Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

‘द इयर माय पेरेण्ट्स वेण्ट ऑन व्हेकेशन’
तरल संवेदनांचा दृश्यानुभव

या आठवडय़ात एनडीटीव्ही ब्युमिएनं पीव्हीआरमध्ये प्रदर्शित केलेल्या ‘द इयर माय पेरेण्ट्स वेण्ट ऑन व्हेकेशन’ या ब्राझिलियन चित्रपटाला कोणत्या एका साच्यात बसवता येणार नाही. त्यातल्या संवेदनांचे प्रवाह हे असे काहीसे अमूर्तपणे वाहत राहतात, पण अनाकलनीय मुळीच नाही! त्या संवेदनांना कथा तत्त्वाचे भरभक्कम किनारे आहेत. छायाचित्रणानं त्याला एक मूड दिलेला आहे व्यक्तिचित्रणांमधल्या नेमकेपणानं व्यक्तित्व दिलं आहे. ‘द इयर माय पेरेण्ट्स वेण्ट ऑन व्हेकेशन’ची कथा उलगडते १२ वर्षाच्या मुलाच्या- मॉरोच्या दृष्टिकोनातून.

सेव्हन्टीन अगेन
आम अनुभवाची खास गोष्ट

परत हेआयुष्य जगायला मिळालं तर.. असा विचार अनेकांच्या मनात अनेकदा येतो. सेलेब्रिटीजच्या मुलाखती घेतानादेखील अनेकदा मुलाखतकार शेवटचा म्हणून हाच प्रन विचारतो. या विचारातच जे आजवर केलं, जे झालं , जे मिळालं त्याविषयीचं असमाधान, संधी हुकवल्याची चुटपूट असते. मग जे केलं-झालं-मिळवलं त्यांची किंमत वाटेनाशी होते, चव लागेनाशी होते. ‘तुझे आहे तुजपाशी’ हे कळेनासं होतं. पटकथाकार जेसन फिराल्डी आणि दिग्दर्शक बर स्टीअर्स यांनी याच आम अनुभवाची कल्पना ‘१७ अगेन’ या चित्रपटासाठी राबवली आहे आणि तीतून एक प्रसन्न कॉमेडी बेतली आहे.

ब्राइड वॉर्स
प्रत्येक लग्नाला जायलाच हवं असं नाही!

हलकी फुलकी कॉमेडी बनवायची असली तरी तिला कथावस्तूचं सादरीकरण हे वजनदारच लागतं. कल्पना छोटीशी असली तरी तिला पटकथेतून, दिग्दर्शनातून फुलवताना काम गंभीरपणेच करावं लागतं. नाही तर मग नाव ‘ब्राइड वॉर्स’ पण प्रत्यक्षात नुसतीच अस्ताव्यस्त झोंबाझोंबी अशा अवस्था होते. लिव (केट हडसन) आणि एमा ( अ‍ॅनी हॅथवे) या दोघी लहानपणापासूनच्या जिवच कंठच मैत्रिणी. आलीशान प्लाझा हॉटेलमध्येच आपले लग्नसमारंभ व्हावेत असं कॉमन स्वप्न पाहणाऱ्या. दोघींना त्यांचे बॉयफ्रेंड नेमके एकाच दिवशी लग्नासाठी प्रपोझ करतात तेव्हा त्या अधिकच रोमंचित होतात आणि प्लाझा हॉटेल, तसंच लग्नसमारंभाचं काँट्रॅक्ट घेणाऱ्या मेरियन सेंट क्लेअरकडे जातात. मात्र मेरियनच्या सेक्रेटरीच्या चुकीमुळे दोघींच्या लग्नसमारंभची तारीख एकच ठरते आणि दोन जिवच कंठच मैत्रिणी एकमेकींच्या शत्रू होतात. एकीच्या लग्नसमारंभाचा फज्जा उडवण्यासाठी दुसरी कारस्थानं करते, अशी विनोदाला वाव देणारी कथाकल्पना. परंतु लिव आणि एमा त्यांची एकूण हायपरएक्साइटमेंट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. त्यांचं स्वप्न, त्यांची झालेली गोची, त्यांनी एकमेकींविरुद्ध केलेली कारस्थानं यात कुठेही कल्पकतेची चमक जाणवत नाही. ब्यूटीपार्लरमधल्या हेअरडायची, बॉडीलोशनची अदलाबदल, लग्नापूर्वीच्या हेन पार्टीचं व्हिडिओचित्रण अशा सुमार कल्पना ना विनोद फुलवतात, ना क्लायमॅक्ससाठी लागणारा ताण निर्माण करतात. विनोदनिर्मितीत दोघींच्या बॉयफ्रेंड्सचा वापर अजिबात करून घेतलेला नाही. त्यामुळे त्या व्यक्तिरेखाच (?) चक्क वाया जातात. कल्पनाशून्य प्रसंगांमुळे दीड तासाचा चित्रपट अनंत काळ रेंगाळतो. शेवटी वधूवेषातल्या नायिकांची लागलेली झुंज हा या विनोदपटाचा क्लायमॅक्स- परमोच्च बिंदू, पण सगळा चित्रपट सपाट पातळीवरच सरपटत राहिल्यामुळे परमोच्च बिंदूदेखील जमिनीवरच लोळतो. त्यातल्या त्यात गंमत आणते ती मेरियनची छोटी भूमिका, पण लग्नाला जायचं असतं ते वधू-वरांसाठी ना? इव्हेंट मँनेजरसाठी नाही!
ब्राइड वॉर्स
पटकथा - ग्रेग डिपॉल, केसी विल्सन;
दिग्दर्शक - गॅरी विनिक
कलावंत - केट हडसन, अ‍ॅनी हॅथवे.

