Leading International Marathi News Daily
शनिवार, १३ जून २००९
  एव्हरेस्टविजेती घडताना...
  पण बोलणार आहे!
बिच्चारी एकटी आहे!
  व्हू पॉइंट
मोठी त्याची सावली
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  गतिमंदांचं सहजीवन
  डोंबिवलीतील कोरियन पाहुणी
  जनरेशन गॅप- एक वरदान
  काळ सुखाचा
मदर - डॉटर क्लब
  चिकन सूप...
शांतीदूत हेन्री डय़ुनान्ट
  ऐसी कळवळ्याची जाती
  कवितेच्या वाटेवर...
कुब्जा
  चॅनेलवाले येता घरा..
  हायस्कूल ग्रॅज्युएशन
  जरतारी चोळी अंजिरी

 

एव्हरेस्टविजेती घडताना...
नुकतीच हिमालयातील एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करून आपल्या घरी विजयी होऊन परतलेली कृष्णा पाटील ही पुण्याची युवती नेमकी घडली कशी, याचा वेध घेणारा लेख..
पालकांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेता गिर्यारोहणाचा छंद जोपासण्याकरिता त्याचा वापर करत कृष्णा पाटील या १९ वर्षीय युवतीने तरुण वयातच मोठा नावलौकिक कमावला आहे. माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई केल्याबद्दल आज तिचे नाव सर्वदूर गाजते आहे. ‘भीती’ हा शब्दच शब्दकोशात नसलेल्या कृष्णाने हिमालयीन गिर्यारोहणात अवघ्या पाच वर्षांत यशाची एकेक पायरी ओलांडत अंतिम शिखर गाठले आहे. गिर्यारोहण व पर्यटनाची विलक्षण आवड असणाऱ्या पाटील कुटुंबात जन्मलेल्या कृष्णाची वाटचाल प्रेरणादायी आहे. तिच्या आई-वडिलांनी आपल्या इच्छा-आकांक्षा अजिबात तिच्यावर न लादता तिला शैक्षणिक व अन्य क्षेत्रांत

 

वाटचाल करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले. या स्वातंत्र्याचा योग्य तो वापर करून कृष्णाने आज इतिहास घडवला आहे.
कृष्णाचे वडील माधवराव र्मचट नेव्हीत अभियंता आहेत. तर आई रंजना पुण्यातील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. वडिलांना डोंगरदऱ्यांमध्ये भटकंतीचा छंद. आईही लहानपणापासूनच धाडसी वृत्तीची. शाळा-महाविद्यालयात असताना एनसीसीत त्यांनी अनेक बक्षिसे मिळविली. सेनादलात जायची त्यांची इच्छा होती. मात्र, काही कारणास्तव त्यांना आपली ही इच्छा पूर्ण करता आली नाही. या दोघांनाही भटकंतीची आवड असल्यामुळे सुट्टीत गाडी काढून ते मनसोक्त भटकंती करायचे. कृष्णाच्या जन्मानंतरही त्यांचा हा छंद टिकून राहिला.
भटकंतीची आवड असणाऱ्यांना भारताच्या उत्तर सीमेवरील हिमालयाने भुरळ घातली नाही तरच नवल! माधवरावांना र्मचट नेव्हीतून सुट्टी मिळाली की हे कुटुंब स्वत:ची गाडी घेऊन हिमालयात भटकंतीला जाई. तंबू, स्वयंपाकाचे साहित्य आदी सर्व गोष्टी बरोबर घेऊन त्यांनी लेह-लडाखसह हिमालयात खूप भटकंती केली आहे. त्यांच्या या छंदामुळे कृष्णालाही पदभ्रमण व गिरीभ्रमणाचे बाळकडू आले. महाराष्ट्रातील डोंगरदऱ्या तिने पालथ्या घातल्या. पगमार्क्स, शिवशक्ती प्रतिष्ठान इत्यादी संस्थांबरोबर तिने बरेच पदभ्रमण केले.
