Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ओसामा लादेन पाकिस्तानातच
वॉशिंग्टन, १२ जून / पीटीआय

 

कुख्यात दहशतवादी व अल-कैदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन जिवंत असून तो पाकिस्तानातच लपून बसलेला आहे. लादेनला संरक्षण देणाऱ्या तालिबान व अन्य दहशतवादी संघटना पाकिस्तानी लष्कराच्या स्वात खोऱ्यातील कारवाईमुळे कमकुवत बनल्या असून, लादेनला पकडण्यात लवकरच यश मिळेल असा विश्वास अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेचे प्रमुख लिऑन पानेट्टा यांनी व्यक्त केला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, लादेन पाकिस्तानच लपून बसलेला आहे. त्याला पकडण्यास आमचे सर्वाधिक प्राधान्य असून त्याच्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी सीआयएने पाकिस्तानात आपले जाळे अधिक बळकट केले आहे. पाकिस्तान व अमेरिकी लष्कराच्या संयुक्त कारवाईमुळे लादेनला पकडण्यात लवकरच यश येईल असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, अल-कैदा आजही अमेरिका व जगाच्या दृष्टीने गंभीर धोका आहे. पाकिस्तानी लष्कर स्वातमध्ये चांगली कामगिरी बजावत असल्याने लादेन व त्याचे सहकारी येमेन व सोमालियात आश्रय घेण्याची शक्यता आहे. पानेट्टा यांनी लादेन जिवंत असल्याचे विधान केले असले तरी पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी मात्र लादेन जिवंत नसल्याचे स्पष्ट केले होते. लादेन मरण पावला असून तो पाकिस्तानात लपून बसला नसल्याचे विधान त्यांनी अमेरिका भेटीत केले होते.