Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

सर्व शिक्षा अभियानातील पुस्तकांची वाहतूक
जादा दराची निविदा मंजूर केल्याने शिक्षण मंडळ लेखाधिकारी निलंबित

सांगली, १२ जून / प्रतिनिधी

सांगली महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाकडील सर्व शिक्षा अभियानातील पुस्तकांची वाहतूक करण्यासाठी जादा दराने निविदा मंजूर करून धूळफेक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून, या प्रकरणी आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी शिक्षण मंडळाकडील लेखाधिकारी पी. जी. वाघमोडे यांना निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी दिले. तसेच या प्रकरणी तत्कालीन प्रशासन अधिकारी श्याम पवार यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

गुरुवर्य भगवानमामांची प्रकृती स्थिर
कराड, १२ जून/वार्ताहर

मराठमोळ्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे आधारवड गुरुवर्य भगवानमामा कराडकर यांची गेले दोन दिवसांपासून चिंताजनक बनलेली प्रकृती आज त्यांना पुण्याच्या सह्य़ाद्री हॉस्पिटलमधून कराडच्या मारुतीबुवा मठात आणताच चांगलीच सुधारली. दरम्यान भगवानमामा निवर्तल्याच्या वृत्ताने हजारो वारकऱ्यांनी येथे एकच धाव घेतली होती. मात्र, कृत्रिम प्राणवायूशिवाय भगवानमामांची प्रकृती सुधारत असल्याचे पाहून वारकऱ्यांनी हा दैवी चमत्कार असल्याची भावना व्यक्त केली.

भारनियमनप्रश्नी सेनेचा धडक मोर्चा
कोल्हापूर, १२ जून / विशेष प्रतिनिधी

ग्रामीण व शहरी भागातील भारनियमन विनाविलंब रद्द करा आणि कृषिपंपाची वीज कोणत्याही परिस्थितीत तोडता कामा नये, या दोन प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेने शुक्रवारी वीज मंडळाच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चातील आंदोलकांनी मंडळाच्या प्रवेशद्वारावर जोरदार धडक मारल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. या वेळी झालेल्या सभेत जिल्हाप्रमुख संजय पवार व शहरप्रमुख राजेश क्षीरसागर यांनी वीज मंडळाच्या कारभाराचे वाभाडे काढताना शेतीची वीज बंद केल्यास आंदोलनाच्या निमित्ताने प्रवेशद्वारावर आलेले शिवसैनिक उद्या कोणत्याही क्षणी कार्यालयाचा ताबा घेऊन वीज मंडळाचा कारभार बंद पाडतील असा इशारा दिला.

फुटीर नगरसेविकेच्या दोन वाहनांवर दगडफेक
इचलकरंजी, १२ जून / वार्ताहर

सत्तारूढ गटातील फुटीर नगरसेविका राबिया बागवान यांच्या बंगल्याच्या आवारात लावलेल्या दोन वाहनांवर गुरुवारी मध्यरात्री दगडफेक करण्यात आली. नगराध्यक्ष निवडीच्या वादातून काँग्रेस समर्थकांनी हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. इचलकरंजी नगराध्यक्ष निवडीच्या पाश्र्वभूमीवर सत्तारूढ गटाला रामराम करून ५ नगरसेविका विरोधी शहर विकास आघाडीत सामील झाल्या आहेत. यामध्ये राबिया बागवान यांचाही समावेश आहे. विरोधी आघाडीचे नगरसेवक सध्या सहलीवर आहेत. त्यांच्यासोबत ५ फुटीर नगरसेविकाही कुटुंबासह त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे सत्तारूढ आवाडे गट अल्पमतात आला आहे. या नगरसेविकांच्या घरांसमोर निदर्शने निषेध पुतळा दहन सारखे आंदोलन करण्यात आले आहे.

