Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

९०:१० कोटय़ाचा निर्णय अधांतरी
पालक-विद्यार्थ्यांचे सोमवारपासून उपोषण
मुंबई, १२ जून / प्रतिनिधी
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य शिक्षण मंडळाच्या (एसएससी) विद्यार्थ्यांसाठी ९० टक्के तर सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी १० टक्के राखीव जागा ठेवण्याच्या निर्णयावर कायदेतज्ज्ञांनी नकारात्मक मत दिले आहे तसेच काँग्रेसमधूनही त्यास विरोध होत असल्याने ९०:१० टक्के कोटय़ाचा निर्णय अधांतरी लटकला आहे. दरम्यान, ‘एसएससी बोर्ड पालक संघटने’ने या प्रस्तावित निर्णयाचे जोरदार समर्थन केले असून कोटय़ाच्या अंमलबजावणीसाठी सोमवारपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

अमरसिंग गंभीर आजारी
मुंबई, १२ जून/प्रतिनिधी

समाजवादी पार्टीचे सरचिटणीस व भारतीय राजकारणातील अत्यंत मोठे ‘स्पीनडॉक्टर’ अमरसिंग यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार यावर उपचार करण्यासाठी ते सिंगापूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. समाजवादी पार्टीत मात्र त्यांच्या या आजारपणाबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी समाजवादी पक्षाच्या जवळ असलेल्या सहारा समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या आजाराविषयीही अशीच गुप्तता पाळण्यात आली होती.

युवराजच्या अर्धशतकामुळे भारताची दीडशेच्यापुढे मजल
लंडन, १२ जून/ पीटीआय

युवराज सिंगच्या तडफदार अर्धशतकाच्या जोरावर भारताला ‘सुपर एट’ मधील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजपुढे १५४ धावांचे आव्हान ठेवणे शक्य झाले. बीनीचे तीन फलंदाज झटपट बाद झाल्यावर युवराजने ४३ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने ६७ धावा फटकाविल्या. तर युसूफ पठाण आणि हरभजन सिंग यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताला दिडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. वेस्ट इंडिजतर्फे ड्वेन ब्राव्होने चार तर फिडेल एडवर्ड्सने तीन विकेटस् मिळविल्या. नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

जैववैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर ताशेरे
मुंबई, १२ जून / खास प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारभार कसा हलगर्जीपणाचा आहे, याकडे लक्ष वेधत भारताच्या महालेखापरीक्षकांनी आपल्या २००८ सालच्या अहवालात मंडळावर टीकेचे प्रहार केले आहेत. रुग्णालये, शुश्रुषागृहे, विकृतीचिकित्सा प्रयोगशाळा, रक्तपेढय़ा आदींकडून जैव वैद्यकीय कचरा निर्माण होतो. या कचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया करण्यात आली नाही तर नागरिकांच्या आरोग्यास व पर्यावरणासही धोका निर्माण होतो.

कोटय़वधींच्या खर्चाचा ताळमेळच नाही!
‘कॅग’चे राज्य सरकारवर ताशेरे
मुंबई, १२ जून / खास प्रतिनिधी
आर्थिक शिस्तीबद्दल राज्य शासन एकीकडे स्वत:ची पाठ थोपटून घेत असतानाच कॅगच्या अहवालात मात्र २००७-२००८ या आर्थिक वर्षांत ३११३ कोटी ६५ लाख रुपयांच्या खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याबद्दल ताशेरे ओढण्यात आले आहेत. खर्चाचा मेळ न लागणाऱ्या खात्यांमध्ये ऊर्जा, सामान्य प्रशासन, गृह, आदिवासी विकास ही खाती आघाडीवर आहेत. राज्यातील खात्यांचा आढावा घेण्यात आला असता २६ विभागांमध्ये खर्चाचा ताळमेळ लागलेला नाही. कॅगने याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मात्र तांत्रिक कारणांमुळे हा ताळमेळ लागलेला नसल्याचे वित्त खात्याच्या सूत्राकडून सांगण्यात आले. खर्चाची नोंद न झाल्याने ताळमेळ लागलेला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन खात्यातील सुमारे ५५० कोटींचा खर्चाचा ताळमेळ लागलेला नाही. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गृह खात्यात ३५० कोटी, ऊर्जा खात्यातील सुमारे ९०० कोटी रुपये, आदिवासी विकास विभागाचा ५७७ कोटींचा खर्चाचा मेळ लागलेला नाही. याचबरोबर जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन अनास्था, खासदार, आमदार निधीचा अपव्यय आदींवरही अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.

लता मंगेशकर, सुशीलकुमार, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून खासदार निधीचा वापरच नाही
मुंबई, १२ जून / खास प्रतिनिधी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, नागरी वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल, चित्रपट अभिनेत्री हेमामालिनी यांच्यासह ११ आजी-माजी खासदारांनी कामेच न सुचविल्याने त्यांना केंद्र सरकारकडून खासदार निधीची पूर्ण रक्कमच उपलब्ध होऊ शकली नाही. विशेष म्हणजे लता मंगेशकर व प्रितीश नंदी यांनी कवडीचेही काम सुचविले नाही. काही खासदारांची ही अनास्था असताना २४ आमदारांनी मात्र नियमात तरतूद नसताना विशेष बाब म्हणून कामे मंजूर करून घेतल्याबद्दल भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी आक्षेप घेतले आहेत. शरद पवार, गुरुदास कामत, संजय राऊत आदींनी दक्षिण भारतातील सुनामीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खासदार निधी दिला असला तरी त्याची पूर्तता झाल्याबद्दल संबंधित राज्यांकडून पत्रच अद्याप प्राप्त झालेले नाही.खासदारांनी कामे न सुचविल्यामुळे २००३ ते २००८ या काळात राज्याला २०४ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी कमी मिळाल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले आहे.

