Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

निर्मल स्वच्छतागृह चक्क नाल्यात
शिवसेना उपशहर प्रमुखाचा आंदोलनाचा इशारा
महापौरांचे कारवाईचे आश्वासन
ठाणे/प्रतिनिधी

निर्मल एम.एम.आर. अंतर्गत चक्क नाल्यात दोन मजली स्वच्छतागृह उभारण्याचे धाडस ठेकेदारांनी दाखविले आहे. हे अनधिकृत बांधकाम शासनाच्या निधीतून केले जात असून त्याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहाच्या मागील बाजूस असलेल्या महात्मा फुले मंडईतील नाल्यात मएमआरडीएच्या निर्मल एम.एम.आर. योजनेंतर्गत वस्ती स्वच्छतागृह बांधले जात आहे. यासाठी ३१ लाख रुपये खर्च केले जात आहेत.

जकात आणि पाणी खात्यातील माफियाराज मोडीत काढण्याचा आयुक्तांचा निर्धार
विरोधकांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प मंजूर
१४२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प
ठाणे/प्रतिनिधी -
ठाणे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या जकात विभागात मोठय़ा प्रमाणात माफिया घुसले आहेत. त्यामुळे या विभागाची पूर्णत: अधोगती झाली आहे परंतु येत्या चार दिवसात या विभागाची पुनर्रचना करण्यात येणार असून, या विभागातील माफियाराज मोडून काढले जाईल. पाणीपुरवठा विभागातही अशाच प्रकारची परिस्थिती असून, त्यावरही नियंत्रण आणले जाईल, अशी घोषणा आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत केली.

अखेर माजी सैनिकांना मिळाली मालमत्ता करात सवलत
पालिका आयुक्तांची दिलगिरी

ठाणे/प्रतिनिधी

ठाणे महापालिका क्षेत्रातील माजी सैनिकांना मालमत्ता करात सवलत देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात झालेल्या प्रशासकीय दिरंगाईबद्दल पालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी बुधवारी दिलगिरी व्यक्त केली, तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणीचा आदेशही काढला.
२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महापालिका क्षेत्रातील माजी सैनिकांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने केली होती. मात्र गेले पाच महिने या निर्णयाची अंमलबजावणीच होत नव्हती. एवढेच नव्हे, तर माजी सैनिकांना पूर्वीप्रमाणेच मालमत्ता कराची बिले पाठविण्यात आली.

स्त्री मुक्ती संघटनेतर्फे संवादक प्रशिक्षण कार्यशाळा
प्रतिनिधी

स्त्री मुक्ती संघटना आणि इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ, ठाणे या दोन संस्थांच्या वतीने दरवर्षी किशोरवयीन मुलामुलींसाठी ‘जिज्ञासा’ प्रकल्प कार्यान्वित केला जातो. या प्रकल्पात सहभागी होऊन प्रशिक्षित संवादक म्हणून काम करता यावे म्हणून प्रशिक्षण देण्यात येत आहे. १९, २०, २१ जून असे तीन दिवस प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

सोमवारचा बाजार हटविल्याने रस्ते झाले मोकळे
डोंबिवली/प्रतिनिधी -
डोंबिवली पूर्वेत दर सोमवारी गेल्या अनेक वर्षांपासून भरणाऱ्या अनधिकृत बाजाराचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्णय ‘फ’ प्रभागाने घेतल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेली चार ते पाच वर्षे डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशन ते मानपाडा रोड चार रस्त्यापर्यंत मोक्याच्या जागी अनधिकृत बाजार भरतो. मुंबई परिसरातील फेरीवाले या ठिकाणी येऊन सकाळपासून व्यवसाय करतात, पण पालिकेला या बाजारापासून पाच पैशांचा फायदा होत नाही.

कमी दराच्या निविदा मंजूर करण्यास अधिकारी आणि सदस्यांची टाळाटाळ
कल्याण/प्रतिनिधी
- वाढीव दराच्या निविदा मंजूर करून मलई खाण्याची सवय लागलेल्या पालिकेतील पदाधिकारी, सदस्य आणि अधिकाऱ्यांना सोमवारी पाणी योजनेच्या कमी दराच्या निविदा मंजूर करताना, डोळ्यात नक्राश्रू आले होते. सोमवारी स्थायी समितीच्या सभेत नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने एक पाणी योजना तयार केली आहे. या कामासाठीच्या जलशुद्धीकरण केंद्र, पाणीपुरवठा, वितरण योजनेच्या सुमारे दोनशे कोटीच्या निविदा स्थायी समितीत मंजुरीला आल्या होत्या.

