Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आजपासून भारनियमनात कपात
मुंबई, १२ जून / प्रतिनिधी

 

देशाच्या काही भागांत झालेला पाऊस आणि त्यामुळे विजेच्या मागणीत झालेली कमतरता यामुळे स्वस्त दराने २०० मेगावॅट जादा वीज उपलब्ध झाल्याने ही वीज खरेदी करून त्याद्वारे उद्यापासून राज्यातील विजेच्या पुरवठय़ाच्या कालावधीत वाढ करून भारनियमनातून दिलासा देण्याची घोषणा ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी आज विधिमंडळात एका निवेदनाद्वारे केली. उद्यापासून कृषीप्रवण विभागातील विजेच्या पुरवठय़ाच्या कालावधीत एका तासाने (सध्याच्या १३ ते १५.३० तासांऐवजी १४ ते १६.३० तास) तर अन्य विभागातील पुरवठय़ाच्या कालावधीत १५ मिनिटांनी (सध्याच्या १८.१५ ते २२ तासांऐवजी १८.३० ते २२.१५ तास) वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इतर विभागांत उद्यापासून संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंतच्या कालावधीत भारनियमन करण्यात येणार नाही, असेही तटकरे यांनी जाहीर केले.
याचा लाभ जिल्हा मुख्यालये, तालुका मुख्यालये, शहरे, कृषीप्रवण विभागांत नसलेली आठ हजार गावे व कृषीप्रवण विभागांत असलेल्या तथापि फीडर सेपरेशन झालेल्या व कमी कृषीप्रवण विभागातील सुमारे १८ हजार ४४० गावांना होणार आहे. वीज पुरवठय़ातील वाढ आणि सुधारित वेळापत्रक यांची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त १४ जूनपासून ‘क’ ते ‘फ’ वर्गातील मुख्यालयांमध्ये सायंकाळी ६.३० वाजल्यानंतर रात्री भारनियमन न करण्याचा तर जिल्हा मुख्यालयाशिवाय इतर ठिकाणी रात्री ८.३० वाजल्यानंतर भारनियमन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.