Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

भीषण, विदारक
बलात्कार करून तरुणीचा निर्घृण खून

औरंगाबाद, १२ जून /प्रतिनिधी

रात्री घरात एकटीच असलेल्या २१ वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कारानंतर निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना अहिंसानगरातील पूर्वा अपार्टमेंटमध्ये घडली. मानसी शंकर देशपांडे असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून तिचा गळा, मान तसेच शरीरावर इतरत्र खिळे ठोकण्यात आले होते. त्यानंतर गळाही आवळण्यात आला होता आणि अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. हात, पाय बांधलेले आणि विवस्त्र मृतदेह खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. खोलीत सर्वत्र रक्त पडलेले होते.

एक ‘बाप’ माणूस
१९ मे या विजय तेंडुलकरांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या शेवटच्या आत्मचरित्रपर ‘‘तें’ दिवस’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. शिरीष प्रभाग मोठं मार्मिक बोलून गेले, ‘तेंडुलकर हे जीवनाप्रमाणे मृत्यूच्याही पुढेच होते.’ एक लेखक व कलावंत म्हणून विजय तेंडुलकरांच्या महत्तम उंची गाठलेल्या मोठेपणाचं हे मर्म होतं. लेखक केव्हा कालजयी होतो? जेव्हा तो जीवनाचा त्याच्या साऱ्या गुंतागुंतींसह साक्षात्कार घडवतो. त्यासाठी त्याला जीवन संग्रामात व प्रसंगी मृत्यूसमरातही त्याच्या पुढे जाऊन पाहावं लागतं.

माजी अध्यक्षासह ४३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
चंपावती बँक घोटाळा

बीड, १२ जून/वार्ताहर

चंपावती नागरी सहकारी बँकेतील ७ कोटी ६९ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे तत्कालिन अध्यक्ष, व्यवस्थापक, संचालक, शाखाधिकारी, लेखापाल, पिग्मी एजंट, कर्जदार यांच्यासह एकूण ४३ जणांविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील हिना शाहीन बँकेपाठोपाठ चंपावती बँकेच्या संचालक मंडळावरही गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

चार नगराध्यक्षांची निवड निश्चित; माजलगाव, धारूरमध्ये चुरस
बीड, १२ जून /वार्ताहर

बीड नगरपालिकेत डॉ. भारतभूषण क्षीरसागर, परळीत जुगलकिशोर लोहिया, अंबाजोगाईत रोमन साठे तर गेवराईत अ‍ॅड. लक्ष्मण पवार यांची नगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड निश्चित झाली असून माजलगावमध्ये चार, तर धारूरमध्ये दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने चुरस वाढली आहे. बीड जिल्ह्य़ातील सहा नगरपालिका अध्यक्षपदासाठी नवीन अध्यादेशानुसार शुक्रवारी (१२ जून) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली.

विलासराव देशमुख यांचा उद्या लातूरमध्ये सत्कार
लातूर, १२ जून/वार्ताहर

जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योग तथा सामाजिक उपक्रममंत्री विलासराव देशमुख यांचा सत्कार व ऋणनिर्देश सोहळा जिल्हा क्रीडासंकुलाच्या मैदानावर रविवारी (दि. १४) आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित देशमुख, राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर यांनी या सत्कार सोहळ्याच्या तयारीची नुकतीच पाहणी केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीस वर्षातून एक महिन्याची मोफत प्रवास योजना
नांदेड, १२ जून/वार्ताहर

सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीस वर्षात एक महिन्याचा मोफत प्रवासाचा पास देण्याची योजना महामंडळाने चालू केली असल्याचे पत्रक राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने प्रसिद्धीस दिले आहे. येत्या १ जुलैपासून २८ फेब्रुवारीपर्यंत केव्हाही एक महिन्याचा प्रवास एस. टी. महामंडळ कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या विधवा पत्नीस करता येईल, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