नियमात तरतूद नसतानाही अपवाद करून आमदार निधी मंजूर!
मुंबई, १२ जून / खास प्रतिनिधी
एकीकडे खासदारांच्या अनास्थेमुळे निधीच मिळू शकलेला नसताना दुसरीकडे विधिमंडळाच्या उभय सभागृहातील २४ आमदारांसाठी नियमात तरतूद नसतानाही विशेष बाब म्हणून आमदार निधीतील कामे मंजूर करण्यात आल्याबद्दल ‘कॅग’ने ताशेरे ओढले आहेत. या संदर्भात ज्यांची नावे आली आहेत त्यांत विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख व उपसभापती वसंत डावखरे, विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा समावेश आहे. कालिदास कोळंबकर, संपतराव अवघडे, मदन भोसले, नरेंद्र ढोले-पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, शालिनीताई पाटील, अमरसिंग पंडित, गोपाळदास अगरवाल, राजकुमार पाटील, संजय कुंदे, राजीव राजाळे, श्रीकांत जोशी, शिवाजीराव पाटील, केशव मानकर, सहकार खात्याचे राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, शंभुराजे देसाई व नाशिक जिल्ह्य़ातील सर्व आमदार यांनी नियमबाह्य कामांसाठी निधी दिल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

पाकिस्तानमध्ये दोन स्फोट
११ ठार; शंभरहून अधिक जखमी
लाहोर/इस्लामाबाद, १२ जून/पी.टी.आय.

पाकिस्तानच्या लष्कराला आवश्यक सामग्री पुरविणाऱ्या नौशेरा येथील आर्मी डेपोमधील मशीद आणि लाहोरमधील मशिदीत झालेल्या दोन आत्मघाती हल्ल्यांमध्ये एका तालिबान विरोधी मौलवींसह १० जण ठार झाले आहेत. मौलाना सरफराज नाईमी असे या तालिबान विरोधी मौलवींचे नाव असून या हल्ल्यात त्यांच्यासह अन्य तीन भाविक बळी पडले आहेत. या दोनही हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक पाकिस्तानी नागरिक जखमी झाले आहेत.

आम्हाला थोडा उशीर झाला खरं!
श्वेता देसाई/स्वाती खेर
मुंबई, १२ जून

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या सल्लागार संपादक सबिना सैगल सैकिया यांचेही प्राण वाचविता आले असते. हे सर्व जण सहाव्या मजल्यावर अडकले होते. कांग यांनी अग्निशमन दलाला आपल्या कुटुंबाला वाचविण्याची कळकळीची विनंती केली; परंतु त्या वेळी सहाव्या मजल्यावरील आगीने रौद्ररूप धारण केले होते- इतके, की अग्निशमन दलाला आत शिरणेही अशक्य होऊन बसले होते. अग्निशमन दलाच्याच एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. तो पुढे म्हणाला- ‘‘आम्ही जेव्हा आग विझवून खोल्यांमध्ये गेलो, तेव्हा फार उशीर झाला होता. खोल्यांमधील लोक होरपळून मृत्यू पावले होते.’’
‘ओबेरॉय- ट्रायडण्ट’ हॉटेलमध्ये आग लागली तेव्हाही पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या नाहीत. कारण मुंबईत ‘मध्यवर्ती रुग्णवाहिका सेवा’च नाही. परिणामत: आगीत भाजून जखमी झालेल्यांना इस्पितळात नेण्यासाठी काळ्या-पिवळ्या प्रीमिअर पद्मिनी टॅक्सींचाच आधार घ्यावा लागला. ’(उर्वरित वृत्त )

ओसामा लादेन पाकिस्तानातच
वॉशिंग्टन, १२ जून / पीटीआय

कुख्यात दहशतवादी व अल-कैदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन जिवंत असून तो पाकिस्तानातच लपून बसलेला आहे. लादेनला संरक्षण देणाऱ्या तालिबान व अन्य दहशतवादी संघटना पाकिस्तानी लष्कराच्या स्वात खोऱ्यातील कारवाईमुळे कमकुवत बनल्या असून, लादेनला पकडण्यात लवकरच यश मिळेल असा विश्वास अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेचे प्रमुख लिऑन पानेट्टा यांनी व्यक्त केला आहे.

आजपासून भारनियमनात कपात
मुंबई, १२ जून / प्रतिनिधी

देशाच्या काही भागांत झालेला पाऊस आणि त्यामुळे विजेच्या मागणीत झालेली कमतरता यामुळे स्वस्त दराने २०० मेगावॅट जादा वीज उपलब्ध झाल्याने ही वीज खरेदी करून त्याद्वारे उद्यापासून राज्यातील विजेच्या पुरवठय़ाच्या कालावधीत वाढ करून भारनियमनातून दिलासा देण्याची घोषणा ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी आज विधिमंडळात एका निवेदनाद्वारे केली.

 

महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी