Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पाकिस्तानमध्ये दोन स्फोट
११ ठार; शंभरहून अधिक जखमी
लाहोर/इस्लामाबाद, १२ जून/पी.टी.आय.

 

पाकिस्तानच्या लष्कराला आवश्यक सामग्री पुरविणाऱ्या नौशेरा येथील आर्मी डेपोमधील मशीद आणि लाहोरमधील मशिदीत झालेल्या दोन आत्मघाती हल्ल्यांमध्ये एका तालिबान विरोधी मौलवींसह १० जण ठार झाले आहेत. मौलाना सरफराज नाईमी असे या तालिबान विरोधी मौलवींचे नाव असून या हल्ल्यात त्यांच्यासह अन्य तीन भाविक बळी पडले आहेत. या दोनही हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक पाकिस्तानी नागरिक जखमी झाले आहेत.
मौलाना नाईमी यांनी पाकिस्तानमध्ये तालिबानकडून होणारे आत्मघाती हल्ले हे इस्लाम धर्माच्या विरोधी असल्याचा फतवा काही दिवसांपूर्वीच काढला होता. जामिया नाईमिया या संघटनेच्या मशिदीत शुक्रवारी दुपारचा नमाज झाल्यानंतर हा स्फोट घडवून आणण्यात आला. आत्मघाती हल्लेखोर बाहेर पडणाऱ्या लोकांमधून नाईमीच्या कार्यालयात तीरासारखा धावत गेला व त्याने हा स्फोट घडवून आणला. मौलाना नाईमी हे या स्फोटात गंभीररीत्या जखमी झाले आणि जागीच मरण पावले. याच स्फोटात अन्य १२ भाविक जखमी झाले. नौशेरा या शहरात आर्मी सप्लाय डेपोमधील मशिदीत असाच एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला व त्यात मशिदीतील सहा भाविक ठार तर अन्य २५जण जखमी झाले आहेत. या मशिदीलगतची घरे आणि बाहेर उभ्या असलेल्या मोटारींचेही या स्फोटामध्ये मोठे नुकसान झाले आहे.