऊन फलंदाजांची त्रेधा उडवताना दिसत आहे. फलंदाजीमध्ये सलामीवीर सनथ जयसूर्या फॉर्मात आल्याने कर्णधार कुमार संगकाराला हायसे वाटले असेल. कारण एकटा खेळपट्टीवर उभा राहून त्याने बरेच सामने संघाला जिंकवून दिले आहेत. त्याचबरोबर तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा चांगल्या फॉर्मात आहेत. महेला जयवर्धनेला अजूनही फॉर्म गवसलेला नाही.
पाकिस्तानची फलंदाजी अद्यापही फॉर्मात आलेली नाही. सलमान बट्ट आणि कामरान अकमल हे दोन्हीही सलामीवीर भरवशाचे वाटत असले तरी त्यांनी एकाही सामन्यात संघाला चांगली सुरूवात करून दिलेली नाही. शोएब मलिक आणि कर्णधार युनूस खान हे अनुभवी फलंदाज मधल्या फळीत चांगली कामगिरी करत असले तरी मोठी खेळी साकारण्यात त्यांना अपयश आलेले आहे. शाहिद आफ्रिदी फलंदाजीत ‘सुपर फ्लॉप’ असला तरी गोलंदाजीमध्ये ‘सुपर हिट’ ठरलेला आहे. त्याचबरोबर फिरकीपटू सईद अजमल चांगल्या फॉर्मात आहे. पण वेगवान गोलंदाजांना सूर गवसलेला नाही.