प्राथमिक शाळेत असेतो कृष्णा अभ्यासात हुशार होती. परंतु पाचवीत शिक्षिकेबरोबर विसंवाद सुरू झाल्याने अभ्यासाविषयीची तिची गोडी कमी झाली. मात्र चित्रकला, नृत्य, हस्तकला आदी विषयांची तिला विलक्षण आवड होती आणि अजूनही आहे. त्यामुळे रंजना पाटील यांनी आपल्या मुलीवर अभ्यासाचे ओझे लादायचे नाही असे ठरविले. घरात एकुलती एक असल्याने तिचे लाडही झाले. मात्र ती हाताबाहेर जाणार नाही, याचीही काळजी त्यांनी घेतली. कृष्णाची ७० ते ७५ टक्के गुण मिळविण्याची क्षमता होती. कृष्णाचे काका सेनादलात आहेत. तिने आर्किटेक्चर करावे किंवा सेनादलात जावे, अशी रंजनाताईंची इच्छा होती. पण त्याला तिचे वडील व काकांचा विरोध होता.
कृष्णाला गिर्यारोहणाची आवड असल्याने दहावीची परीक्षा झाल्यानंतर लगेचच तिने नेहरू गिर्यारोहण संस्थेत अ‍ॅडव्हेंचर कोर्समध्ये नाव घातले. हा कोर्स तिने प्रथम श्रेणीत पूर्ण केला. दहावीनंतर तिने कला शाखेत प्रवेश घेतला. बारावीनंतर तिने कोरिओग्राफर होण्याची इच्छा व्यक्त केली. कला शाखेचा अभ्यासक्रम सोडून तिने बंगलोरच्या एका संस्थेत कोरिओग्राफीकरिता प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमात योगासने, मार्शल आर्ट्सचेही प्रशिक्षण दिले जात असल्यामुळे तिची शारीरिक तंदुरुस्ती उत्तम होती. तिने शामक दावरच्या संस्थेत नृत्याचे छोटे छोटे अभ्यासक्रम केले असल्याने त्याचा फायदा तिला बंगलोरच्या या अभ्यासक्रमात झाला. या सर्व अभ्यासक्रमांची माहिती मिळविणे, प्रवेश घेणे इत्यादी कामे तिने स्वत:च केली. त्यामुळे तिच्यात आत्मविश्वास, स्वावलंबी वृत्ती वाढली.
कृष्णा व तिचे कुटुंबीय हिमालयात भटकंती करताना वेळ वाचविण्यासाठी रात्रीचा प्रवास करतात. रंजनाताई स्वत:ही उत्तम मोटार चालवतात. त्या मोटार चालवतात तेव्हा कृष्णाही त्यांच्याबरोबर पुढच्या सीटवर असते. त्यामुळे तिला रात्रीच्या प्रवासाची कधीच भीती वाटत नाही. हिमाचल प्रदेशातून पंजाबमध्ये येताना शिवपुरी घाटात रात्रीच्या वेळी वाटमारीच्या घटना सर्रास घडतात. १९९८-९९ मध्ये पाटील कुटुंबीय या घाटातून प्रवास करत होते. वाटमारीमुळे ट्रकचालकांनी घाटातून पुढे प्रवास न करता रस्त्याच्या कडेला ट्रक उभे केले होते. वाटेत एका ट्रकचालकाचा वाटमारी करणाऱ्यांनी शिरच्छेद केला होता. पण याची तमा न बाळगता पाटील कुटुंबीयांनी मुसळधार पावसातच घाटातून गाडी काढली. वाटमारी करणाऱ्या टोळ्यांची गाडी त्यांच्या समोरून गेली. मात्र भीतीचा लवलेशही न दाखविता त्यांनी बिनधास्तपणे गाडी काढली. कृष्णानेही त्यावेळी हा अनुभव प्रत्यक्ष घेतला.
प्रत्येक गोष्ट अनुभवांती पडताळायची, ही वृत्ती कृष्णामध्ये लहानपणापासूनच आहे. घरातील फ्यूज गेला तर तळघरात जाऊन फ्यूज बदलून पुन्हा दिवे सुरू करण्यास ती नेहमीच पुढे सरसावते. शिवणकामाचीही तिला विलक्षण आवड. त्यामुळे कापड आणून आपले कपडे आपणच शिवण्याची सवय लहानपणापासूनच तिला आहे. प्रत्येक कामात झोकून देण्याची तिची ही वृत्ती तशी लहानपणापासूनचीच. वडील बोटीवर असल्याने घरातील सर्व कामे आपल्या आईवरच पडतात, हे लक्षात आल्यामुळे शाळेत असल्यापासूनच तिने घरातील अनेक कामांची जबाबदारी स्वत:हून उचलली. स्वयंपाकही ती उत्तम बनवते.
