Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

९०:१० कोटय़ाचा निर्णय अधांतरी
पालक-विद्यार्थ्यांचे सोमवारपासून उपोषण
मुंबई, १२ जून / प्रतिनिधी

 

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य शिक्षण मंडळाच्या (एसएससी) विद्यार्थ्यांसाठी ९० टक्के तर सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी १० टक्के राखीव जागा ठेवण्याच्या निर्णयावर कायदेतज्ज्ञांनी नकारात्मक मत दिले आहे तसेच काँग्रेसमधूनही त्यास विरोध होत असल्याने ९०:१० टक्के कोटय़ाचा निर्णय अधांतरी लटकला आहे. दरम्यान, ‘एसएससी बोर्ड पालक संघटने’ने या प्रस्तावित निर्णयाचे जोरदार समर्थन केले असून कोटय़ाच्या अंमलबजावणीसाठी सोमवारपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
एसएससीच्या विद्यार्थ्यांना ९० टक्के जागा राखीव ठेवण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केल्यामुळे सीबीएसई, आयसीएसईच्या पालकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे ९० टक्के कोटय़ाचा मुद्दा न्यायालयात गेल्यास कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, असे असले तरी ९० टक्के कोटय़ाच्या निर्णयाबाबत राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल रवी कदम यांच्यासोबत उद्या किंवा सोमवारी बैठक होणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. हा निर्णय अद्याप बारगळलेला नाही, काहीजण त्याबाबत मुद्दाम अफवा पसरवित असल्याचे ते म्हणाले.
९० टक्के कोटय़ाच्या समर्थनार्थ ‘एसएससी बोर्ड पालक संघटने’ने आज रूईया महाविद्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अभिजीत पानसेही उपस्थित होते. यावेळी सोमवारपासून उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेच्या प्रतिक्षा मांजरेकर यांनी दिली.
९० टक्के कोटय़ाच्या समर्थनार्थ विद्यार्थी, पालक, विविध संघटना, राजकिय पक्ष यांनी एकत्रित यावे, असे आवाहनही मांजरेकर यांनी केले आहे. या आंदोलनासाठी पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्यांनी मांजरेकर यांच्याशी ९८२१६७२३८५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
शिक्षण शुल्क समितीसाठी अभ्यास गटाची स्थापना
राज्यातील विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षण शुल्क ठरविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण शुल्क समिती स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या समितीचे स्वरूप ठरविण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागातील माजी शिक्षण सचिव कुमुद बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यीय अभ्यास गटाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.