Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

आमदाराच्या विरोधात खासदाराचे चिरंजीव?
लक्ष्मण राऊत

जालना जिल्ह्य़ातील भोकरदन विधानसभा मतदारसंघातून १९९० आणि १९९५ मध्ये भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे आणि १९९९ मध्ये याच पक्षाचे कै. विठ्ठल सपकाळ निवडून आले होते; परंतु २००३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचेच चंद्रकांत दानवे हे पक्षत्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले. २००४ मध्येही त्यांचा विजय झाला. पुनर्रचनेनंतर आता या मतदारसंघाच्या भौगोलिक क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. संपूर्ण जाफराबाद तालुका आता या मतदारसंघात आलेला आहे.

चुरशीच्या आठवणींना उजाळा
चंद्रकांत पाटील

अमळनेर मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत निसटत्या मतांनी (७३२) विजयी झालेल्या भाजपच्या आ. डॉ. बी. एस. पाटील यांची किमया संपल्याचा साक्षात्कार मध्यंतरी काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला होता. मात्र नंतरच्या स्थानिक निवडणुकांमध्ये या भागावर भाजपचाच वरचष्मा राहिला. एवढेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मताधिक्य १० हजार ८२६ मतांनी अधिक राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या अन् विरोधकांकडून ऐन भरात तयारी सुरू करणाऱ्या मंडळींचा काळजाचा ठोका चुकला.

मुख्यमंत्र्यांच्या ‘मराठी’ आकडेवारीने मनसेपुढे पेच !
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसांचा उपयोग विरोधकांनी केवळ व्होटबँकेसाठी केला. पण मराठी लोकांच्या हिताची काळजी आम्हालाच आहे हे काँग्रेसने प्रत्यक्ष कृतीतून दाखविले. राज्यातील लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये ९४ टक्के तर विशाल प्रकल्पांममध्ये ९१ टक्के नोकऱ्या स्थानिक भूमिपुत्रांनाच मिळाल्या आहेत. इतकेच नव्हे तर दुकाने आणि आस्थापनांवरील पाटय़ा मराठी भाषेत करण्याचे आणि ८० टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या राखीव ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचे श्रेय काँग्रेसच्याच सरकारचे आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधिमंडळात एका चर्चेला उत्तर देताना केले.

जसवंत सिंह यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव बारगळला
नवी दिल्ली, १२ जून/खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांतील पराभव तसेच राज्यसभेत अरुण जेटली यांच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याच्या मुद्यावरून भाजपश्रेष्ठींना पत्र लिहून जाब विचारणारे आणि नंतर ते पत्र प्रसिद्धी माध्यमांकडे पोहोचविणारे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव अपेक्षेनुसार बारगळला. जसवंत सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कोणतीही कारवाई होणार नसल्याचे आज भाजपने स्पष्ट केले.

डॉक्टर, तुम्हीसुद्धा..?
महाराष्ट्राच्या राजकारणात पद्मसिंह पाटलांचं स्थान आवर्जून दखल घेण्याएवढे कधीच नव्हते. कारण आपली स्वतंत्र ओळख व्हावी यासाठी त्यांनी स्वत: कधीच प्रयत्न केले नाहीत. पवारांच्या छायेत राहून राजकारण करणेच त्यांनी पसंत केले. शरद पवारांचे एकनिष्ठ सहकारी हीच पद्मसिंहांची खरी ओळख. १९८० मध्ये यशवंतराव चव्हाण स्वगृही परतल्यावर त्यावेळच्या अर्स काँग्रेसचे अनेक आमदार शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसवासी झाली. पवारांमागे सात-आठ आमदारच उरले होते. पद्मसिंह त्यापैकीच एक होते.

नरेंद्र मोदींची दिल्लीत गांधीगिरी!
नवी दिल्ली, १२ जून/खास प्रतिनिधी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर खूपच ‘नरमल्याचे’ आज त्यांच्या दिल्ली भेटीतून स्पष्ट झाले. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत डॉ. मनमोहन सिंग यांना ‘देशाच्या इतिहासातील सर्वात कमकुवत पंतप्रधान’ अशा शब्दात टीका करणारे मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल मनमोहन सिंग यांचा आज शाल व पुष्पगुच्छ देऊन चक्क सत्कार केला. एवढेच नव्हे तर दिल्लीत येऊन केवळ लालकृष्ण अडवाणींची भेट घेणारे मोदी आज भाजपच्या ‘कनिष्ठ’ नेत्यांनाही भेटले. त्यांच्या या शिष्टाचारामुळे भाजप नेत्यांनाही धक्का बसला. भाजपमध्ये प्रखर हिंदूुत्व आणि विकासाचे प्रतीक बनलेले नरेंद्र मोदी आजच्या दिल्ली भेटीत आपला अहंकार बाजूला ठेवून एवढे का विनम्र झाले याचीच चर्चा सुरु होती. मोदी यांनी मनमोहन सिंग यांची भेट घेऊन दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व गुजरातच्या प्रगतीविषयी माहिती दिली. मोदी यांनी अडवाणी यांच्यापाठोपाठ भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांच्याही भेटी घेतल्या. सदैव आक्रमक भाषा वापरणाऱ्या मोदींच्या या गांधीगिरीची आज दिल्लीत चर्चा होती. भाजपचे पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून आपली स्वीकारार्हता वाढविण्याची ही कवायत असल्याचेही भाजप वर्तुळात म्हटले जात होते.