डोंगरदऱ्यांमध्ये भटकताना वेगवेगळ्या औषधी वनस्पती गोळा करायच्या, झाडावर उंच चढायचे, याची आवडही तिला लहानपणीच लागली. जिथे जाऊ तेथील स्थानिक लोकांची, तिथल्या निसर्गाची माहिती करून घेण्याचे कुतूहल तिच्यात आहे. गिर्यारोहणासाठी जी कणखर वृत्ती लागते, ती अशा बेधडक भटकंतीमुळेच तिच्यात निर्माण झाली.
बंगलोर येथे कोरिओग्राफीचा अभ्यास करीत असताना तिला नेहरू गिर्यारोहण संस्थेत गिर्यारोहणाचाही एक छोटा कोर्स करायचा होता. पण बंगलोरच्या संस्थेतून तिला तिथे जाण्यासाठी सुट्टी मिळत नव्हती. तेव्हा तिने आपल्याला कावीळ झाली आहे, असे खोटेच सांगून सुट्टी घेतली आणि तिने गिर्यारोहणाचा तो कोर्स पूर्ण केला. अन्य कुणा पालकांनी आपल्या पाल्यास असे करण्याची परवानगी दिली नसती. परंतु कृष्णाच्या गिर्यारोहणाच्या पॅशनची माहिती असल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला याबाबत पूर्ण स्वातंत्र्य दिले.
कृष्णाच्या या अशा वागण्याबद्दल विचारले असता रंजनाताई म्हणाल्या, ‘कृष्णा जे काही करेल ते जिद्दीनेच करेल, याची आम्हाला खात्री आहे. नृत्यातील तिच्या कौशल्याची आम्हाला कल्पना होती. म्हणूनच आम्ही तिला बंगलोरचा नृत्य-आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अर्धवट राहिलेला कला शाखेचा अभ्यास करण्याची परवानगी दिली.’
गिर्यारोहणाचे बेसिक, अ‍ॅडव्हान्स व अ‍ॅडव्हेंचर अभ्यासक्रम पूर्ण करताना छोटी छोटी अनेक शिखरे तिने काबीज केली. हे तीनही कोर्स तिने प्रथम श्रेणीत पूर्ण केले. गिर्यारोहणाची विविध साधने लीलया कशी हाताळायची, याचा तिने बारकाईने अभ्यास केला. चिकित्सक, जिज्ञासू वृत्ती उपजतच असल्याने कृष्णाने गिर्यारोहणाच्या सर्व तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केला.
नेहरू गिर्यारोहण संस्थेचे मुख्य मार्गदर्शक मेजर विकास थापा यांनी कृष्णामधील गिर्यारोहणनैपुण्य हेरले आणि एव्हरेस्टपूर्व सतोपंथ शिखर मोहिमेसाठी तिच्याकडे विचारणा केली. कृष्णाला ते ऐकून हर्षवायू झाला नसता तरच नवल! प्रश्न होता तो आई-वडिलांच्या परवानगीचा! सतोपंथ शिखर हे गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक शिखर मानले जाते. सतोपंथ शिखर मोहिमेत आजवर पुण्यातील नामवंत गिर्यारोहकांसह अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेले आहेत. सतोपंथ मोहिमेत सहभागी होणे म्हणजे साक्षात मृत्यूलाच आव्हान देणे, असे मानले जाते. परंतु कृष्णाच्या गिर्यारोहणक्षमतेची खात्री असल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी या मोहिमेसाठी तिला परवानगी दिली. ही मोहीम तिने यशस्वीपणे पार पाडली. या मोहिमेमुळे कृष्णाचा एव्हरेस्ट मोहिमेकरिता आत्मविश्वास अधिकच बळकट झाला.