निवृत्तिधारकांची थकबाकी एकरकमी देण्याची मागणी
नांदेड, १२ जून/वार्ताहर

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सेवानिवृत्तांना १ जानेवारी २००६ पासून देय असलेली थकबाकीची रक्कम महाराष्ट्र सरकारने एकाच हप्त्यात द्यावी. ही थकबाकी पाच हप्त्यात देण्याचा सरकारने घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी सेवानिवृत्त प्रश्नचार्य देवदत्त तुंगार व सामाजिक कार्यकर्ते सय्यद बलिगोद्दीन साकीब यांनी केली आहे. जून महिन्याचे पेन्शन सरकार सुधारित दराप्रमाणे देणार आहे व १ जानेवारी २००६ पासूनचे ३९ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी पाच हप्त्यात देण्याचे सरकारने ठरविले आहे.

मुखेड तालुक्यात वीज कोसळून महिला ठार
नांदेड, १२ जून/वार्ताहर

शेतात काम करीत असताना वादळवाऱ्यासह पाऊस होवून वीज पडल्याने झालेल्या दुर्घटनेत कलावती शंकरराव हिवराळे (वय ३८) ही महिला जागीच ठार झाली. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. सूत्रांनी सांगितले की, मुखेड तालुक्यातल्या पळसवाडी येथील कलावती हिवराळे ही महिला शेतात काम करीत असताना सायंकाळी अचानक विजेचा कडकडाट व वादळवाऱ्यासह पाऊस सुरू झाला. अचानक वीज कोसळल्याने कलावती हिवराळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. शेजारच्या शेतात काम करणाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी मुखेड पोलिसांना ही माहिती दिली. मुखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

परस्पर प्लॉटविक्री प्रकरणी एकावर फसवणुकीचा गुन्हा
गंगाखेड, १२ जून/वार्ताहर

शहरालगतच्या सुरळवाडी शिवारातील दोन प्लॉट अधिकारपत्र नसतानाही परस्पर विकल्याप्रकरणी फिर्यादी प्रवीण उत्तम मुंडे (रा. सिरसम) यांच्या फिर्यादीवरून आरोपी श्रीकांत दत्तोपंत देवळे (रा. गंगाखेड) याच्या विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, शहरासह तालुक्यात परस्पर तसेच बोगस प्लॉट विक्रीचे प्रकार वाढल्याचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहेत. फिर्यादी प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, आरोपी श्रीकांत देवळे यांनी शहरालगतच्या सुरळवाडी शिवारातील शेतसव्‍‌र्हे क्र. ४१८/०२ येथील दोन प्लॉट ५५ हजार किमतीने मुंडे यांना २००८ साली विकले होते. मात्र देवळे यांनी त्यानंतरच मुंडे यांचा हा प्लॉट परस्पर इतरांना विकत रजिस्ट्रेशन करून दिला. पोलिसांनी आरोपी देवळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सय्यद जावेद हे करीत आहेत. दरम्यान, शहरातील अनेक प्लॉटचे परस्पर तसेच बनावट खरेदी-विक्रीचे प्रकार घडत असूनही तालुका दुय्यम निबंधक कार्यालय मात्र याबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे आढळले आहे.

तुळजापूरच्या नगराध्यक्ष निवडीसाठी हालचाली
तुळजापूर, १२ जून /वार्ताहर

पुढील सप्ताहात होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची नोंद घेऊन नगरपालिकेचे ८ नगरसेवक गेल्या आठ-दहा दिवसांपासून अज्ञातस्थळी निघून गेले असले तरी त्या नगरसेवकांशी संपर्क साधून तडजोडीने मार्ग काढण्यासाठी म्हणजे उर्वरित राहिलेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत दोघांना संधी देऊन तोडगा काढण्यासाठी जोरदार हालचाली होत असल्याचे वृत्त आहे. यावेळी केवळ १५ नगरसेवकांच्या मतावर नगराध्यक्ष ठरणार आहे.