‘जोडी जमली रे’च्या माध्यमातून स्पर्धकाचे शुभमंगल..
‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘जोडी जमली रे’ या ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये विवाहोच्छुक तरुण-तरुणी सहभागी होतात आणि अनुरूप जोडीदार निवडण्याचा प्रयत्न करतात. या कार्यक्रमाला यश मिळत असून यापूर्वी सहभागी झालेला एक स्पर्धक दीपक नानेकर याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडीदार मिळाला आहे. म्हणून तो ‘जोडी जमली रे’ कार्यक्रमाच्या शनिवारच्या भागात आभार मानण्यासाठी येणार आहे. अनुरूपता आणि समजूतदारपणा या दोन गोष्टी लग्न करताना महत्त्वाच्या आहेत. एकमेकांची आवडनिवड माहिती झाल्यानंतर जोडीदारासाठी तरुणांनी कपडे विकत आणले होते. स्पर्धक तरुणींनी त्यातील आपल्या आपडीचे कपडे निवडायचे अशी फेरी होणार आहे. अनुरूपता हा प्रमुख मुद्दा असल्यामुळे शनिवारच्या भागात ‘टेबल फॉर टू’ ही फेरी ठेवण्यात आली आहे. लग्नात दागदागिन्यांना असलेले महत्त्व, त्याचा संबंध काय याविषयीही शनिवारच्या भागात स्पर्धकांना माहिती देण्यात येणार आहे. दागिने केवळ सुंदर दिसण्यासाठी वापरायचे असतात की दागिने खरेदी करून गुंतवणूक करणे हेही महत्त्वाचे आहे आदी मुद्यांवर स्पर्धक आपापली मते मांडणार आहेत. या भागाचे वैशिष्टय़ म्हणजे नेहमी हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना नेमके कोणत्या स्पर्धकांचे विवाह ‘जोडी जमली रे’च्या माध्यमातून जुळले ते पाहायला मिळणार आहे.
प्रतिनिधी

रेडिओ जॉकी अभिजीत सावंत
आयपीएल क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर आता क्रिकेटज्वर पसरलाय तो आयसीसी ट्वेन्टी२० विश्वचषक सामन्यांचा! आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा अधिकृत भागीदार म्हणून रेडिओ प्रसारणाचे हक्क बिग एफएमला मिळाले आहेत. क्रिकेटची संगीताशी सांगड घालून दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘धुंधार टी२०’ हा कार्यक्रम सध्या जोरदार सुरू आहे. पहिल्या इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेता ठरलेला गायक अभिजीत सावंत या कार्यक्रमाद्वारे रेडिओ जॉकी म्हणजे आरजे म्हणून वेगळ्याच भूमिकेत लोकांसमोर आला आहे. बिग ९२.७ एफएमवरून ध्वनिक्षेपित होणाऱ्या या कार्यक्रमातून रेडिओ जॉकी म्हणून निवेदन करताना खूप धमाल येते, एक वेगळाच अनुभव मिळतो, श्रोत्यांशी संवाद साधताना खूप मजा येते असे अभिजीत सावंतने सांगितले. गायक म्हणून करिअर केल्यानंतर एकदम आरजे म्हणून काम करण्याचे का ठरविले असे विचारल्यावर अभिजीत सावंत म्हणाला की, निश्चितपणे हे थोडेसे वेगळे क्षेत्र आहे. परंतु, रेडिओ माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधताना आवाजाचा थोडा रियाजही करावा लागतो. त्यामुळे फक्त गाणे गायचे नसून श्रोत्यांशी गप्पाही करायच्या आहेत. ‘धुंधार टी२०’ या कार्यक्रमाची संकल्पना सांगताना तो म्हणाला की, दररोज पाच तासांच्या या कार्यक्रमात आम्ही आपल्या क्रिकेट संघाला शुभेच्छा आणि पाठिंबा देणारी तसेच आपल्या देशाचा संघ अव्वल ठरावा अशी संकल्पना आहे. त्यानुसार लोकांना गाणी गाण्यासाठी बोलावतो. त्यातून दररोज एका गायकाचे गाणे सवरेत्कृष्ट ठरवून त्या गायकाला इंग्लंडला विश्वचषक सामने पाहायला जाण्याची संधी दिली जाते. त्याशिवाय अनेक प्रथितयश गायकांनाही आमंत्रित करून तेसुद्धा गाणी गाऊन भारतीय संघाला ‘चिअर अप’ करतो.
प्रतिनिधी