एप्रिल- मे महिन्यात नेहरू गिर्यारोहण संस्थेची एव्हरेस्ट मोहीम आयोजित केली जाणार आहे, असे कृष्णाच्या कानावर आले होते. सर्वसाधारणपणे याच कालावधीत काही व्यावसायिक मोहिमाही असतात. विविध संस्था एव्हरेस्टच्या मोहिमा आयोजित करतात. या मोहिमा सर्वासाठी खुल्या असतात. त्यासाठी तुमच्याकडे भक्कम आर्थिक पाठबळ हवे आणि अर्थातच या मोहिमेकरिता आवश्यक असणारे गिर्यारोहण-कौशल्यही! नेहरू गिर्यारोहण संस्थेच्या मोहिमेत सहभागी न होता एखाद्या व्यावसायिक मोहिमेत सहभागी होण्याचे तिने ठरवले. नेहरू संस्थेत गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतलेल्या दोन-तीन गिर्यारोहकांबरोबरच ती ही एव्हरेस्ट मोहीम करणार होती. प्रश्न होता आर्थिक पाठबळ उभे करण्याचा! एव्हरेस्टवर चढाई करणे एक वेळ सोपे, पण त्याकरिता पैसा उभा करणे ही अवघड कामगिरी आहे, हे तिच्या लवकरच लक्षात आले. त्यामुळे ती संभ्रमित झाली. कर्ज काढून एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्यास तिचे मन तयार नव्हते. दरम्यान, तिने रेस्क्यू व रीसर्च कोर्समध्ये प्रवेश घेतला. एव्हरेस्टवर जायची संधी मिळाली नाही तरी अशा एखाद्या मोहिमेत ‘रेस्क्यू’ टीममध्ये काम करण्याची मनाची तयारी तिने केली. या कोर्ससाठी ती गेलेली असताना तिच्या आई-वडिलांनी घराच्या तारणावर कर्ज मिळवण्यासाठी खटपट सुरू केली.
एव्हरेस्ट मोहीम म्हणजे जिवावरची टांगती तलवार असे म्हटले जाते. असे असतानाही तीस लाख रुपयांचे कर्ज घेणे म्हणजे धाडसच नाही का, असे विचारले असता तिचे वडील माधवराव म्हणाले, ‘कृष्णाच्या क्षमतेविषयी आम्हाला खात्री होती. ती एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी झाली तर शिखर सर करणारच, हा विश्वास होताच. त्यामुळे एकुलत्या एक मुलीसाठी आम्ही कर्ज काढण्याचा हा धोका पत्करला. कर्जाचे ओझे डोक्यावर घेऊन एव्हरेस्ट मोहीम करायला कृष्णा आधी तयार नव्हती. मात्र, आम्ही तिला राजी केले आणि ती मोहिमेसाठी सज्ज झाली. सारस्वत बँकेने तिच्या यशस्वी एव्हरेस्ट चढाईनंतर हे कर्ज आता माफ केले आहे.’
दुखापतींकडे दुर्लक्ष करण्याची सवय कृष्णाला लहानपणापासूनच आहे. डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती करताना दुखापती होणारच, हे ती जाणून आहे. रेस्क्यू अँड रीसर्च कोर्समध्ये कृष्णा व तिच्या सहकाऱ्यांना जखमी गिर्यारोहकांना शिखरावरूनखाली कसे आणायचे, हे शिकवले जात होते. हे प्रशिक्षण घेत असतानाच कृष्णाच्या गुडघ्याला दुखापत झाली. मात्र, प्रशिक्षणात ती एवढी व्यग्र झाली होती की, जखमी गिर्यारोहकाला खाली आणण्याचे काम पूर्ण झाल्यावरच तिच्या लक्षात आले की, आपल्या गुडघ्यालाही दुखापत झाली आहे. कोणतेही काम समरसून करण्याची वृत्ती तिच्यात आहे.
एव्हरेस्ट मोहिमेसाठी निधी उभा झाल्यावर ती एशियन ट्रेकिंग मोहिमेत सहभागी झाली. तोवर मोहिमेचे अन्य सदस्य आणि शेर्पा बेस कॅम्पकडे मार्गस्थ झाले होते. संस्थेने मग तिच्याबरोबर गेलू शेर्पाला पाठवले. लुक्ला ते बेस कॅम्प ही वाटचाल तिने गेलू शेर्पाबरोबर केली. ‘त्याच्याबरोबर एकटं जाताना तुला भीती वा संकोच वाटला नाही का?’ असे विचारले असता कृष्णा म्हणाली, ‘एशियन ट्रेकिंग संस्थेवर माझा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मला कोणताही त्रास होणार नाही, याची खात्री होती. सदैव बडबड करण्याची सवय असल्याने मला या एकटेपणाचा कंटाळा आला. अन्यथा भीती माझ्या खिजगणतीतही नव्हती.’