कष्टकरी शेतक ऱ्यांची उद्या बैठक
आटपाडी, १२ जून / वार्ताहर
पंचायत समिती परिसरात शेतमजूर, कष्टकरी-शेतकरी संघटना व पाणी चळवळीच्या कार्यकर्त्यांची बैठक रविवारी (दि. १४) आयोजित करण्यात आली असल्याचे नागनाथ अण्णा नायकवडी यांनी सांगितले.२९ जून रोजी होणाऱ्या पाणी परिषदेच्या पूर्वतयारीनिमित्त होणाऱ्या बैठकीस क्रांतिवीर नायकवडी, डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.पाणीसंघर्ष चळवळीच्या माध्यमातून गेली १६ वर्षे लढा दिला जात आहे. आता अखेरचा रणसंग्राम केला, तर येत्या वर्षभरात शेतापर्यंत पाणी आणण्यात यश मिळेल अशी परिस्थिती आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. या बैठकीस सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

भोई समाजाचे नेते रामदास मुळे यांचे निधन
कराड, १२ जून/वार्ताहर
सातारा जिल्हा मत्स्य व्यवसाय संघाचे अध्यक्ष व भोईराज समाजाचे नेते रामदास हिरालाल मुळे (वय ५५) यांचे आज अकाली निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.अगदी तरुण वयापासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय असणारे रामदास मुळे ऊर्फ आबा काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते होते. येथील प्रतिष्ठेच्या नवजवान गणेश व नवरात्र उत्सव मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. कायम संवेदनशील असणारी कराडची गणेश विसर्जन मिरवणूक दरवर्षी सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरत असे. येथील भोईराज समाज ट्रस्ट (वरची आळी) व शारदा नागरी सहकारी पतसंस्थेचेही ते संस्थापक अध्यक्ष होते. कस्टम रेन्बो या संस्थेच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता. शहर परिसरातील विविध राजकीय, सामाजिक तसेच विविध सेवाभावी संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्या निधनाने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

बुद्धिबळ स्पर्धेचे उद्या आयोजन
आटपाडी, १२ जून / वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. १४) येथील सूर्योपासना मंदिरात खुल्या बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.स्पर्धेतील विजेत्यांना १००१, ७०१, ५०१ व ३०१ रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. इच्छुकांनी विजयदीप ट्रेडर्स, विकास भुते, श्रीनाथ ऑफसेट, न्यू फेमस टेलर येथे संपर्क साधण्याचे आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केले आहे.

शाहू कला मंदिराचे आज प्रशांत दामलेंच्या हस्ते उद्घाटन
सातारा, १२ जून/प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेच्या ‘शाहू कला मंदिर’ नाटय़गृहाच्या नूतनीकरण झालेल्या वास्तूचा उद्घाटन समारंभ प्रसिद्ध चित्रपट नाटय़ अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते शनिवारी १३ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष नासिर शेख यांनी दिली.शाहू कला मंदिराच्या उद्घाटन समारंभानंतर ‘महाराष्ट्राची परंपरा’ हा जितेंद्र भुरुक प्रस्तुत लोकसंगीताचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले व नगरविकास आघाडीचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व सायंकाळी साडेचार वाजता नगरवाचनालयासमोरील विकासरत्न अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुल व सायंकाळी पाच वाजता मोतीतळ्याजवळील प्रतापसिंह ऊर्फ दादा महाराज व्यापारी संकुल इमारतीचे उद्घाटन होणार आहे.

संत कक्कय्या विद्यार्थी प्रतिष्ठानचे उद्या सोलापुरात उद्घाटन
सोलापूर, १२ जून/प्रतिनिधी
वीरशैव संत कक्कय्या ढोर समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्थापन झालेल्या संत कक्कय्या विद्यार्थी प्रतिष्ठानचा उद्घाटन सोहळा येत्या रविवारी १४ जून रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.हुतात्मा स्मृतिमंदिरात होणाऱ्या या समारंभातच समाजाच्या सर्वागीण प्रगतीसाठी विशेषत: प्रबोधनासाठी ‘संत कक्कय्या पत्रिका’या मासिकाचे प्रकाशन केले जाणार आहे. कक्कय्या ढोर समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढावे आणि त्याद्वारे समाजाचा विकास व्हावा, या हेतूने संत कक्कय्या विद्यार्थी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आल्याचे सोनकवडे यांनी सांगितले. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