मारहाणीनंतर पत्नीला घरात डांबून ठेवले
औरंगाबाद, १२ जून /प्रतिनिधी

मारहाणीनंतर ३० वर्षाच्या विवाहितेला पतीने घरात डांबून ठेवल्याची घटना बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सबिया बेगम अजमलखान असे या विवाहितेचे नाव आहे. शेजाऱ्यांच्या मदतीने तिची सुटका झाल्यानंतर तिने सरळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. ही घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. पती अजमलखान याने दुपारी सबिया यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना घरात कोंडून ठेवले. दरवाजा बंद करून तो निघून गेला. जखमी अवस्थेत त्या घरात पडून होत्या. बऱ्याच वेळानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले.
त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अजमलखानला अटक केली नव्हती.

पोलीस खात्यात भरतीच्या आमिषाने एक लाखाला गंडविले
औरंगाबाद, १२ जून /प्रतिनिधी

पोलीस खात्यात भरती करून देतो असे आमिष दाखवून एकास एक लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला. संजय बाबूराव चव्हाण असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध सिडको औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. दत्ता पुंजाजी पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही नोंद करण्यात आली आहे. पवार यांनी मुलाच्या नोकरीसाठी ही रक्कम चव्हाण याला दिली होती. त्याने मुलाला नोकरीलाही लावून दिले नाही आणि नंतर पैसेही परत केले नाही.आपण फसविले तर गेलो नाही, अशी भीती पवार यांना वाटल्यामुळे त्यांनी नोकरी नको पैसे परत करा, अशी मागणी केली. मात्र पैसे परत करण्यास चव्हाण यांनी नकार दिला.
यावरून वादावादी झाली असता चव्हाण याने पवार यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पवार यांनी सिडको औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

बीडमध्ये वादळी पाऊस ; पत्रे उडाले, झाडे पडली
बीड, १२ जून /वार्ताहर

गुरुवारी रात्री वादळवाऱ्यासह झालेल्या पावसात ग्रामीण भागात घरावरील पत्रे उडून आणि शेतामधील शेड उडून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. काकडहिरा व पालवन भागात विजेचे खांब, झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ात गुरुवारी (११ जून) सायंकाळी सात नंतर अनेक ठिकाणी पावसाने सुरुवात केली. मात्र पावसापेक्षा वादळीवाऱ्याचा जोर जास्त राहिल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
तालुक्यातील काकडहिरा, पालवन या भागात अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली तर वीज वितरण कंपनीचे या परिसरातील तीस ते चाळीस खांब उन्मळून पडले. रस्त्याच्या कडेची झाडे, पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. काकडहिऱ्यात पत्रे पडल्याने म्हैस ठार झाली तर गौळवाडीत साठ ते सत्तर घरावरील पत्रे उडून गेले. चऱ्हाटय़ात विजेचा खांब पडून एक बैल ठार झाला. या घटनांसह अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळी प्रशासनाकडे याबाबतची माहिती कळविली गेली.नुकसान झालेल्या ठिकाणी तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांनी जाऊन पंचनामा करण्याचा आदेश दिला आहे.

जालन्यात दोन गटांत मारामारी;२८ जणांना अटक
जालना, १२ जून/वार्ताहर

जुना जालना भागात काल रात्री उशिरा दोन गटांत जोरदार मारामारी झाली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हाणामारी प्रकरणी पोलिसांनी ४३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यापैकी २८ जणांना आज दुपारपर्यंत अटक करण्यात आली होती. या हाणामारी प्रकरणी पोलीस जमादार भिका राठोड यांनी फिर्याद दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्राने मारामारी करून दहशत निर्माण करण्याचा आरोप या प्रकरणी आहे. दोन गटांत झालेल्या मारहाणीची माहिती मिळाल्यावर तेथे बंदोबस्तासाठी पोहोचलेल्या पोलिसांवर दगडफेक झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह पाच पोलिसांना यावेळी मार लागला. या संदर्भात कदीम जालना पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. काल रात्री दोन गटांत झालेल्या या हाणामारीमुळे जुना जालना भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक आणि मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.