‘हिमालयातील शिखर मोहिमांच्या वेळी एकटय़ा-दुकटय़ा गिर्यारोहकाला लूटमार करून नंतर त्याला दरीत ढकलून देण्याच्या घटना घडत असतात. हे माहीत असताना कृष्णाला एकटं पाठविण्यास तुमचं मन कसं तयार झालं?,’ असं विचारलं असता रंजनाताई म्हणाल्या, ‘रेस्क्यू आणि रीसर्च कोर्सच्या २१ दिवसांच्या कालावधीत १५ सदस्यांमध्ये कृष्णा एकमेव मुलगी होती. त्यामुळे एकटेपणाची तिला सवय होती. एव्हरेस्ट ट्रेकिंग संस्थेचे सर्वच पदाधिकारी विश्वासू आहेत, याची आम्हाला खात्री होती. लुक्ला ते बेस कॅम्प हा प्रवास तिला एकटय़ाने करावा लागणार, याची आम्हाला कल्पना होती. पण एव्हरेस्ट सर करण्यासाठी थोडे मन घट्ट करून अशा संकटांना तोंड द्यायचे, ही वृत्ती ठेवून आम्ही तिला परवानगी दिली. आजवर कृष्णाला सर्वच मोहिमांत सहकाऱ्यांकडून सन्मानाची वागणूक मिळाली आहे. एव्हरेस्ट मोहीमही याला अपवाद नसेल, ही खात्री आम्हाला होती.’
एव्हरेस्ट मोहिमेसंदर्भात आजपर्यंत भारतीय महिलांच्या कामगिरीबाबत एशियन ट्रेकिंग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना फारसा समाधानकारक अनुभव नव्हता. त्यामुळे कृष्णाला मोहिमेत सहभागी करून घेण्यास ते आधी तयार नव्हते. मात्र, सतोपंथ शिखर मोहिमेतील तिचे यश, मेजर विकास थापा यांची शिफारस आणि कृष्णाचा दृढ आत्मविश्वास यामुळेच तिला या मोहिमेत सहभागी करून घेतले गेले. लुक्लापासून बेस कॅम्पपर्यंत तिने एकटय़ाने केलेला प्रवास हीसुद्धा तिच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. १७ मे रोजी ती बेस कॅम्पला पोहोचली. तरीही अवघ्या चार दिवसांतच तिला एव्हरेस्टवरील अंतिम चढाईची संधी मिळाली. अतिउंचीवर गिर्यारोहण साधनांचा उपयोग करण्याबाबत तिच्याकडे असलेली सहजता, तिची जिद्द, कमालीचा आत्मविश्वास आणि सहकार्याची भावना हे तिचे गुण तिच्या यशस्वी चढाईत उपयुक्त ठरले.
‘जिद्द, आत्मविश्वास, धाडसी वृत्ती, चिकाटी हे गुण कृष्णामध्ये आढळतात,’ असे सांगून तिची मावशी रचना गेडाम म्हणतात, ‘तिच्यापाशी उपजतच हे गुण असले तरी मूर्तिकार मातीतून सुबक मूर्ती घडवतो तसे तिच्यातील या गुणांना तिच्या आई-वडिलांनी पुरेपूर वाव दिला. आज विविध क्षेत्रांत कृष्णा आघाडीवर आहे. प्रत्येक क्षेत्रात झोकून देण्याची वृत्ती तिच्या यशास पूरक ठरली. स्वावलंबीपणामुळेच धाडसी वृत्तीही तिच्यात निर्माण झाली.’
कृष्णाची आजी तसेच इतर नातेवाईकांनीही तिच्यातल्या उपजत गुणांमुळे आणि आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांमुळेच तिला हे यश मिळाले, असे आवर्जून सांगितले.
पुण्यात औंध येथे अथेना अपार्टमेंटमध्ये कृष्णा राहते. गुलमोहर पार्क सोसायटीतील या परिसरात तिचे शालेय जीवन घडले. इथले कर्नल अविनाश कर्णिक तसेच नहार व देसाई कुटुंबीयांनाही ती आपली मानसकन्याच वाटते. सोसायटीतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत आणि सार्वजनिक उपक्रमांत तिचा पुढाकार व सक्रिय सहभाग असल्यामुळे तिची निर्भीड वृत्ती जोपासली गेली, असे त्यांना वाटते.
पालकांनी आपले निर्णय आपल्या पाल्यांवर लादू नयेत. आपल्या पाल्याच्या कलाने घेतले तर तो त्याच्या आवडीच्या क्षेत्रात निश्चितच चमक दाखवू शकतो, हे कृष्णाने सिद्ध करून दाखविले आहे. तिच्यासारखे यश मिळविण्याची क्षमता असणारी अनेक मुले-मुली आहेत. मात्र, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रंजना व माधवराव पाटील यांच्यासारखेच पालकही हवेत!
मिलिंद ढमढेरे
dhamdhere_milind28@yahoo.co.in