Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

ऐन महत्त्वाच्या वेळीच वैद्यकीय आणि नागरी सेवा कोलमडल्या..!

 

‘इंडियन एक्स्प्रेस’ने मिळविलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबरला रात्री १०-३५ च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाकडून अग्निशमन दलाला पहिला फोन आला. ओबेरॉय-ट्रायडण्ट हॉटेलमध्ये अग्निशामक बंब पाठविण्याची विनंती करण्यात आली. दहशतवाद्यांनी हॉटेलमध्ये हातबॉम्ब फेकणे सुरूच ठेवले होते. १५ मिनिटांतच अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचले. रात्री १२-५० च्या सुमारास कंदहार रेस्तराँजवळच्या लॉबीत आग लागली. दहशतवादी तेव्हा हॉटेलच्या वरच्या मजल्यावर पोहोचले होते. रात्री एक वाजून एक मिनिटांनी पोलीस नियंत्रण कक्षाकडून अग्निशामक दलाला दुसरा फोन आला आणि ताजमहाल हॉटेलमध्येही दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याने तेथेही अग्निशामक बंब पाठविण्यास सांगण्यात आले. तेव्हा पथकातील निम्म्या जवानांना तिकडे पाठविण्यात आले. कुलाबा अग्निशमन केंद्रातील आणखी एक पथकही रवाना करण्यात आले. पोलीस आयुक्त हसन गफूर हे ऑबेरॉय ट्रायडण्ट हॉटेलबाहेर पोलिसांना मार्गदर्शन करीत होते; तर ताजमहाल हॉटेलबाहेर अग्निशमन दलाला असे कोणी आढळले नाही. खरे म्हणजे ‘ताज’च्या संपूर्ण परिसराला राज्य राखीव पोलीस दलाने (एसआरपीएफ) वेढा दिला होता आणि कोणालाच म्हणजे अगदी अग्निशमन दलालासुद्धा ते हॉटेलकडे जाऊ देत नव्हते. ‘‘दहशतवाद्यांकडे मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा आहे. त्यामुळे कोणालाही हॉटेल परिसरात जाऊ देऊ नका, अशा सक्त सूचना, आदेश आम्हाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत,’’ असे ते सर्वाना सांगत होते. आम्हालाही हॉटेलपासून ५०० मीटर दूर राहण्यास सांगण्यात आले, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी पी. करगुप्पीकर आणि ए. व्ही. सावंत यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
‘‘रात्रभर नुसता गोंधळ चालला होता. कोणाशी बोलावे तेच आम्हाला कळत नव्हते. घटनास्थळी समन्वयासाठी कोणी जबाबदार माणूसच नव्हता. ज्याला जे योग्य वाटेल ते तो करीत होता,’’ असे अग्निशमन दलाच्या दुसऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. २००६ मध्ये अग्निशमन दलाने ‘ताज’ हॉटेलचे संपूर्ण ‘फायर ऑडिट’ केलेले होते त्यामुळे मदतकार्यासाठी कोठून जायचे, काय करायचे याची दलाला पूर्ण माहिती होती. पोलीस आणि ‘एनएसजी’ला ही माहिती उपयुक्त ठरली असती, असे ‘इंडियन एक्स्प्रेस’ला आढळून आले. तथापि, अग्निशमन दल अशा गोष्टी स्वत:हून देऊ करीत नाही. इतर सुरक्षा यंत्रणांनी विचारले नाही किंवा विनंतीही केली नाही. हॉटेलमध्ये जाऊन, आत अडकलेल्या लोकांची सुटका करण्याची तयारी अग्निशमन दलाने ठेवलेली होती; परंतु पोलीस त्यांना आत जाऊ देण्यास तयार नव्हते. हॉटेलमध्ये शिरलेले ‘लष्कर-ए-तैय्यबा’चे दहशतवादी बॉम्बफेक आणि गोळीबार करतील, अशी भीती पोलिसांना वाटत होती.
रात्री १२-३८ पासून पुढे सुमारे दोन तास ‘लष्कर-ए-तैय्यबा’चे चार दहशतवादी ‘ताज’च्या रूम क्रमांक ६३२ मध्ये दडून बसले होते. ‘सीसी टी. व्ही. फुटेज’मध्ये पोलिसांना ते दिसत होते. हॉटेलच्या तळमजल्यावर १२० सशस्त्र पोलीस होते. ‘हेरिटेज’च्या सहाव्या मजल्यावर जाऊन दहशतवाद्यांचा मुकाबला जरी ते करू शकत नव्हते; तरी हॉटेलमधील अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन पथकाला सुरक्षाकवच हे पोलीस देऊ शकले असते. त्यांना तेवढे सहजशक्य होते. परंतु तसे झाले नाही. अग्निशमन पथक आपली साधनसामग्री, उपकरणे घेऊन हॉटेलच्या दक्षिणेकडील गल्लीत बसून होते. मध्यरात्री तीन वाजून पाच मिनिटांनी सहाव्या मजल्यावर मोठी आग लागल्याचे दिसले.
‘आग लागल्याबरोबर आम्ही ती विझविण्याच्या कामाला लागलो,’ असे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ‘‘हॉटेलमध्ये अडकलेले लोक खिडक्यांतून उडी मारून जीव वाचविण्याचे प्रयत्न करू लागले. अग्निशमन दलाने आणलेल्या अ‍ॅल्युमिनिअमच्या शिडय़ा फक्त १५ मीटर उंचीपर्यंतच पोहोचू शकत होत्या. म्हणजे जास्तीत जास्त तिसऱ्या मजल्यापर्यंत! एक महिला वरच्या मजल्यावरून खाली तिसऱ्या मजल्यावर आली आणि खाली उडी मारण्याचा प्रयत्न करू लागली; तोपर्यंत अगदी वरच्या काही मजल्यांवरही लोक अडकलेले आहेत हे अग्निशमन दलाला सांगण्यात आले नव्हते. (क्रमश:)