करिअर पथावरील सुयोग्य संधींची ओळख
ठाणे/प्रतिनिधी

सध्या विविध परीक्षांच्या निकालांना सुरुवात झाली आहे. मिळालेल्या गुणांनुसार कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश द्यायचा, याविषयी विद्यार्थी-पालकांच्या मनात चाचपणी सुरू आहे. मात्र करिअर निवडताना केवळ गुणांचा निकष न ठेवता विद्यार्थ्यांमधील क्षमता, आवड, कौशल्ये अशा अनेक घटकांचा विचार करायला हवा. करिअरच्या मळलेल्या वाटांनीच न जाता २१ व्या शतकात निर्माण झालेल्या विविध करिअर्सचाही विचार विद्यार्थ्यांनी करायला हवा. सध्या अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्याची तक्रार
डोंबिवली/प्रतिनिधी -
वाहतूक कार्यालयातील पोलीस वाहनचालकांची मोठय़ा प्रमाणात पिळवणूक करीत असल्याची तक्रार भाजप युवा मोर्चाचे प्रदेश प्रतिनिधी गिरीश वाडेल यांनी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. वाडेल यांनी म्हटले आहे, वाहतूक शाखेतर्फे शहरात टोईंग व्हॅन फिरवली जाते. नो पार्किंग विभागातील वाहने उचलताना टोईंग वाहनचालकाने तीन वेळा भोंगा वाजविणे आवश्यक आहे परंतु ही प्रक्रिया पार न पाडता थेट वाहने उचलून नेली जातात. ही वाहने वाहनतळावर नेल्यानंतर तेथे शिपाई दर्जाचा कामगार वाहनचालकांकडून कागदपत्रांची मागणी करत असतो. वस्तुत: तशी कागदपत्रे मागण्याचा कामगाराला अधिकार नाही, अशा विविध प्रकारच्या तक्रारी त्यांनी केल्या आहेत.

‘साई’ संस्थेचे सेवाभावी कार्य प्रशंसनीय - खा. सुरेश टावरे
भिवंडी/वार्ताहर
एचआयव्हीसह जगणाऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या मुंबई येथील ‘साई’ या सेवाभावी संस्थेचे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे. भिवंडी शहरातील सेवाभावी संस्थानी ‘साई’ चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यास एड्सचा समूळ नायनाट होईल, असे आवाहन नवनिर्वाचित खासदार सुरेश टावरे यांनी येथे केले. एकता नगर, नारपोली गाव भिवंडी येथे साई धर्मादाय दवाखान्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या दवाखान्यात एड्स रुग्णांबरोबरच सर्वसामान्यांनाही अल्पदरात सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साई ही संस्था १९९१ पासून मुंबईत कार्यरत आहे. कुर्ला ते कुलाबा आणि माटुंगा ते चर्चगेट तसेच १० रेडलाइटस भागात साई एचआयव्हीग्रस्तांसाठी कार्य करत आहे. आज या संस्थेच ४६४ एचआयव्हीग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. देशाचे यंत्रमाग उद्योगातील मॅंचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात परप्रश्नंतातून अनेक लोक रोजगारासाठी येत असतात. त्यामुळे येथे एड्सचा फैलाव मोठय़ा प्रमाणात एड्सवर मात करण्यासाठी साईने या धर्मादाय दवाखान्याची उभारणी करण्यात आल्याचे साई संस्थेचे अध्यक्ष विनय वस्त यांनी सांगितले. याप्रसंगी महानगरपालिकेचे महापौर जावेद दळवी, गलिच्छ वस्ती सुधार समितीचे सभापती मधुकर जगताप, गटनेते गजानन शेटे, सभापती मनोज म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘अन्विती’ तर्फे डॉक्टरांसाठी एकपात्री अभिनय स्पर्धा
प्रतिनिधी

मुंबईतील अन्विती या वैद्यकीय व्यावसायिकांच्या संस्थेने अलीकडेच मालाड येथे वैद्यकीय व्यावसायिकांसाठी एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली होती. मुंबई-ठाणे परिसरातील ११ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. इनामदार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. डॉ. प्रभाकर उकले, डॉ. मंजिरी देसाई आणि डॉ. सुप्रिया काशिद यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला. डॉ. मोहिनी वेलापूरकर आणि डॉ. कैवल्य ठाकूर यांच्या अभिनय कौशल्यास परीक्षकांनी विशेष दाद दिली. अभिनेते कन्नन अय्यर आणि एकांकिका लेखक निगळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सावंतवाडी येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. सुरेंद्र पारकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्वात वयोवृद्ध डॉ. अनिल वैद्य यांनी सादर केलेले स्वगत अध्यक्षांना आवडले. डॉ. संजय तळगांवकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रशांत नाईक यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.