डीकेटीईचे पाच विद्यार्थी आयआयटीमध्ये उच्चश्रेणीत
इचलकरंजी, १२ जून / वार्ताहर

आय.आय.टी. प्रवेश परीक्षेत डी.के.टी.ईच्या तब्बल ५ विद्यार्थ्यांनी एकाचवेळी यश मिळवून नवा लौकिक स्थापित केला आहे. पदव्युत्तर शिक्षण क्षेत्रात दर्जेदार ठिकाणी प्रवेश देणारे द्वार म्हणून या गेट परीक्षेकडे पाहिले जाते. देशपातळीवर होणाऱ्या या परीक्षेत उच्चश्रेणी प्राप्त करणे अवघड बाब असताना एकाच संस्थेच्या ५ विद्यार्थ्यांनी बाजी मारण्याचा दुर्मिळ प्रकार घडला आहे. हरीष डी. छोटे, दयानंद बाळासाहेब खोत, तुषार नरेंद्र नगरवालारवी कुमार व प्रसाद रवींद्र बडबडे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

साखर परवाना न घेणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
सांगोला, १२ जून/वार्ताहर
साखरेचे खुल्या बाजारातील दर वाढल्यामुळे खुल्या बाजारात साखर विक्री करणाऱ्या परवानाधारकांनी फ्री सेल साखरविक्री परवाना घेणे बंधनकारक असून १५ जून ०९ पर्यंत परवाना न घेतल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली कारवाई करावी लागेल, असा आदेश तहसीलदार ए. जे. वासुदेव यांनी काढला आहे.पुरवठा निरीक्षक यांनी तालुक्यातील पूर्वीचे परवानाधारक असलेले व किराणामाल भुसार यांच्या दुकानावर धाड टाकून ३४ दुकानांची तपासणी केली आहे. धाड टाकलेल्या दुकानदारांना परवाना घेणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार तालुक्यातील सर्व फ्री सेल साखरविक्रेते दुकानदारांनी परवाना घेणे बंधनकारक आहे. जे दुकानदार परवाना घेत नाहीत, त्यांना साखरविक्री करू दिली जाणार नाही व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा आदेश काढण्यात आला आहे.

उधारी मागितल्याने दुकान चालकास मारहाण
आटपाडी, १२ जून/वार्ताहर

राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर, ब्रह्मदेव पडळकर व सहकाऱ्यांनी उधार न दिल्याने व जुनी बाकी मागितल्याने सत्तूर, काठय़ा व दगडांनी मारहाण केल्याची घटना येथे घडली या प्रकरणी दुकान चालक जयेश भालचंद्र मेटकरी (झरे) यांनी आटपाडी पोलिसांत फिर्याद दिली असून ते मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत.फिर्यादित म्हटले आहे की, पडळकर बंधू राजू पांडुरंग अर्जुन, रावसाहेब गावडे, आप्पा सिद्ध अनुसे, तुळशिराम वाघमारे, सुनील पांडुरंग अर्जुन, अधिक हरीबा माने, सुरेश पांडुरंग अर्जुन (सर्वजण रा. पडळकरवाडी व झरे) यांच्यासह आदींनी यांना उधार दारू देण्यास नकार दिल्याने व मागील येणे मागितल्याने मारहाण केली. या हाणामारीत विक्रम भालचंद्र मेटकरी, भालचंद्र सखाराम मेटकरी, सुनील मेटकरी हे तिघेजण जखमी झाले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक आर. वाय. शिंदे करीत आहेत.

काळ्या बाजाराचे ९० हजारांचे निळे रॉकेल सांगलीत जप्त
सांगली, १२ जून / प्रतिनिधी
सांगली पोलिसांच्या विशेष पथकाने खुल्या बाजारात विक्रीस नेण्यात येणारे ९० हजार रुपये किंमतीचे निळे रॉकेल बुधवारी पहाटे सापळा रचून ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्यात दत्तात्रय सत्तू कलगुटगी व रोहित रंगराव पाटील (वय २०, रा. लक्ष्मीनगर) या दोघांचा समावेश आहे. येथील वडर कॉलनीतून कुपवाड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना निळ्या रॉकेलचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांना मिळाली होती. या माहितीआधारे पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या सूचनेनुसार विशेष पोलीस पथकाने जुन्या कुपवाड रस्त्यावर रेल्वे पुलानजीक सापळा रचला होता. पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक रिक्षा ही येताना दिसली. ही रिक्षा थांबवून तपासणी केली असता खुल्या बाजारात विक्रीस नेण्यात येत असलेले ६०० लिटर रॉकेलचे तीन लोखंडी बॅरेल मिळाले .